अहमदनगरएका तासापूर्वी
- कॉपी लिंक
सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या वतीने कोपरगाव येथील शासकीय हद्दीतील साईबाबा चौफुली ते रेल्वे स्टेशन शिंगणापूर रस्ता शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या रस्त्याच्या दुतर्फा झालेली 130 अतिक्रमणे बुधवारी जमीनदोस्त करण्यात आली.
काही अतिक्रमणधारकांनी स्वतःहून टपऱ्या, कच्ची पक्की झोपड्यावजा अतिक्रमणे काढून घेतली. शासकीय हद्दीत अतिक्रमण केलेबाबत उपरोक्त विषयान्वये रस्त्याची पाहणी केली असता कोपरगाव-पढेगाव-वैजापूर रस्त्याच्या डाव्या उजव्या बाजूला रस्त्याच्या मध्यापासून 40 मीटरच्या आतमध्ये शंकरबापू थोरात, साहेबराव थोरात, गोरख थोरात, संगीता पवार आदींनी अतिक्रमण केले होते.
याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने तसे पत्र पोलिस ठाण्यास दिले होते. सदरची नोटीस मिळताच 15 दिवसांचे आत अतिक्रमण काढून घ्यावे, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी नोटीस उपविभागीय अधिकारी सार्वजनिक बांधकाम यांनी दिली होती. तीन महिन्यापासून त्याबाबत पाठपुरावा सुरू होता. आज पोलिस बंदोबस्त उपलब्ध झाल्याने उपविभागीय सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी वर्षराज शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 15 जणांचे पथक दोन जेसीबी दोन ट्रॅक्टर तसेच चार पोलिस अधिकारी, पोलिस निरीक्षक उत्तमराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली २८ अंमलदार, नऊ होमगार्ड, महिला होमगार्ड पथकाच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली.
अतिक्रमण हटाव मोहीमेत जमीनदोस्त करण्यात आली. अतिक्रमण धारकांनी पोलिसांशी व अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली. बेघर झालेल्या 100 लोकांना सूर्यतेज संस्थेने खिचडीचे वाटप केले. पोलिस निरिक्षक रामराव ढिकले, पोलिस उपनिरीक्षक भरत दाते, रोहिदास ठोंबरे यांचे उपस्थितीत सूर्यतेज संस्थापक सुशांत घोडके, संदीप ठोके यांच्यासह सूर्यतेज संस्था सदस्य यांनी खिचडीचे वितरण केले. दरम्यान, सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते संजय काळे यांनी 40 मीटर पर्यंतचे अतिक्रमण दोन्ही बाजूचे काढण्याचे धाडस सार्वजनिक बांधकाम विभागाने दाखवावे, अन्यथा या प्रश्नावरून आपण सत्याग्रह करणार असल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले.