अहमदनगर5 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
भारतीय लष्कर प्रथमच सायकल पोलो फेडरेशन ऑफ इंडियाच्या सहकार्यातून अहमदनगर शहरात “आर्म्ड फोर्सेस सायकल पोलो चषक 2023 ‘ ही तीन दिवसीय स्पर्धा घेणार असून, या स्पर्धेला रविवार 19 मार्चपासून अहमदनगरमध्ये प्रारंभ होणार आहे. अशी माहिती स्पर्धेचे व्यवस्थापक लेफ्टनंट कर्नल भारत पन्नू यांनी शनिवारी (18 मार्च) ला पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेसाठी के.के सोनी, पी.के. तिवारी, जे.डब्ल्यू विष्णू, पियुष कुमार सिन्हा आदी उपस्थित होते. भारत पन्नू म्हणाले, अहमदनगर शहरात 19 ते 21 मार्च या कालावधीत होत असलेल्या या स्पर्धेमध्ये देशातील सर्वोत्तम सायकल पोलो खेळणारे संघ सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा सीपीआयएफच्या अधिकाऱ्यांना आगामी सायकल पोलो विश्वचषक स्पर्धेसाठी सर्वोत्तम संघ निवडण्यासाठी मदत करेल. या स्पर्धेत भारतीय वायुसेनेचे सायकल पोलो संघ, भारतीय लष्कराच्या आर्म्ड कॉर्प्स आणि प्रादेशिक सेना एकमेकांविरुद्ध लढताना दिसणार आहेत.
ही स्पर्धा अहमदनगर येथील एसीसीअँडएस मधील पोलो ताल मैदानावर होणार आहे. तीन दिवसाच्या या स्पर्धेत विजेत्या ला दीड लाखांचे बक्षीस देण्यात येणार आहे. प्रेक्षकांना तिन्ही संघाचे 7 सामने पाहता येणार आहेत.
पन्नू म्हणाले, “आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार करण्याच्या बाबतीत भारतीय सशस्त्र दल नेहमीच आघाडीवर असते. आपल्या देशाच्या सायकल पोलो संघाने सायकल पोलो विश्व चषक स्पर्धेत 6 वेळा सुवर्णपदक मिळवून आपला अभिमान वाढवला आहे. या खेळाला योग्य मान्यता मिळण्याची हीच वेळ आहे आणि एक राष्ट्र म्हणून आम्ही आमच्या सशस्त्र दलांमध्ये हे जे खेळाडू घडवतो त्या अप्रतिम खेळाडूंच्या कौतुकासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी एकत्र येऊ.” असे त्यांनी आवाहन केले.
सायकल पोलो फेडरेशन ऑफ इंडियाचे मुख्य अधिकारी के. के. सोनी म्हणाले, “सायकल पोलो हा एक अत्यंत गतिशील व प्रचंड उर्जेने भरलेला असा खेळ आहे. ज्यामध्ये हॉर्स पोलोची चपळता आणि सायकलिंगचा वेग व तीव्रता यांचा मेळ आहे. हा एक रोमांचक खेळ असून शारीरिक दृष्ट्या ताकद व ऊर्जेची गरज असलेला खेळ आहे. अहमदनगरला पहिल्यांदाच हा अनोखा खेळ अनुभवायला मिळणार आहे. असे त्यांनी सांगितले.