साखराच्या सावित्रीच्या लेकीने मिळविले जिद्दीने यश: राज्य करनिरीक्षक पदावर झाली निवड; राज्यात मुलींमध्ये पटकावला सहावा क्रमांक


हिंगोली32 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या झालेल्या परीक्षेमध्ये साखरा (ता.सेनगाव) येथील विद्या कांदेंची राज्य करनिरीक्षक पदावर निवड झाली. एवढंच नव्हे तर राज्यात मुलींमध्ये सहावा क्रमांक मिळवून तिने घवघवीत यश मिळवले. तिच्या या उत्तम कामगिरीचे सर्वत्र राज्यात कौतुक होत आहे. तसेच विद्याच्या जिद्दीची कहाणी ग्रामीण तरुणींसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

Advertisement

भावाने दिला आधार

सेनगाव तालुक्यातील साखरा येथील विद्या सुभाष कांदे यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा साखरा येथे झाले. त्यानंतर वडिलांचे छत्र हरविले अन् पुढे काय असा प्रश्‍न निर्माण झाला. घरी पाच एकर शेती इतर दोन भाऊ अन् आई असे खाणारे चार हात उदरनिर्वाहासाठी शेतात कामाला जावे की, शिक्षण घ्यावे अशी परिस्थिती निर्माण झाली. बहिणीची घालमेल लक्षात घेऊन त्यांचा भाऊ विकास कांदे याने बारावीनंतर शिक्षण सोडून शेतात काम करण्याचा निर्णय घेतला. शेतातून मिळणाऱ्या उत्पन्नातून कुटुंबाचा उदरनिर्वाह व बहिण विद्याचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्याने पाठबळ दिले.

Advertisement

पुन्हा दिली परीक्षा

दरम्यान, इयत्ता आकरावी व बारावी नवोदय विद्यालयातून पूर्ण केल्यानंतर विद्याने यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून बीए ची पदवी मिळवली. या काळात तिने घरीच राहून लोकसेवा आयोगाच्या परिक्षेचा अभ्यास सुरू केला. मात्र दुष्काळी परिस्थिती व कुटुंबाची आर्थिक ओढाताण लक्षात घेऊन विद्याने 2018 मध्ये ग्रामीण डाकसेवक पदाची परीक्षा देऊन त्यात यश मिळविले अन साखरा येथेच नियुक्ती मिळाली. त्यामुळे थोडीफार मदत झाली. मात्र या परिस्थितीत तिने परिक्षेचा अभ्यास सुरुच ठेवला. सन 2020 मध्ये झालेल्या पूर्व परीक्षेत अपयश आले. मात्र अपयश हिच यशाची पहिली पायरी ओळखून तिने पूर्व परिक्षेच्या अभ्यासातील उणीवा शोधून काढल्या.

Advertisement

कठीण प्रसंगातून मिळवले यश

दरम्यान, 2021 मध्ये पुन्हा लोकसेवा आयोगाच्या परिक्षेची जाहिरात आली. या परिक्षेत यश मिळवायेचच या ध्येयाने पेटून उठलेल्या विद्याने दिवसरात्र एक करून अभ्यास केला. जूलै 2022 मध्ये झालेल्या परीक्षेत यश मिळविले. पूर्व, मुख्य परीक्षेत यश मिळविल्यानंतर मुलाखतीची तयारी केली अन् दोन दिवसांपुर्वीच निकाल जाहीर झाला. यामध्ये विद्याने मुलींमध्ये राज्यातून सहावा क्रमांक मिळविला. तिची आता राज्य करनिरीक्षक पदावर निवड झाली आहे. कठीण प्रसंगातून जिद्दीने यश मिळविता येते हे दाखवून देत आई व भावाचे स्वप्न पूर्ण केले आहे.

Advertisement

आई, भाऊ माझे आयडॉल

माझ्या यशाचे खरे श्रेय आई व भाऊ यांना आहे. मुलगी असतांनाही मला शिक्षण दिले अन् त्यांचे स्वप्न मी पूर्ण करू शकले याचा आनंद आहे. ध्येय निश्‍चित करून त्यादृष्टीने अभ्यास करावा यश हामखास मिळते. मात्र त्यासाठी परिस्थितीचा बाऊ न करता त्यावर मात करायचा शिकले पाहिजे.
– विद्या कांदे, साखरा

Advertisement

बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement