मुंबई इंडियन्सच्या संघात बरंच काही बिघडल्याचे पाहायला मिळत आहे. कारण मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आणि संचालक झहीर खान यांच्यामध्ये मतभेद असल्याचे आता समोर आले आहे. त्यामुळे दोन पराभवानंतर मुंबई इंडियन्सच्या संघात नेमकं चाललंय तरी काय, असा प्रश्न चाहत्यांच्या मनात उपस्थित झाला आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि संचालक झहीर खान यांच्यामध्ये मतभेद असल्याचे आता स्पष्टपणे समोर आले आहे. मुंबई इंडियन्सला सलग दोन पराभव पत्करावे लागले असून त्यानंतर रोहित आणि झहीर यांच्यामध्ये मतभेद असल्याचे समोर आले आहे.
रोहित आणि झहीर यांच्यामध्ये कोणत्याबाबतीत मतभेद आहेत, जाणून घ्या…
मुंबई इंडियन्सला गेल्या दोन सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला. त्यानंतर रोहित आणि झहीर यांच्यातील मतभेद समोर आले आहेत. हे मतभेद मुंबई इंडियन्सचा हुकमी एक्का सूर्यकुमार यादवबद्दल आहेत. मुंबईचा दुसरा सामना हा राजस्थान रॉयल्सबरोबर २ एप्रिलला खेळवण्यात आला. या सामन्यापूर्वी झहीर खानची पत्रकार परिषद झाली होती आणि त्यावेळी त्याला सूर्यकुमारबाबत प्रश्न विचारण्यात आला होता.
झहीरने त्यावेळी सांगितले होते की, ” सूर्यकुमार यादव हा आम्ही कायम राखलेला खेळाडू आहे. तो संघातील महत्त्वाचा मोहरा आहे. तो मैदानावर उतरावा म्हणून आम्ही सारेच उत्सुकतेने प्रतिक्षा करीत आहोत. आयपीएलमध्ये पुढील लढतीत राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळण्यासाठी तो उपलब्ध असेल.” दुसऱ्या सामन्यासाठी सूर्यकुमार हा संघाबरोबर सराव करत असल्याचे सर्वांनीच पाहिले. पण या सामन्यात मात्र सूर्यकुमार यादवला खेळण्याची संधी देण्यात आली नाही. हा सामना मुंबई इंडियन्सने गमावला.
सामना संपल्यावर रोहितला सूर्यकुमार यादव कधी खेळणार, याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी रोहित म्हणाला की, ” सूर्यकुमार यादव हा आमच्यासाठी सर्वात महत्वाचा खेळाडू आहे. सूर्यकुमार जेव्हा फिट होईल तेव्हा त्याला थेट संघात स्थान देण्यात येईल. सूर्यकुमारच्या बोटाला दुखापत झाली आहे आणि त्याची ही दुखापत बरी होण्याच्या मार्गावर आहे.” सूर्यकुमार यादवबाबत झहीर आणि रोहित या दोघांची मतं भिन्न असल्याचे पाहायला मिळाली आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी सूर्यकुमार फिट असल्याचे झहीरने सांगितले होत, तर सामन्यानंतर रोहितने तो फिट नसल्याचे म्हटले होते. सूर्यकुमार यादवच्या फिटनेसबाबत चाहत्यांमध्ये आता संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्स याबाबत स्पष्ट भूमिका कधी मांडणार, याची उत्सुकता चाहत्यांना लागलेली असेल. त्याचबरोबर आता कोलकाता नाइट रायडर्सबरोबरच्या तिसऱ्या सामन्यात सूर्यकुमार यादव खेळणार की नाही, याकडेही चाहत्यांचे लक्ष लागेलेले असेल. कारण सूर्यकुमार हा एकहाती सामना फिरवू शकतो. सध्याच्या घडीला सूर्यकुमारची मुंबई इंडियन्सच्या संघाला सर्वात जास्त गरज आहे.