सरलं दळण..आरती कदम
रानकवी ना. धों. महानोर यांच्या पत्नी सुलोचना महानोर यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या मुलाखतीचं ‘रानगंध’ हे स्वतंत्र पुस्तक प्रकाशित करण्यात आलं. त्या पुस्तकाच्या निमित्तानं ना.धों. आणि सुलोचनाबाईंचं समर्पित आयुष्य उलगडत गेलं आहे.. ‘गुंतलेले प्राण ह्या रानात माझे’, हे ना.धों.साठी जितकं सत्य होतं तितकंच सुलोचनाबाईंसाठीही होतं आणि म्हणूनच ‘वेलीच्या आधारानं झाड जगण्या वाढण्याचं अघटित घडलं.’ त्या गेल्या आणि ना.धों.साठी, ‘सरलं दळण, ओवी अडली जात्यात.’ हे सत्य उरलं..
धाबलीच्या घरातला
मंद दिवा, थोडी शेती
बाई, सुखापरी दु:ख
घोर काजळल्या राती

Advertisement

दाट बर्बट गिळून
कसा उभविला मळा
तुझ्या लदबद बोलीनं
गुंफलेला गोतावळा

कुठे निघालीस बाई
सोडोनि हा पाणमळा
तुझ्या अबोल डोळय़ांच्या
खोल काळजाला कळा

Advertisement

रानोमाळ पानझड
आर्त पाखरांचा स्वर
माझ्या एकाक जिण्याला
आठवांचा गहिवर
सुने.. सुने.. तुझे घर
तुझा नामदेव

सुलोचनाबाई गेल्यानंतर त्यांच्या आठवांचा गहिवर ना.धों.च्या शब्दांतून असा गहिवरला. घरही सुनं झालं नि तेही. त्या सुलोचनाबाई म्हणजे ना.धों.च्या चाळीस वर्षांच्या जीवनसोबती. नभ आणि भुई, रान आणि कविता यांच्या नात्याइतकंच त्या दोघाचंही घनिष्ट नातं. ते इतकं दाट होतं, की त्यांनी ते सुलोचनाबाईंना ‘पानझड’ कवितासंग्रहाच्या वेळीच सांगितलं होतं, ते या शब्दांत- ‘निसर्गात जरी झाडाच्या आधारानं वेल वाढत असली तरी आपल्या चाळीस वर्षांच्या आयुष्यात वेलीच्या आधारानंच झाड जगण्या वाढण्याचं अघटित घडलं ते तुझ्यामुळे..’

Advertisement

हे जगण्या वाढण्याचं अघटित सांगणारं ‘रानगंध’ हे स्वतंत्र पुस्तक म्हणजे सुलोचनाबाईंची एक छोटेखानी मुलाखत, थोडक्यात, गप्पावजा आत्मकथनच आहे. या रानकवीच्या भावविश्वात डोकावायचं असेल तर त्यांच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीला बोलतं करायला हवं, ते स्नेहा शिनखेडे यांनी उत्कृष्टपणे केलं आणि उलगडत गेला तो ना.धों. आणि सुलोचनाबाईंच्या चाळीस वर्षांच्या आयुष्याचा निसर्गपट..

वयाच्या १२व्या वर्षी लग्न होऊन महानोरांच्या घरी आल्यानंतर ‘दारिद्रय़ातला दाट बर्बट’ गिळूनही ती बाई शेतकऱ्याची पोर असल्यानं असेल, पण आयुष्यभर कष्ट करत राहिली आणि ‘जोंधळय़ाला चांदणं लखडून’ जाण्याचा चमत्कार घडला आणि ‘चिंब पावसानं रान आबादानी’ होत जावं तसं त्यांच्या आयुष्याला शेवटी तृप्त पूर्णविराम मिळाला, पण तो खोल चटका ना.धों. असा शब्दबद्ध करतात,

Advertisement

सरलं दळण
ओवी अडली जात्यात
उभ्या जन्माचा उमाळा
कळ सोसून डोळय़ात.

महानोरांच्या घरातलं सुरुवातीच्या काळातलं दारिद्रय़ातलं आयुष्य, ते ‘रानातल्या कविता’ आल्यानंतरचं मानमरातबाचं, मोठेपणाचं जिणं, या सगळय़ांच्या साक्षीदारच नव्हे, तर सोबती सुलोचनाबाई होत्या. त्यांच्या या मुलाखतवजा गप्पांतून ना.धों. कळत जातातच, पण त्याच बरोबरीनं सुलोचनाबाई याही एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व म्हणून कशा घडत गेल्या हे कळत जातं. अगदी सुरुवातीच्या दिवसांविषयी त्या सांगतात, की शेतातच रमणारे ना.धों. कविता सुचली आणि कागद हाताशी नसला तर ती हातावर लिहून काढायचे. ते कायमच कवितेत रमलेले. इतके, की शेतातलं काम संपल्यानंतरही कंदील-चिमणीच्या उजेडात रात्ररात्र लिहीत वाचत बसायचे. कौटुंबिक,आर्थिक अडचणीमुळे त्यांचं शिक्षण सुटलं आणि मग दारिद्रय़ कसं संपणार या विवंचनेत असताना चमत्कार घडावा तसं ना.धों.च्या कवितांनी त्यांची सृष्टीच हिरवीगार केली. ‘रानातल्या कविता’ हा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला आणि ना.धों.चं नाव सर्वदूर पसरलं. नामवंत मंडळी त्यांच्या पळसखेडच्या शेतात त्यांना भेटायला, त्यांच्या कविता ऐकायला येऊ लागली. सुलोचनाबाई या मुलाखतीत सांगतात, ‘‘आमच्या घरी काय, खेडय़ात काय, संडास-बाथरुमही नव्हतं.

Advertisement

घरात खुर्ची नव्हती. येणारे पाहुणे मात्र न्यारेच होते. रात्रभर जागायचे, मातीत बसून यांच्या कविता ऐकायचे, सगळे एकत्रित यांच्या कविता गायचे. मला छान वाटायचं. आपल्या खेडय़ात आपल्या झोपडीस शोभा आली असं वाटायचं.’’ त्या काळी नरहर कुरुंदकर, वा. ल. कुलकर्णी, पुलं-सुनीताबाई देशपांडे, बा. भ. बोरकर, विजया राजाध्यक्ष, नाना पाटेकर, स्मिता पाटील, जब्बार पटेल, इतकेच नाही तर यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण, शरद पवार, अ. र. अंतुले, वसंतदादा पाटील असे अनेक राजकारणीही येऊन गेल्याचं त्या सांगतात.

ना.धों.च्या कवितांची मेजवानी मिळाल्यानंतर सुलोचनाबाईंच्या हातच्या मांडे, खापराच्या पुरणपोळय़ा, खीर, भज्यांच्या मेजवानीवर ताव मारत हे पाहुणे तृप्त होत असत. त्यांच्या हातचा मुगाचा शिरा तर सगळय़ांना इतका आवडत असे, की एकदा मंगेश पाडगावकर आणि विंदांनी जेवण बाजूला ठेवून मुगाच्या शिऱ्याचंच जेवण केलं होतं, अशी गमतीदार आठवणही सुलोचनाबाई सांगून जातात.पण या आनंदालाही दृष्ट लागली ती ना.धों. यांना प्रत्यक्ष वा पत्राद्वारे येणाऱ्या धमक्यांनी. तो फारच अडचणीचा आणि अवघड काळ सुलोचनाबाईंनी खूपच अस्वस्थतेत काढला. एका बाजूला पद्मश्री, साहित्य अकादमी पुरस्कारासारखे मानसन्मान, आमदार होणं, या आनंद देणाऱ्या घटना, तर दुसरीकडे भाऊबंदकीतली मनाला चटके देणारे कटु अनुभव, ना.धों.चा आजार. त्या सांगतात, पळसखेडमधील मजुराचा मुलगा एवढा मोठा झाला, पुढे गेला, या मत्सरातून आमच्या खेडय़ातले इजाजदार, इनामदार पण नंतर कफलल्क झालेली माथेफिरू मंडळी यांना त्रास देत होती. खुनाच्या धमक्यांपर्यंत प्रकरण गेल्यावर तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी ताबडतोब बंदोबस्त करवला.

Advertisement

या काळातली आणखी एक आठवण त्या सांगतात, की या कठीण काळात मृत्यूची सावली यांच्याभोवती असताना यांना सावरलं, बळ दिलं ते पुलं, विशेषत: सुनीताबाईंनी. फोन करून लहान मुलाला समजावतात तसं त्या समजावत, धीर देत. त्यांच्या सततच्या समजूत घालण्यानं यांच्या मनानं पुन्हा उभारी घेतली आणि सारं सुरळीत झालं. ना.धों.च्या कर्तृत्वाला कुणाकुणाचा हातभार लागला, हे सुलोचनाबाई असं नि:स्वार्थीपणे सांगून जातात. पुलंबरोबरच मंगेशकर कुटुंबाचं ऋण त्या मानतात. ‘जैत रे जैत’ या चित्रपटातल्या गाण्यांनी लताबाई, हृदयनाश मंगेशकर, आशा भोसले यांच्याबरोबरचं नातं दृढ करून टाकलं ते त्यांना आयुष्यभर पुरणारं ठरलं.

या संपूर्ण काळात शेत वा रान आणि त्यातल्या कविता हेच या महानोर पती-पत्नीचं जगणं झालं होतं. रानानंच कविता दिल्या आणि कवितांनीच त्यांचं रान सावरलं. शेतात विहिरीचं काम करायचं होतं, पाइपलाइन टाकायची होती. पण पैसे?, हा प्रश्न पडला आणि त्याच वेळी ‘रानातल्या कविता’ला पुरस्कार मिळाला आणि त्या पैशांतून दोन्ही कामं करता आली.

Advertisement

‘ह्या शेताने लळा लाविला असा की,
सुखदु:खाला परस्परांशी हसलो-रडलो
आता तर हा जीवच अवघा असा जखडला
मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द जाहलो’
ना.धों.च्या या हिरव्या बोलीवर सुलोचनाबाई सांगतात, ‘‘कवितेनं शेतीला बळ दिलं..’’

ना.धों.च्या आयुष्यात असं साखरेसारखं विरघळणाऱ्या सुलोचनाबाई कर्तव्यदक्ष माता, अगदी आजीही झाल्या, पण आपलं शेतकरी असणं कधी विसरल्या नाहीत. ‘गुंतलेले प्राण ह्या रानात माझे’, हे त्यांच्यासाठीही तेवढंच सत्य होतं. म्हणूनच रानात बिजबाईची तयारी करताना त्या कंबर कसतात. शेतीत मायेनं निंदणी, डवरणी, कुरपणी करावी लागते, असं सांगत असतानाच तीन पिकांच्या टप्प्यात शेती केली पाहिजे, असं डौलदार शेतीचं रहस्यही सांगून जातात. शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या कारणांचं विश्लेषण करतानाच आता सुशिक्षित स्त्रियांनी शेतीकडे वळायला हवं, त्यांचं व्यवस्थापन आणि शेतीविषयक साहित्याचं वाचनही चांगलं असतं, असं सांगतात, पण ज्या स्त्रिया शेती करतात त्यांच्या कामात पुरुषांनी हस्तक्षेप करू नये, अशी कानपिचकीही द्यायला त्या मागे पुढे पाहात नाहीत.

Advertisement

ना.धों.च्या काव्यमय संसाराला सुलोचनाबाईंच्या व्यावहारिक विचारांची साथ मिळाली म्हणूनच ‘कोणती पुण्ये अशी येती फळाला’, हे ना.धों.चेच शब्द सार्थ ठरवत त्यांचा संसार शांत, समाधानात विसर्जित झाला आणि वेलीच्या आधारानंच झाड जगण्याचा चमत्कार पूर्णत्वास गेला..
arati.kadam@expressindia.comSource link

Advertisement