समाजाचे देणे


  पदवी मिळवणारी पहिली भारतीय दृष्टिहीन स्त्री होण्याचा मान त्यांनी मिळवला. पण त्यांची स्वप्नं, ध्येयं इतकी छोटी नाहीतच.

  Advertisement

  रेश्मा भुजबळ

  उर्वी जन्मापासूनच दृष्टिहीन होत्या, पण स्वावलंबनाचे धडे लहानपणापासूनच गिरवल्याने त्यांना कधी कु णाच्या सहानुभूतीची गरज लागली नाही, की दयेची. म्हणूनच सामान्य मुलांबरोबर शिक्षण घेत असतानाच त्या जिम्नॅस्टिक्स, घोडेस्वारी, गिर्यारोहणही करत होत्या. इंग्रजी साहित्य आणि इतिहास या विषयांत त्यांनी पदवी मिळवलीच, पण जर्मनीला एकटीने जाऊन जर्मन भाषेत संशोधन करून ‘पीएच.डी.’ पदवी मिळवणारी पहिली भारतीय दृष्टिहीन स्त्री होण्याचा मानही मिळवला. त्यांचा विषय होता, ‘अ‍ॅस्थेटिक्स ऑफ नॉन-व्हिज्युअल’ आणि त्यातूनच दृष्टिहीनांच्या पंचेंद्रिय क्षमतेचा वापर करत रोजगारनिर्मितीच्या वाटा दाखवणाऱ्या ‘अ‍ॅस्थेसिस फाऊंडेशन फॉर व्हिज्युअली इम्पेअर्ड’ या संस्थेचा जन्म झाला.’ परफ्युमरी, वाईन टेस्टिंग, कॉफी टेस्टिंग, यातल्या अभ्यासक्रमांना सुरुवात झाली. कोणाची दया न स्वीकारता आपल्या पायांवर उभे राहण्याचे प्रशिक्षण, तेही मोफत देऊन समाजाचे देणे समाजाला देणाऱ्या  उर्वी जंगम म्हणूनच आहेत यंदाच्या ‘लोकसत्ता दुर्गा.’ 

  Advertisement

  जागेपणीच, मात्र बंद डोळ्यांआड    पाहिलेली स्वप्ने सत्यात उतरवण्यासाठी त्यांनी अविश्रांत मेहनत घेतली. त्याचेच फळ म्हणून जर्मनीमध्ये जाऊन जर्मन भाषेत संशोधन करून ‘पीएच.डी.’ पदवी मिळवणारी पहिली भारतीय दृष्टिहीन स्त्री होण्याचा मान त्यांनी मिळवला. पण त्यांची स्वप्नं, ध्येयं इतकी छोटी नाहीतच. त्यांना आता वेध लागले आहेत त्यांच्यासारख्या अनेकांच्या स्वप्नांना बळ देण्याचे. त्यासाठी त्यांनी एका संस्थेची स्थापना केली आहे. त्या माध्यमातून अंध व्यक्तींमधील व्यवसायाभिमुख कौशल्ये विकसित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ही ध्येयवेडी व्यक्ती म्हणजे उर्वी जंगम. 

  आई-वडिलांच्या प्रयत्न आणि प्रोत्साहनामुळे उर्वी दृष्टिहीन असूनही विशेष मुलांच्या शाळेत न शिकता सामान्य मुलांच्या शाळेतच शिकल्या. सामान्य मुलांप्रमाणे सर्व खेळ, संगीत, वक्तृत्व स्पर्धा यात त्यांचा सहभाग असायचा. शालेय जीवनात जिम्नॅस्टिक्स, घोडेस्वारी, गिर्यारोहण अशा अनेक साहसी खेळांद्वारे उर्वी यांनी त्यांचे अनुभवविश्व समृद्ध केले. शालेय शिक्षणानंतर त्यांनी पुण्याच्या ‘फग्र्युसन महाविद्यालया’मध्ये अकरावी-बारावीसाठी जर्मन भाषा निवडली. त्यानंतर त्यांनी मुंबईतील ‘मॅक्सम्युलर भवन’मधून जर्मन भाषा अभ्यासक्रमाचे सात स्तर पूर्ण केले. हा अभ्यासक्रम पदवी अभ्यासक्रमासमान मानला जातो. हे करत असतानाच उर्वी गोरेगावच्या ‘पाटकर वर्दे महाविद्यालया’तून ‘इंग्लिश लिटरेचर’ आणि इतिहास या विषयांच्या पदवीचा अभ्यासही करत होत्या. त्यासाठी चर्चगेटहून गोरेगावला लोकलमधून- म्हणजे प्रचंड गर्दीतून प्रवास करण्याची कसरत त्या चिकाटीने करत असत.

  Advertisement

  पुढे उर्वी यांनी मुंबई विद्यापीठातून जर्मन भाषेमध्ये ‘एम.ए.’ करण्याचा निर्णय घेतला.  ‘एम.ए.’ करणाऱ्या त्या पहिल्याच दृष्टिहीन विद्यार्थिनी होत्या. जर्मन भाषेचे सात स्तर असोत, की ‘एम.ए.’चा अभ्यास; तो करण्यासाठी त्यांनी स्वत:ची अभ्यासपद्धती विकसित केली. वर्गात होणारी लेक्चर्स रेकॉर्ड करायची, ती ऐकून नोट्स काढायच्या, पुस्तकांचे स्कॅनिंग करून ‘ओसीआर’ (ऑप्टिकल कॅरॅक्टर रेकग्निशन) सॉफ्टवेअरद्वारे ती संपादित करायची, असे त्या करू लागल्या. एक पुस्तक स्कॅन करायला, संपादन करायला त्यांचे ६ ते ८ तास खर्ची पडायचे. उर्वी सांगतात, ‘‘मला मुळातच सबब देणे किंवा अपंगत्वाच्या नावाखाली सवलत घेणे कधीच आवडले नाही. त्यामुळे सगळे अभ्यासक्रम मी सामान्य विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या कालावधीतच पूर्ण केले.’’ २०११ मध्ये ‘एम.ए.’ पूर्ण झाल्यावर त्या पहिल्या प्रयत्नातच ‘यूजीसी नेट’ परीक्षा उत्तीर्ण झाल्या. पुढे काही काळ मुंबई विद्यापीठाच्या जर्मन विभागात मानद व्याख्यात्या म्हणून त्यांनी कामही केले.

  दरम्यानच्या काळात त्यांनी ‘ऐबरहार्ड कार्ल्स ओनिवेरझिटेट टय़ुबिंगन’मध्ये ‘वर्ल्ड ऑफ व्हॅल्यूज’ या प्रोजेक्टअंतर्गत निबंध लिहून पाठवला. जगभरातील १०० निबंधांतून १० जणांच्या निबंधांची निवड करून ते प्रकाशित केले जातात आणि त्यांना जर्मनीमध्ये राहून सहा महिने अभ्यास करण्याची संधी मिळते. या दहा जणांत उर्वी यांची निवड झाली आणि त्यांनी जर्मनीमध्ये एकटीने राहून सहा महिने अभ्यास केला. त्यातूनच त्यांना त्यांच्या ‘पीएच.डी’चा ‘अ‍ॅस्थेटिक्स ऑफ नॉन व्हिज्युअल’ हा विषय मिळाला. त्यांनी जर्मन आणि भारतीय सौंदर्यशास्त्राचा तौलनिक अभ्यास करायचे ठरवले. त्यासाठीच्या संशोधनासाठी त्यांना ‘जर्मन अ‍ॅकॅडमिक एक्स्चेंज सव्‍‌र्हिसेस’ची दोन वर्षांची शिष्यवृत्ती मिळाली. पहिल्यांदा त्या जर्मनीला गेल्या, तेव्हाचा प्रवास त्यांनी पालकांबरोबर केला. मात्र, ‘पीएच.डी.’करिता संशोधनासाठी जाताना त्यांनी प्रवासापासूनच अनुभवविश्व समृद्ध करण्याचा निर्णय घेतला आणि एकटीनेच ग्योंटिगेन येथे पोहोचल्या. तिथे उर्वी स्वत:चे जेवण, प्रवास आणि विद्यापीठातील संशोधन, अभ्यास एकटीने करायच्या. २०१६ मध्ये एका परिषदेसाठी जर्मनीहून त्या एकटय़ाच अमेरिकेलाही जाऊन आल्या. २०१९ मध्ये त्यांना मुंबई विद्यापीठाची डॉक्टरेट मिळाली. मात्र जर्मनीत असताना अडचणींचा सामना करणे, नोकरी शोधताना सामान्यांशी तुलना आणि त्यामुळे निर्माण होणारे अंतर, हे सर्व अनुभवायला मिळाले. उर्वी म्हणाल्या,‘‘आर्थिकदृष्टय़ा मी सक्षम असतानाही आणि परदेशातही मला अशा अनुभवांना सामोरे जावे लागत होते, तर आपल्या देशातील ग्रामीण भागातील अपंगांची काय स्थिती असेल? हा प्रश्न मनात आला आणि  त्यांच्या स्वावलंबनासाठी मी काय करू शकते या विचारातूनच ‘अस्थेसिस फाउंडेशन फॉर व्हिज्युअली इम्पेअर्ड’ या संस्थेचा जन्म झाला.’’

  Advertisement

  प्रबंधात मांडलेल्या ‘अदृश्यरस’ या त्यांच्या संकल्पनेचा उपयोग  त्यांनी व्यावहारिक पातळीवर करण्याचे ठरवले. अंध व्यक्तीच्या निरीक्षणक्षमता, सौंदर्य आकलनक्षमता यांच्यासह पंचेंद्रियांपैकी डोळे सोडून इतर इंद्रियांचा वापर करून जीवनावश्यक आणि व्यवसायाभिमुख कौशल्ये विकसित करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. २०२० मध्ये जर्मनीहून परतल्यानंतर त्यांनी फाऊंडेशनतर्फे दृष्टिहीनांसाठी तीन अभ्यासक्रम सुरू केले. यात सहा महिन्यांचा बेसिक कोर्स, १ वर्षांची पदविका आणि २ वर्षांची प्रगत पदविका (अ‍ॅडव्हान्स्ड डिप्लोमा) यांचा समावेश आहे. यात मुलांचे इंग्रजी भाषेचे ज्ञान, संगणक, इतर तांत्रिक उपकरणे, यांच्यासह व्यावहारिक ज्ञान (मोबिलिटी ट्रेनिंग) देण्यात येते. तर पदविका अभ्यासक्रमामध्ये प्रगत संगणक ज्ञान, व्यक्तिमत्त्व विकास, संवाद कौशल्य, परदेशी भाषा, संगीत, वेगवेगळ्या गंधांची माहिती असा अभ्यासक्रम आहे.  प्रगत पदविका अभ्यासक्रमामध्ये वरील विषयांच्या प्रगत अभ्यासासह परफ्युमरी, वाईन टेस्टिंग, कॉफी, चहा टेस्टिंग याचे सखोल व्यावसायिक प्रशिक्षण प्रात्यक्षिकाद्वारे दिले जाते. या प्रशिक्षणाद्वारे अंध विद्यार्थ्यांना रोजगाराच्या चाकोरीबाह्य़ संधी उपलब्ध करून देण्याचा उर्वी यांचा मानस आहे. भारतातच नव्हे, तर परदेशातही अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम आहे. सध्या १६ ते ३५ वयोगटातल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. हे सर्व अभ्यासक्रम दृष्टिहीनांसाठी मोफत उपलब्ध आहेत. या प्रशिक्षणात त्यांनी परदेशी भाषांचे अभ्यासक्रम स्वत: विकसित केले आहेत. सध्या हे अभ्यासक्रम करोना साथीमुळे ऑनलाइन सुरू आहेत. लवकरच ते निवासी स्वरूपात सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठीची जुळवाजुळव आता सुरू आहे.   केवळ ३२ व्या वर्षी समाजाचे देणे देण्याचे ध्येय ठेवणाऱ्या या ध्येयवेडीचे आयुष्य म्हणूनच आदर्शवत!

  मुख्य प्रायोजक :     

  Advertisement

  * ग्रॅव्हीटस फाऊंडेशन

  सह प्रायोजक : 

  Advertisement

  * महाराष्ट्र औद्योगिक  विकास महामंडळ, 

  * व्ही. पी. बेडेकर अ‍ॅँड सन्स प्रा. लि. 

  Advertisement

  *  सनटेक रिअल्टी लि.

  *  बुलडाणा अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटी लि.

  Advertisement

  पॉवर्ड बाय :

  * प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी, शिवाजीनगर, पुणे,

  Advertisement

  * राष्ट्रीय केमिकल्स अ‍ॅण्ड फर्टिलाइजर्स लि.

  संपर्क

  Advertisement

  उर्वी जंगम

  पत्ता- फ्लॅट ८०१, त्रिवेणी सुचिधाम कॉम्प्लेक्स, दिंडोशी बस डेपोजवळ, मालाड पूर्व, मुंबई- ४०००९७ संपर्क क्रमांक- ९०३३३०३३९३ ई-मेल – [email protected]

  Advertisement

  लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.  Source link

  Advertisement

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here