समष्टी समज : समूह


डॉ. प्रदीप पाटकर हे ‘एम.डी.’ (मेंदू व मनोविकार) असून ते गेली ३८ वर्ष मनोविकारतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत.

Advertisement

डॉ. प्रदीप पाटकर

डॉ. प्रदीप पाटकर हे ‘एम.डी.’ (मेंदू व मनोविकार) असून ते गेली ३८ वर्ष मनोविकारतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. बालमानसशास्त्र आणि विवेकी पालकत्व या विषयात त्यांचा विशेष अभ्यास आहे. ‘प्रश्न निर्माण करणारी मुले’ या विषयावर त्यांनी संशोधन केलं असून अशा मुलांच्या शैक्षणिक पुनर्वसनासाठीही काम केलं आहे. लातूर भूकंपग्रस्त, गारपीटग्रस्त, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या घरी जाऊन मानसोपचारांचं कार्य, समाजात मानसिक आरोग्याबाबत मदतकार्य उभारण्यासाठी ‘मानसमित्रां’चं संघटन उभारण्याची संकल्पना, हे त्यांच्या कामाचे इतर पैलू. ‘मुंबई सायकियाट्रिक सोसायटी’चे ते (माजी) कार्यकारिणी पदाधिकारी आहेत.

Advertisement

आताचं शतक मानसिक अनारोग्याचं शतक ठरेल की काय ही भीती खरी ठरते आहे. वैयक्तिक आरोग्याचा विचार नेहमीच होत असतो, मात्र समाज म्हणून  काही प्रश्न हे सगळय़ांचे असतात. सामूहिक दंगे, झुंडीचा हिंसाचार, धार्मिक- जातीय- वर्गीय तेढ, व्यसनांचा व अंधश्रद्धांचा सुकाळ, वेगवेगळय़ा रोगांच्या साथी, दुष्काळ, पूर, शेतकऱ्यांच्या, विद्यार्थ्यांच्या आत्महत्या अशा किती तरी गोष्टी. अशा वेळी कस लागतो तो समूह-मानसिकतेचा. लोक एकत्रितपणे त्या गोष्टीचा कसा मुकाबला करतात त्यावरून समाजाचे आरोग्य ठरत असते. हे सदर याच समूह-मानसिकतेचा विचार करणार आहे. समष्टी समज वाढवणारे हे सदर दर पंधरवडय़ाने. हे शतक अनेक दृष्टीनं बदलाचं, उलथापालथीचं शतक ठरलं असं म्हणायला हरकत नाही. हरित क्रांती, औद्योगिक क्रांती, माहिती क्रांती, दळणवळण क्रांती ही सर्व क्रांतियुगं एकापाठोपाठ घडत आली. आता तर त्या सर्व क्षेत्रांमध्ये तंत्रजाल तीव्र गतीनं बदल घडवत आहे. अशा काळात माणसांचं राहणं बदललं, भौतिक जगणं पूर्वीपेक्षा सोपं झालं. पण जीवनार्थ समजणं क्लिष्ट झालं. मेंदूतली ‘हार्ड डिस्क’ तेवढीच राहिली. त्यावर नवं अवाढव्य विस्तारलेलं जग समजून घेत, नव्या बदलांशी जोडून घेण्याचं प्रचंड दडपणही आलं. या सगळय़ात मन अभंग ठेवण्याची कसरत सोपी नाही. विचारा नव्या पिढीला!

  संस्कृती उत्कर्ष पावते ती व्यवहारात विवेक व नीती उतरली व ऊर्जा टिकून राहिली तर! पण आता तर प्रवाह अतिवेगवान झाला, नीती विवेकाचा आधार पुरेनासा झाला, ऊर्जा कमी होत चालली, माणसं अकाली अशक्त होऊ लागली. भूतकाळाशी जोडलेले पाश काही काळ भ्रामक सुरक्षितता व स्थैर्य देतात, पण मग समाजमानस वेळीच भूतकाळ सोडायला तयार होत नाही. अस्थिर वर्तमान पाय रोवून स्थिर उभं राहू देत नाही. स्थैर्य, नंतर यश, मग जीवनाची अर्थपूर्णता हे विकासाचे टप्पे माणसांनी गाठायचे कधी, कसे? साध्या सरळ माणसाला एकटय़ानं उत्तरांचा शोध घेत या प्रश्नांशी झुंजता येत नाही. नव्या जगातील ताणतणाव वाढवणारे प्रश्न वैयक्तिक भासत असले तरी प्रत्यक्षात ते सामूहिक प्रश्नांतून जन्मतात. म्हणून अनेकांना एकत्र येऊनच ते सोडवावे लागतात. एकतर्फी प्रेम, त्यात घडणारी हिंसा, कौटुंबिक दडपशाही, सामूहिक दंगे, झुंडीचा हिंसाचार, धार्मिक- जातीय- वर्गीय तेढ, व्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच, राजकीय-आर्थिक शक्तीतून प्रकटणारा उन्माद, व्यसनांचा व अंधश्रद्धांचा सुकाळ, फोफावलेला चंगळवाद, सार्वजनिक जीवनातील बेशिस्त (उदा. करोना साथीत घेण्याच्या काळजीतील बेफिकिरी) अशी अनेक मनानं आजारी असलेल्या समाजाची उदाहरणं आजूबाजूस दिसून येतात. येथे मनावर प्रभाव दिसून येतो तो समूह-मानसिकतेचा. यात केवळ वैयक्तिक पातळीवर मानसिक आरोग्याचा विचार व उपचार करून विशेष काही साधणार नाही. हे सारे अविवेक समूहमनात कसे व का रुजत जातात? हे समूह-मानसिकतेचे प्रश्न फक्त सुधारकांनी विचारात घ्यायचे की सर्वानी मिळून? याची उत्तरं शोधली पाहिजेत. म्हणूनच हे सदर समष्टी मनाचा शोध घेणारं.

Advertisement

सध्याचा काळ संस्कृती-संभ्रमाचा आहे असं समजावं तर इतिहास सांगतो, की माणसांचा सदासर्वकाळ स्थायिभाव हाच तर राहत आला आहे! वादळात सापडलेले आधारहीन लोक, चहुबाजूंनी समस्यांच्या वावटळी,अविवेकी विचारांनी प्रदूषित झालेली मनं. सर्वसमावेशक, कल्याणकारी विकासाचा विचार विसरलेल्या, नव्हे तो विचार झिडकारलेल्या शासन व्यवस्था. समाजातले विवेकाचे विझलेले दीपस्तंभ. फुटल्या नौकांच्या फळय़ांना लटकून कशीबशी जीव सांभाळणारी माणसं. प्रदीर्घ वादळी रात्र, पहाटेचं कुठे चिन्ह नाही, किनाऱ्यापाशी अजस्त्र खडकांच्या रांगा, अंगावर झेपावणाऱ्या तत्त्वशून्य अविवेकी लाटा, असं दृश्य डोळय़ासमोर उभं राहतं. अर्थात इतकं काही वाईट चित्र नाही, पण तरी आहे त्या परिस्थितीत आपल्याला कसं सांभाळायचं? अपकर्ष थांबवून उत्कर्ष कसा साधायचा? न्याय, सामाजिक बांधिलकी, सहिष्णुता, उदारमतवाद, नीती ही मूल्यं आपल्याला वाचवतील आणि अतिरिक्त व्यक्तिवाद, सार्वत्रिक आणि सार्वजनिक भ्रष्टाचार रसातळाला नेईल, हे एकमेकांना

कसं समजवायचं?

Advertisement

आपण कालौघात मनानं बदललो आहोत. म्हणून आजवर रुजलेले व्यवहार, प्रचलित मूल्यं, लोकमान्य रीतिरिवाज, श्रद्धा, कर्मकांडं यांचं पुनरावलोकन करायला हवं. या बाबतीत मानवी इतिहासात झालेल्या प्रयत्नांकडे वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या आधारे पाहिलं पाहिजे. ‘सोशल सायकियाट्री’ या विज्ञान शाखेतील संशोधन, निरीक्षणं कशी उपयोगी ठरतील याचा शोध घेतला पाहिजे. विकसित होताना आधुनिक मानसशास्त्र व मनोविकारशास्त्राच्या अभ्यासात काही वैचारिक क्रांती घडल्या. नैतिक जाणिवेतून फिलिप पिनेल व डोरोथी डिक्स यांनी केलेली जनजागृती (इ. १७४५-१८८७), पॅकार्ड, बिअर्स, मेयेर, जेम्स  (१८८७-१९१०) यांनी उभारलेली मानसिक आरोग्याची चळवळ, ‘कम्युनिटी सायकियाट्री’नं पुढे नेलेली सामाजिक मनोस्वास्थ्याची चळवळ आणि त्यात ‘न्यूरोसायकियाट्री’नं विविध संशोधनांद्वारे माहिती व उपचारांची घातलेली भर उल्लेखनीय आहे. पूर्वी (२००७ ते २००९) मनोविकारांबाबत मी आपल्याशी ‘लोकसत्ता’मधूनच संवाद साधला आहे. त्यानंतर आजपर्यंत मनोविकारांच्या उपचारपद्धतीत व व्यवस्थेत निश्चित सुधारणा झाल्या आहेत. आजवर हे मनोविकार वैयक्तिक पातळीवर बरे करण्याचे प्रयत्न आपण करत आलो आहोत. सोशल सायकियाट्रीतील उपक्रमांच्या अभ्यासानं एकूण जनमानसात व व्यवस्थेत काही चांगले बदल घडवता येतील का, हे पाहिलं पाहिजे.

जागतिकीकरण, तंत्रजालाचा वापर व व्यापारीकरण यांच्या प्रभावाखाली येऊन, मानवी समूह बऱ्याचदा तात्कालिक परिस्थितीवर विवेकी-अविवेकी प्रतिसाद देताना दिसतो. परिस्थिती प्रतिकूल होत गेली की माणसं अस्वस्थ, संतापी, बेभान, अंधश्रद्धाळू होत जातात, त्यांच्या मनांना खोलवर तडे जातात. काही माणसं प्रक्षुब्ध होऊन तोडफोड करतात वा हतबल होऊन स्वत:च मोडून पडतात, दिशाहीन होऊन एक तर सैरावैरा पळू लागतात वा मिळेल त्या नेत्याला पकडून तो सांगेल त्याला मारतात, प्रसंगी स्वत: मरतात. काही माणसं मुर्दाड बनतात. काही दैववादी, काही आळशी, निष्क्रिय होतात. मात्र काही माणसं बिकट परिस्थितीचं शांतपणे निरीक्षण करतात व काही तरी कृती सुरू करतात. त्यातून कधी काहीच होत नाही, कधी परिवर्तन होतं. दूरदृष्टी असलेले काही सुधारक समाजाला या लाटेतून तारतात. ही प्रगतीची लाट असल्यानं काही काळात तीही निसर्गत:च ओसरते हेही खरं.

Advertisement

आताचं शतक मानसिक अनारोग्याचं शतक ठरेल की काय ही भीती खरी ठरते आहे. पालक व मुलं यांचे नातेसंबंध तणावपूर्ण होत आहेत.  मुलं ‘आपली’ कशी होणार? ती तर ‘मार्केट’ची होत चालली आहेत! बाजार त्यांनी कसं राहायचं- बोलायचं, काय शिकायचं, कसं प्रेम करायचं ते शिकवतो. हळूहळू मुलांना नात्यांविषयी दूरत्व, जगाविषयी भीती, नीतिमूल्यांबाबत निर्थकता व भविष्याविषयी अनिश्चितता वाटते. दुभंगलेले आदर्श, घरघर लागलेली कुटुंबव्यवस्था, अराजकी आर्थिक- सामाजिक- राजकीय परिस्थिती, घसरत चाललेली नीतिमूल्यं, या सगळय़ा अडचणींशी आपण व आपली मुलं कसं समायोजन साधू शकू? जागतिक पातळीवर टिकण्यासाठी ही मनं सशक्त, सुसंस्कृत व्हायला हवीत. अन्यथा स्ट्रेस डिसऑर्डर्स, व्यसनाधीनता, भावशून्यता, नैराश्य व इतर मनोविकृती, सदोष व्यक्तिमत्त्वं, आदींचं प्रमाण वाढू शकेल. ‘वल्र्ड ट्रेड सेंटर’वरील हल्ला, आखाती व इतर युद्धं, दहशतवादी कृत्यं, स्वार्थाध युद्धखोर राज्यकर्ते, धार्मिक उन्माद, वंश-वर्ग संघर्ष, अमानुष आर्थिक धोरणं, जगभर घडलेली/ घडवलेली विस्थापना, मानसिक अनारोग्य, यांनी अनेक लक्षवेधी प्रश्न उभे केले आहेत. वाढती गुन्हेगारी, हिंसा, स्त्रियांच्या, विद्यार्थ्यांच्या, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, सधन-निर्धनांतील वाढतं अंतर तथाकथित विकासाच्या प्रारूपाबद्दल गंभीर प्रश्न उभे करीत आहेत. या अशा वादळी परिस्थितीत मनाचं संतुलन सांभाळणं कठीण जात आहे. व्यवस्थेवर उपचार करता येत नाहीत, म्हणून मग व्यवस्थेच्या बळींवर उपचार करत बसावं लागतं. हे असं किती काळ चालणार? आणि त्यातून काय साधणार, हा कळीचा प्रश्न आहे.

आपण रोज समोर भेटणाऱ्या व्यथित माणसांच्या संदर्भात सामाजिक पालकत्वाच्या भूमिकेत शिरायला हवं. बारकाईनं पाहता समाजात विविध प्रकारे असं पालकत्व आकारताना दिसतं. शाळा मुलांचं, तर डॉक्टर्स रुग्णांचं पालकत्व निभावतात. सामाजिक कार्यकर्ते, राज्यकर्ते, शासन व्यवस्था, साहित्यिक, शास्त्रज्ञ, विचारवंत, कलाकार, स्वयंसेवी संस्था, धर्मादायी संस्था, आध्यात्मिक प्रेरणेनं काम करणारे समूह, असे अनेक या समाजाच्या संगोपनातील वेगवेगळय़ा जबाबदाऱ्या उचलत असतात. त्यांच्या प्रयत्नांतून उद्याची पिढी स्वावलंबी, प्रयत्नवादी व विवेकी घडत जाते.  समाजाचं पालकत्व बेजबाबदारीनं हाताळलं गेलं की नवीन पिढीचं भवितव्य धोक्यात येतं. आपण सारे हे उत्तरदायित्व कसं निभावत आहोत? या प्रयत्नांना सर्वसमावेशक आकार कसा देता येईल? शासनाकडून यात काय योगदान मिळवता येईल? यासाठी होणाऱ्या प्रयत्नांत आपण सक्रिय सहभाग घेतला पाहिजे. सामाजिक चळवळींमध्ये हे पालकत्व जाणवतं. हताश, दुर्बळ सर्वहारांना आधार देऊन उभं करणं, संविधानानं दिलेल्या हक्कांची जाणीव करून देणं, एकजुटीचं सामर्थ पटवून देणं, त्यांच्या पोषणाची, रोजगाराची, प्रगतीची संधी मिळवून देण्याची अनेक कामं सामाजिक पालकत्वाचीच कामं आहेत. ‘सेझ’ग्रस्तांसाठी लढा देताना, आदिवासी समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी लढताना, अंधश्रद्धा निर्मूलनात विवेकी विचारपद्धतींचा वापर करताना, शाळांमध्ये विवेकी वैज्ञानिक अध्ययन पद्धतींचा प्रसार करताना वेळोवेळी मला हे सामाजिक पालकत्व जाणवत राहिलं.

Advertisement

 करोनाच्या महासाथीत जिवासहित सर्वस्व गमावणारे अनेक दिसले. घरातील माणसाच्या मृत्यूमुळे मनं उद्ध्वस्त झालेले कुटुंबीय पाहिले. मृत्युभयानं ग्रस्त माणसांकडून अवास्तव, अवाजवी नफा उकळणारे मांत्रिक- केमिस्ट- डॉक्टर- रुग्णालये जसे पाहिले तसे स्वत:चा जीव धोक्यात घालून इतरांचा जीव वाचवणारे कित्येक शिस्तशीर, कर्तव्यदक्ष, आरोग्यसेवी डॉक्टर्स, केमिस्ट, आरोग्य कर्मचारीही दिसले. आपल्या लक्षात आलं असेल, की जाणारे आणि वाचलेले यात एक महत्त्वाचा वर्ग सतत कार्यरत असतो. तो स्वयंसेवक असतो, योग्य वेळी प्रवेशतो, आपलं काम चोख व निरपेक्ष करतो, शांतपणे स्टेजवरून एक्झिट घेतो. स्वत:चं तन-मन-धन खर्च करून, जीव त्रासात घालून तो हे काम का करतो, कशासाठी करतो? आपल्या आजूबाजूच्या जगात ही अशी सेवाव्रती माणसं संख्येनं अधिकाधिक वाढवता आली, प्रशिक्षित करता आली, तर एकूण समाजाचं मानसिक-शारीरिक आरोग्य किती तरी सुधारू शकेल. या प्रेरणांचा अभ्यास मानसशास्त्र- त्यातील ‘सोशल सायकियाट्री’ ही शाखा करत असते. त्याचा विचार करत सेवावृत्ती स्वत:च्या घरापासून विश्वापर्यंत विस्तारित कशी करता येईल? याचा विचार करत समष्टी मन घडवायचं आहे. [email protected]

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Advertisement

Source link

Advertisement