समष्टी समज : भिऊ नकोस, मी आहे तुझ्यासोबत.. | Samashti samaj author dr pradeep patkar population Psychologist Mental diseases society psychiatry ysh 95– डॉ. प्रदीप पाटकर

Advertisement

आपल्या एवढय़ा मोठय़ा लोकसंख्येला पुरतील इतके मानसतज्ज्ञ, इतक्या मानसिक आजारांवरच्या सुविधा आपण निर्माण करू शकू की नाही, याबद्दल साशंकताच आहे. पण समाजात अजूनही अशी मंडळी आहेत, ज्यांची दुसऱ्याचं दु:ख हलकं करण्यासाठी हात पुढे करण्याची तयारी आहे. या खऱ्याखुऱ्या माणसांना आपण मानसोपचारांमध्ये प्राथमिक मदत देणारे ‘मानसमित्र’ म्हणून निश्चित तयार करू शकतो. जे संकटातल्या लोकांना आश्वस्त करत सांगतात, ‘भिऊ नकोस, मी आहे तुझ्यासोबत..’ अनेक ठिकाणी प्रभावी ठरलेल्या या प्रयोगाची सुरुवात व्हायला माणसांची कशी मदत झाली, त्याची ही कथा..

वर्ष १९९३. स्थान सास्तुर. स्थिती भयानक विध्वंसकारी लातूर भूकंपानंतरची. दुपार टळली होती. छोटय़ा टेकाडावरून समोर पाहिलं, तर समोर जिथे घरं होती तिथे केवळ रबल/ डेब्रिजचे मोठमोठे ढिगारे, एकाला लागून एक. लांबवर दिसतंय तिथपर्यंत केवळ दगडामातीचे ढीग! ढिगामध्येच तुटलेले दरवाजे, खिडक्यांची फळकुटं. आजवर त्या दारांमधून नव्या आयुष्याची उत्सुक स्वप्नं उंबरठा ओलांडून आत आली असतील, हातांनी गजांना धरून अनेक डोळय़ांनी आयुष्याची स्वप्नं आकाशाच्या उपलब्ध तुकडय़ात रेखाटली असतील.. पण आज ते सारं नाहीसं झालं होतं.. अचानक झुळूक आली ती सोबत मृत्यूचा, जळणाऱ्या प्रेतांचा परिचित, नकोसा, कुजट वास घेऊन!

Advertisement

मग समोरचं काही दिसेचना. जगण्यातली क्षणभंगुरता हृदय चिरत गेली आणि वास्तव समोर जाळ पेटवून चितांसह धडधडू लागलं. एका ढिगाऱ्यावर कसाबसा जाऊन बसलो. या ढिगाऱ्याखाली एक मोठं कुटुंब काही दिवसांपूर्वी राहात होतं. जवळजवळ त्या सर्वानाच भूकंपानं चिरडलं. एक वयोवृद्ध माणूस फक्त वाचला आहे, असं मघा एका कार्यकर्त्यांनं सांगितलं होतं. मी खालच्या दगडावर थोडा टेकलो आणि मग काहीच कळेचना.. निडर मनाचा मी, एक प्रशिक्षित मानसतज्ज्ञ, पण मनातला आतापर्यंत भावना अडवणारा बांध अचानक फुटला. गुडघ्यात मान खुपसून हुंदके देत रडू लागलो. हे असं विपत्तीग्रस्त भागांत फिरताना (रायगड पूर १९८९, पनवेल पूर २००५, बीड, उस्मानाबादमधली गारपीट इत्यादी) होतंच. हा मनाचा कमकुवतपणा नसतो. निसर्गासमोरची आपली हतबलता लक्षात येते आणि समोरचा ताजा, उग्र, अमानुष विध्वंस (नैसर्गिक असो, वा मानवानं घडवलेला) समोर उभा राहतो, तेव्हा असं कुणाही माणसाचं आतून बाहेरून होतच असतं. प्रबोध दळवी, माझा मित्र आणि पनवेलचा एक नि:स्पृह, संवेदनशील, आदर्श कार्यकर्ता बरोबर होता. तो सात-आठ फूट पलीकडे बाजूच्या एका फळीवर बसला होता. त्याच्या मूक साथीनं मला स्वत:ला सावरायला खूपच मदत केली.

उन्हं उतरली, खाली आलो. खाली त्या घरातले उरलेले (!) आजोबा उभे होते. आम्ही गळाभेट घेतली आणि एकमेकांना थोपटत  अश्रूंना वाट करून दिली. मग दोघांनाही हलकं वाटलं. दु:ख तर तसंच होतं, विध्वंस समोर तसाच होता. त्यांचं सारं घर, घरातले सारे कधीच परत येण्यापलीकडे गेले होते. अंगाखांद्यावर खेळवलेले नातू आणि नात भूकंपात कायमचे दिसेनासे झाले होते. तरीही अव्यक्त ते मुक्त झाल्यानं त्यांना हलकं वाटलं असावं. काय वादळ त्यांच्या मनात रोज उफाळून येत असेल? त्यांना त्यांचे आजवर त्या घरात घालवलेले दिवस आठवत असतील. आजवरचं सारं आयुष्य डोळय़ांसमोर उभं राहिलं असेल. बालपणी ज्यावर ठेचकाळले तो उंबरठा डोळय़ांसमोर दिसला असेल. आतापर्यंत होतं ते आयुष्य मागे अचानक हरवलं आणि भविष्य समोर भीषण, अनाकलनीय अंधार बनून उभं राहिलं असेल. गळामिठीत ते तो अंधार मिठीत घेण्याचा प्रयत्न करत होते का? अशानं तो परका अंधार ओळखीचा होणार होता का? त्यांचं दु:ख माझ्या सहवेदनेत जसं काही विरघळत होतं. अशा आत्यंतिक दु:खात शब्द परके होत जातात आणि स्पर्श खूप आत खोलवरचं सांगू लागतात. आजोबा सावरण्यासाठी धीर मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते आणि हा अफाट विध्वंस पाहून आतून हादरलेल्या मला जागीच टिकून राहायला आधार मिळत होता. मानसिक प्रथमोपचार हा असा दोघांनाही सावरत असतो, आधार घेणाऱ्याला व देणाऱ्यालाही!

Advertisement

सुखाच्या क्षणात सोबत सुख वाढवते आणि दु:खात ती मन सावरायला मदत करते. विपत्त्योतर काळात मदत गटांची विशेष गरज भासते. आजूबाजूला झालेला विध्वंस जीवनाबद्दल अनिश्चितता देतो. आयुष्यातला अर्थच हरवतो. जगण्याची आसक्ती कमी होते आणि विरक्तीसदृश वैफल्य वाढतं. निष्क्रियता मनाचा ठाव घेते. चिंता, नैराश्य आभाळात दाटून येतात. ‘पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसॉर्डर’ (पीटीएसडी), ‘ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसॉर्डर’ (ओसीडी), ‘अग्रेशन’ इत्यादी आजारांचं प्रमाण वाढतं. आधीचे आजार उचल खातात, नवे मनोविकार उत्पन्न होतात. असलेली व्यसनं वाढतात, नवी व्यसनं सुरू होतात. कौटुंबिक आणि सार्वजनिक हिंसाचार वाढतात. शारीरिक, मनोकायिक आजार, आत्महत्या वाढतात. माणसांमध्ये गैरसमज वाढतात, नातेसंबंध बिघडतात. अंधश्रद्धा वाढतात. दैनंदिन व्यवहारात अवैज्ञानिक, अशास्त्रीय गोष्टी वाढतात.

अशा वेळी अशा ठिकाणी सरकारकडून प्राथमिक मानसोपचारांची व्यवस्था व्हायला हवी, हे तर लातूर भूकंपातल्या मानसिक पुनर्वसनाच्या कामातून अधिकच स्पष्ट झालं. पण एकूण गरजेला पुरे पडतील इतक्या मानसोपचार सुविधा, मानसशास्त्रज्ञ, परिचारिका आजही उपलब्ध नसल्यामुळे विपत्ती असो नसो, सर्वसाधारण जनतेपर्यंत अत्यावश्यक उपचार पोहोचू शकत नाहीत आणि मग मानसिक अनारोग्य वाढत राहतं. कितीतरी माणसं उपचारांपासून वंचित राहतात. नवी पिढी आणि कितीतरी नागरिकांचं जीवन खालावतं, भविष्य अंधारतं. अशा वेळी हवे असतात ‘मानसमित्र’. अशा वेळी आवश्यकता असते जागोजागी मदत गट उभे करण्याची.

Advertisement

नंतरच्या आमच्या तिथल्या दर महिन्याच्या नियमित भेटीत ७-८ महिन्यांच्या मानसिक पुनर्वसनाच्या कामात हे कदम आजोबा जमेल तशी मदत करत राहिले. वर म्हणायचे, ‘तुम्हा साऱ्यांच्या मदतीमुळे सावरलो!’ खरं तर आम्ही सोबत केली आणि काही काळातच तिथल्या कामात तेच आमचे पाठीराखे झाले. स्वयंसेवकांची खाण्या-पिण्या-राहण्याची व्यवस्था करण्यात त्यांनी पुढाकार घेतला. मला एकदा म्हणाले, ‘‘डॉक्टर, कुटुंब गेलं आणि मी एकटा पडलो होतो. आता तर या पोरापोरींनी सगळय़ांनी मला मोठं कुटुंब मिळवून दिलं. मरायचं ठरवलं होतं, मरणारच होतो. जगायला यांनी कारण दिलं. काय तरी उपयोग होऊ द्या माझा!’’

असेच एकदा क्लिनिकमध्ये ७० वर्षांचे यादवराव पवार बीड ते पनवेल प्रवास करून एका १६ वर्षांच्या मुलाला घेऊन आले होते. यादवराव पूर्वी माझ्या क्लिनिकला येऊन गेले होते. त्यांच्या घरचा एक माणूस पूर्वी मी बरा केला होता. तेव्हापासूनची आमची ओळख होती. नेहमीचं स्वागताचं संभाषण झालं आणि मग मी इतक्या दुरून येण्याचं कारण विचारलं. सोबतच्या २०-२१ वर्षांच्या तरुणाकडे बोट करत ते मला सांगू लागले. ‘‘मागच्या आठवडय़ात थोडय़ा दूरच्या गावात जत्रेला गेलो होतो. तिथं दुपारच्या टळटळीत उन्हात माझ्यासमोर हे चाललं होतं. थोडं चाललो अन् बघतो काय, तर हे चालता चालता झेलपाटू लागलं. बाजूच्यानाच काय, मलाबी वाटू लागलं की हा जाम पेला असेल आणि चढली आसंल. पर ह्यो गडी एकदम खाली पडला आणि झटके की देऊ लागला. तोंडातून फेश येऊ लागला, आन् मला तुमी आठवले. तुमी आमच्या घरचा असाच प्रकार गोळय़ांनी बरा केला होता. मी समजलो, ही आकडी हाय. झटदिशी त्याच्याभवतीची गर्दी बाजूला केली. कुनी पानी मारीत होते, कुनी गालावर थपडा मारीत होते, कुणी चप्पल नाकाशी धरीत होते, कुणी दातखीळ बसलेली उचकटू लागले होते. ती बी इतक्या जोरात की समदे दातच हातात आले आसते. मी सगळय़ानला बाजूला केलं. त्याला कुशीला वळीवलं, फेश पुसला. शर्ट सैल केला, वारा घातला, हातापायांना झटके थांबेपर्यंत थोडा आधार दिला. सगळे बघत रायले. कुणी म्हणालं, की तुमी डाक्टर हाय का? मी म्हणलं, नाय बा. तुमची आठवण केली आण म्हणलं, अशा वेळी काय करायचं ते शिकलोय मी. हा फीटचा प्रकार हाय. जवळच्या डॉक्टरना बोलवा. तोपर्यंत आपण सांभाळू याला. मग हा जयंता सुद्धीवर आला. तर यालाच फार वाईट वाटू लागलं. गरीब हाय. गरिबीची लाज तर कुनालाबी कुटबी सर्वात घायाळ करती. जयंता बोलीत व्हता, मी ऐकीत होतो. तो म्हणला, की ‘आसं आजारी पल्डय़ाची तर मला लय लाज वाटती. डॉक्टर काय केले नाहीत. असाच कधी चक्कर यिऊन वाटेत पडतो मी. नेमीची गोस्ट. मग आता घरीबी कुणी लक्ष देत न्हाई. नशिबाला दोष देऊन सोडून देतात. त्यांनीबी देवदेवस्की केली आणि नाइलाजानं मग पुढे काय केलं नाही. मीपण असाच मरनार एक दिवस.’ मग मी ईचार केला, त्याच्या घरी जाऊन बोललो. म्हणलं, की आजपासून ही माजी जिम्मेदारी. पैशाचं मी बगतो. अजून गाठीशी पैसे हायेत. जमेल तेवढं करीन. माज्या घरीबी कुणी काय बोलणार नाही. तितका पैसा हाये की कुणी काय बोलत न्हाई. मी समजलो, हा बरा होणार तुमच्याच हिते. मी देवाचं नाव घेतो. तुमी नेमि म्हणता, तसं त्या रोगावर उपाय शोधणाऱ्या दाक्टरांचं नाव घ्या. हून जाऊ द्या.’’ काय बोलायचं? यादवरावाचं बोलणं ऐकल्यावर जाणवलं हा खरा माणूस, त्यांना मन:पूर्वक नमस्कार करत जयंताला तपासू लागलो.

Advertisement

कदम आजोबांनी, यादवरावांनी मला माणसाचं आयुष्य कसं जगावं ते दाखवून दिलं. मानसमित्र कसा असतो ते सांगितलं, शिकवलं. माझ्या मनाला ही संकल्पना भिडली, मनात रुजली. तुमच्यासारख्या अनेकांना ती सांगत फिरतो. आपण एकत्र येऊन समष्टीतले असे अनेक प्रश्न सोडवू शकतो, हा विश्वास आजवर अशा अनेक माणसांनी दिला. संशोधन, पदव्युत्तर शिक्षण, पुस्तकं, व्याख्यानं, साऱ्यांची अशा माणसांच्या सहवासानं पुन्हा उजळणी झाली. आपल्या एवढय़ा मोठय़ा देशाला पुरतील इतके मानसतज्ज्ञ आपण तयार करू शकू असं उरलेल्या आयुष्यात आता मला पाहायला मिळेलसं वाटत नाही. पण तातडीचे प्रथमोपचार ही सारी खरीखुरी माणसं देऊ शकतील, यात मला तिळमात्र शंका नाही. जयंता बरा झाला. एवढंच नव्हे, तर समाजाच्या अपेक्षेप्रमाणे लग्न करून, छोटेसं दुकान चालवत, रोजचं साधंसरळ गृहस्थी जीवनही तो जगत आहे. त्याच्या दुकानात फोटो आहे यादवरावांचा! यादवराव आज या जगात नाहीत, पण माझ्या आणि त्यांचं मार्गदर्शन लाभलेल्या अनेकांच्या मनात चांगलं जगणं शक्य आहे, हा विश्वास आजही ते देत आहेत.

दु:खं कमी नाहीत, पण माणूसही कमी नाही. तो दु:खाला पुरून उरेल इतक्या जबरदस्त ताकदीचा, भावनिक बुद्धिमत्ता असलेला प्राणी आहे. कितीका असेनात, आपण दु:खं दूर करू शकतो, चांगलं, अर्थपूर्ण जीवन जगू शकतो!

Advertisement

[email protected]

Source link

Advertisement