पुणे2 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
लग्न, वाढदिवस, जत्रा अशा अनेक कार्यक्रमांमध्ये प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करण्याची क्रेझ निर्माण झाली आहे. गावागावांमध्ये सध्या गौतमीचे कार्यक्रम आयोजित केले जातात. मात्र आता पिंपरी- चिंचवडमध्ये एका बर्थडे बॉयला गौतमीचा कार्यक्रम आयोजित करणे चांगलेच महागात पडले आहे.
नृत्यांगना गौतमी पाटीलचे नृत्य ठेवण्यासाठी राज्यभरातून चढाओढ लागते. गौतमी पाटील सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. तिच्या नृत्याने सर्वांनाच वेड लावले आहे. अनेक कार्यक्रमासाठी गौतमीला लावणी सादर करण्यासाठी बोलवतात. तिचे मानधनही गब्बर असते. तिचा कार्यक्रम म्हटले की, टाळ्या आणि शिट्ट्यांची नुसती बरसात होते. त्याचप्रमाणे ती नेहमी वादातही असते.
पुन्हा एकदा चर्चा
पिंपरी- चिंचवडमध्ये वाढदिवसा निमित्त प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामुळे आयोजकावर भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सतत चर्चेत आणि वादात असणाऱ्या गौतमी पाटीलची पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे.
बर्थडे बॉयवरच गुन्हा दाखल
वाद आणि गौतमी हे समीकरणच झाले आहे. ज्या ज्या ठिकाणी गौतमीच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्याठिकाणी राडा, वाद, हुल्लडबाजी होताना दिसते. मात्र आता ज्याच्या वाढदिवसानिमित्त गौतमीच्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित केला होता त्या बर्थडे बॉयवरच गुन्हा दाखल झाला आहे.
परवानगी नाकारली होती…
पिंपरी चिंचवडमध्ये बर्थडे बॉय असलेल्या अमित शंकर लांडे याच्या वाढदिवसानिमित्त मयूर रानवडे याने गौतमीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या दोघांवरही भोसरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारली असतानाही कार्यक्रम ठेवल्याने हा गुन्हा दाखल झाला आहे.
यामुळे परवानगी नाकारली
या प्रकरणी पोलिस कर्मचारी दत्तात्रेय बाळासाहेब कांबळे यांनी भोसरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. अमित लांडे यांनी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमानिमित्त पोलिसांकडे रीतसर परवानगी मागितली होती. परंतु कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल म्हणून भोसरी पोलिसांनी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमासाठीची परवानगी नाकारली होती.