‘सफर खूबसुरत हैं, मंजिल से भी’ | The journey beautiful words lyricist Singer Dear Person ysh 95

‘सफर खूबसुरत हैं, मंजिल से भी’ | The journey beautiful words lyricist Singer Dear Person ysh 95अक्षयकुमार शिंदे

Advertisement

‘सफर खूबसुरत हैं, मंजिल से भी’- किती सुंदर शब्दांत त्या गीतकारानं आणि ते गाणाऱ्या गायकानं त्याच्या प्रिय व्यक्तीसोबतच्या प्रवासाबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तो सांगतोय, की आपला हा प्रेमाचा प्रवास खूप सुंदर आहे, मुक्कामाला पोहोचण्यापेक्षा.. ते ठिकाण कधी येईल यांची वाट पाहू नका, तर त्या प्रवासातल्या प्रत्येक क्षणांचा आनंद घ्या. वाह! क्या बात हैं! या एका ओळीत मला माझ्या जगण्याचं तत्त्वज्ञान मिळालं, असं म्हणायला हरकत नाही.

  ते गाणं ऐकत असताना सहज विचार आला, की आपल्या आयुष्याचा प्रवास कसा चालू आहे. इथून पुढचा प्रवास कसा असेल. खडतर की सुखदायक? सोबत कोणी असेल की आपणच आपले सारथी? आपण जर अटी-तटीच्या, सुख, दु:खाच्या क्षणी खचलो तर सावरायला कोणी येईल किंवा येणारच नाही? अशा वेळी आपण मागील अनुभवांवरून स्वत:ची जी काही तत्त्वे तयार केली ती उपयोगी पडतील, की नवीन काही निर्माण होतील वर्तमानकाळातील अनुभवावरून?

Advertisement

माझं स्वत:चं आयुष्याविषयी साधं, सरळ व सोपं तत्त्वज्ञान म्हणा किंवा विचार आहेत. मी जीवन हळूहळू शिकतोय.  लोकांना काही देणं-घेणं नसतं तुम्ही कुठपासून इथपर्यंत आलात. आयुष्य ते नाही, जिथे आपल्याला जगाचा विचार करून जगावं लागतं. आयुष्य ते आहे, जिथे तुमचं मन काय म्हणतंय ते जगायला मिळणं. त्यासाठी स्वत:वर काम करा आणि मन: शांती अनुभवा. हे अर्थात आलं ते आयुष्य अनुभवत असताना.

     अकरावी झाल्यानंतर बारावी व पुढील शिक्षणाकरिता दुसऱ्या तालुक्याच्या ठिकाणी गेलो. तिथलं नवीन वातावरण, नवीन कॉलेज, नवीन मित्र यांच्याबरोबर जुळवून घ्यायला अडचण यायला लागली. आतापर्यंत घर, क्लास सगळं जवळ होतं. पण आता तसं नव्हतं. कॉलेज एका टोकाला तर क्लास दुसऱ्या टोकाला. यामुळे निराशा यायला लागली. वाटलं, की परत जावं मूळ गावी. पण ते शक्य नव्हतं. कारण पुढच्या शिक्षणाचा विचार करुनच बाबांनी बिऱ्हाड हलवलं होतं. अभ्यासात लक्ष लागेना. नैराश्य वाढायला लागलं. घरचे सांगत होते, ‘होईल रे सवय तुला’. पण मला मात्र जमवून घेता येईना. असं करता करता तीन महिने झाले. काही महिन्यांपूर्वीच मी टायपिंग इंग्रजी व मराठीच्या  दोन परीक्षा दिल्या होत्या. त्याचा निकाल लागून काही दिवस झाले होते. पण निराश मन:स्थितीमुळे निकाल पाहायला जायला हवं हे माझ्या लक्षात आलं नाही. नंतर एकदा सहज म्हणून क्लासमध्ये गेलो. तेव्हा तिथे समजलं, की मी इंग्रजी व मराठी टायपिंगमध्ये क्लासमध्ये पहिला आलो होतो.  मला इतका आनंद झाला, की मनावरचं मळभ, नैराश्य कुठल्या कुठे पळून गेलं. या एका निकालामुळे मला जगण्याची जणू नवी उमेदच मिळाली. ती गोष्ट छोटीशीच होती, पण मला आशेचा किरण दिसला. थोडा वेळ दिला, की गोष्टी नीट होतात. आपल्याकडे तेवढा संयम हवा हे लक्षात आलं. तेव्हापासून टायपिंग हा माझा जीव की प्राण झाला तो आजतागायत आहे.  नंतर यथावकाश कॉलेज पूर्ण झालं. नोकरी लागण्यापूर्वी दोन वर्ष बाबांच्या ऑफिसमध्ये व नोकरी लागल्यानंतर टायपिंगच माझ्या उपयोगी आलं.

Advertisement

 या सगळयांच्या मागे माझे आई-बाबा व दादा यांचे अथक प्रयत्न व साथ होती म्हणून तर मी आज एका विशिष्ट ठिकाणी उभा आहे. बाबांनी खूप मागदर्शन केलं आहे व अजूनही करत आहेत. त्यांनी लावलेल्या कितीतरी चांगल्या सवयी आज उपयोगी पडत आहेत. माझा एक मित्र आहे- प्रशांत तिवारी. त्यानं एकदा असंच बोलता बोलता खूप छान तत्त्व सांगितलं, ‘स्वत:मध्ये हवा तेवढा छान बदल करावा. आलेला प्रत्येक दिवस आयुष्याचा शेवटचा दिवस असल्यासारखं जगावं’.. खरंच होतं त्याचं, ‘सफर खूबसुरत है, मंजिल से भी’ याची प्रचीतीही त्यामुळे मिळत गेली कायम..

akshayradha555@gmail.com

Advertisement

Source link

Advertisement