संशोधिका : सामाजिक बांधिलकी आणि संशोधनाचा मेळ | Sanshodhika author ruhira sawant combination social commitment research Biochemistry subjects glory Honor ysh 95रुचिरा सावंत

Advertisement

जीवरसायनशास्त्र विषयातल्या कार्यासाठी ‘उल्लेखनीय स्त्री वैज्ञानिक’ या पुरस्कारानं गौरवण्यात आलेल्या डॉ. सुनीती धारवाडकर या वैज्ञानिकेच्या शिरपेचात अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सन्मान आहेत. १०६ शोधनिबंध, १३० हून अधिक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांमधील सहभाग, या जोडीला त्यांची विज्ञानविषयक ११ पुस्तकंही प्रकाशित झाली आहेत. आपण करत असलेल्या संशोधनाचा सामान्य माणसाला उपयोग व्हावा हा हेतू बाळगणाऱ्या या संशोधिकेविषयी-

शालेय वयात हमखास विचारला जाणारा आणि आजच्या समाजमाध्यमांच्या भाषेत म्हणायचं झालं तर FAQs मध्ये (फ्रीक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स) अगदी वर असेल असा प्रश्न म्हणजे, ‘पुढे जाऊन कोणत्या क्षेत्रात कारकीर्द घडवणार?’. गंमत म्हणजे या प्रश्नाचं विद्यार्थ्यांकडून कायम एकच उत्तर मिळेल अशी मुळीच खात्री नसते. काही मुलांकडे याचं ठाम उत्तर असतंही, पण अनेकांचं उत्तर सातत्यानं बदलू शकतं.. अगदी ठामपणे उत्तर दिलेल्या विद्यार्थ्यांचंसुद्धा. विस्तारत्या क्षितिजासोबत हा बदल घडणं स्वाभाविक आहे आणि यात काहीच वावगं नाही. सामान्यत: मिळणाऱ्या उत्तरांवर आधारित विद्यार्थ्यांचं वर्गीकरण केलं तर ढोबळमानानं त्यांचे तीन गट करता येतील- १) आपल्याला काय करायचं आहे हे माहीत असलेला, २) गोंधळलेला आणि काहीच कल्पना नसणारा आणि ३) आपल्याला काय करायचं नाही याची खात्री असणारा. यांपैकी तिसऱ्या गटाचं प्रतिनिधित्त्व करणाऱ्या एका स्त्रीची गोष्ट आज आपण जाणून घेणार आहोत.

Advertisement

साठच्या दशकात मराठवाडय़ातल्या एका सुशिक्षित कुटुंबात तिचा जन्म झाला. वकिलीचा वडिलोपार्जित वारसा आणि आईकडून आलेली कलेची आवड, अशा संपन्न शैक्षणिक वातावरणात तिचं बालपण गेलं. तिच्या वयाच्या इतर अनेकांप्रमाणे खेळाबागडायला तिला खूप आवडायचं. अभ्यास करणं, पुस्तकं वाचणं हे सुरू होतंच. फार लवकर, म्हणजे वयाची १५ वर्षही पूर्ण होण्याआधीच तिचं मॅट्रिक पूर्ण झालं. तिची प्रगल्भता पाहता तिच्यासमोर अनेक क्षेत्रांचे दरवाजे उघडले. कलेची, कवितेची, भाषेची आवड असली, तरी तर्कशुद्ध विचारसरणी आणि शास्त्रीय कारणमीमांसा याकडे असलेला कल तिनं जाणला. त्या काळातल्या इतर अनेक हुशार विद्यार्थ्यांप्रमाणे विज्ञान शाखेत प्रवेश घेण्याचा निर्णय तिनं घेतला.

तिची हुशारी पाहता तेव्हा वैद्यकीय शाखेत प्रवेशाची संधीही तिला उपलब्ध होती आणि संशोधनाचं असणारं वेड, गणित, जीवशास्त्र अशा विषयातील तिच्या गतीमुळे संशोधन क्षेत्रही खुणावत होतं. संशोधन कोणत्या विषयात करायचं हे ठरलेलं नसलं, तरी आपला पिंड वैद्यकशास्त्राचा नाही हे ती जाणून होती. तसंही तेव्हा वय कमी असल्यामुळे वैद्यकशाखेत प्रवेश घ्यायचा झाला तरी तिला कमीत कमी वर्षभर वाट पाहावी लागणार होती. म्हणूनच या निर्णयासाठी फारशी ऊर्जा न घालवता तिला संशोधन क्षेत्राची निवड करणं सोपं झालं. संशोधनाच्या वातावरणात, प्रयोगशाळेत रमलेल्या तिनं वयाच्या अठराव्या वर्षीच रसायनशास्त्र विषयात प्रथम क्रमांकानं पदवी मिळवली. पुढे विद्यापीठात नुकत्याच सुरु झालेल्या जीवरसायनशास्त्र या तेव्हाच्या अगदी नव्या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं. या वेगळय़ा विषयाची गोडी लागलेल्या या तरुणीच्या रंजक आणि प्रेरणादायी प्रवासाची ही निव्वळ सुरुवात आहे. आजची ही विक्रमवीर वैज्ञानिका म्हणजे डॉ. सुनीती धारवाडकर.

Advertisement

विज्ञानाची रहस्यं समजून घेण्याचा ध्यास घेतलेल्या डॉ. सुनीती यांना डीएनए, चयापचय (मेटॅबोलिझम), उत्क्रांती (इव्होल्युशन) यांसारख्या विषयांत रस उत्पन्न झाला. ‘पीएच.डी.’साठी त्यांच्या संशोधनाचा विषय औषधं आणि चयापचय यंत्रणेसंबंधात होता. यात शरीरात बाहेरून प्रवेश करणाऱ्या परकीय पदार्थाच्या चयापचय यंत्रणेचा अभ्यास केला जातो. त्याला ‘ड्रग मेटॅबोलायिझग सिस्टिम’ असंही म्हटलं जातं. या यंत्रणेचं काम असतं परकीय पदार्थाचं विघटन. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं, तर परकीय पदार्थाची विल्हेवाट. या परकीय पदार्थामध्ये अर्थातच औषधं आणि वातावरणातल्या सर्व प्रदूषकांचाही समावेश होतो. यामध्ये कर्करोगजन्य पदार्थाचाही समावेश असतो. उदा. वाहनांच्या धुरात असलेलं बेंझोपायरीन. या चयापचय यंत्रणेवर आपल्या आहाराचाही परिणाम होत असतो. या यंत्रणेमध्ये परकीय पदार्थावर कार्य करणारी अनेक ‘एन्झाइम्स’ म्हणजे विकरं (जैव-उत्प्रेरकं- बायोकॅटॅलिस्ट) असतात. तसंच सायटोक्रोम- C आणि सायटोक्रोम-४५० असे घटक असतात. या सर्वावर अन्नघटकांचा, टॅनिक अ‍ॅसिडसारख्या चहात असलेल्या घटकाचा आणि औषध-रेणूचा होणारा परिणाम यासंबंधी डॉ. सुनीती यांचं संशोधन होतं. या संशोधनादरम्यान फुप्फुसं तसंच चिंताग्रस्तता (एन्झायटी) यांसाठी वापरल्या जाणाऱ्या ‘फिनोबार्बीटाल’ या औषधांचा परिणामही त्यांनी तपासला.

परकीय घटकांचा शरीरात प्रवेश झाल्यावर यकृतामध्ये ते दोन स्तरांवर म्हणजे ‘बायफेजिक’ परिणाम करतात. पहिला स्तर प्रतिबंधात्मक असतो, तर दुसऱ्या स्तरात क्रियांना उत्तेजना मिळते. काही पदार्थ पहिल्या स्तरावर क्रिया करतात, तर काही दुसऱ्या. यात औषधं आणि परकीय पदार्थ यांच्यात आंतरक्रियाही होते आणि त्याचा एकत्रित परिणाम शरीरातल्या चयापचयावर (मेटॅबोलिझम) होतो. या संशोधनादरम्यान असा निष्कर्ष आला, की चहामधलं टॅनिक अ‍ॅसिड पहिल्या स्तरावर प्रभाव पाडतं, तर फिनोबार्बीटाल हे औषध दुसऱ्या स्तरावर प्रभाव पाडतं. तर दोघांचा एकत्रित परिणाम हे कोणता पदार्थ यंत्रणेत आधी प्रवेश करतो त्यानुसार ठरतो. असं असलं तरी फिनोबार्बीटालचा प्रभाव नेहमीच जास्त असतो. औषधं विकसित करताना औषधांच्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी अशा संशोधनाचा उपयोग होतो. या संशोधनामुळे मिळालेला आणखी एक निष्कर्ष म्हणजे आहारातली प्रथिनं आणि अँटीऑक्सिडंट जीवनसत्त्वं (ए, सी, आणि ई) यांचा सकारात्मक परिणाम हा औषधं आणि कर्करोगजन्य (कर्करोगास कारणीभूत ठरणाऱ्या) पदार्थाचं चयापचय करणाऱ्या

Advertisement

वर वर्णन केलेल्या यंत्रणेवर होतो. या आहार घटकांमुळे या यंत्रणेला संरक्षण मिळतं आणि ती चांगल्या तऱ्हेनं कार्य करू शकते. हे संशोधन राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संशोधनपत्रिकांत प्रसिद्ध झालंच, पण चर्चासत्रांतही ते मांडलं गेलं. डॉ. सुनीती हे संशोधन करत असतानाच्याच काळात यंत्रणेमधील सायटोक्रोम-४५० या घटकाच्या कार्यावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास पाश्चात्य देशांमधील प्रयोगशाळांमध्येसुद्धा नुकताच सुरू झाला होता. औरंगाबादसारख्या ठिकाणी डॉ. सुनीती यांच्या प्रयोगशाळेतही त्यावर काम चालू होतं. त्यासाठी लागणारं ‘अल्ट्रासेंट्रिफ्यूज’सारखं अद्ययावत उपकरण त्यांच्याकडे नसल्यानं त्यांच्या चमूनं प्रयोगशाळेतच या घटकाचं प्रमाण मोजण्याची साध्य (वर्केबल) अशी पद्धत प्रस्थापित केली.

याच सुमारास औरंगाबादमधील ‘सरस्वती भुवन विज्ञान महाविद्यालया’त पदवी अभ्यासक्रमासाठी जीवरसायनशास्त्र विषयाची शाखा सुरु करण्यात आली. पदवी अभ्यासक्रमात तो विषय शिकवणारं ते मराठवाडय़ातलं पहिलं आणि एकमेव विद्यापीठ असून डॉ. सुनीती यांनी त्यासाठी विभागप्रमुख म्हणून सूत्रं हाती घेतली. या विषयाच्या अध्यापनाची संधी मिळाल्यामुळे त्याची अधिक खोलात जाण आल्याचं त्या सांगतात. ‘या विषयाचं सामाजिक महत्त्व या निमित्तानं आणखी अधोरेखित झालं आणि एकात्मक ज्ञानदृष्टी विकसित झाली,’ असं त्या म्हणतात. याच काळात त्या ‘लोकविज्ञान’ या ‘सर्वसामान्यांसाठी विज्ञान’ ही संकल्पना रुजवणाऱ्या संघटनेच्या संपर्कात आल्या. ‘संशोधन केवळ प्रयोगशाळेत बंदिस्त नसतं, तर त्याचं सेंद्रिय स्वरूप लोकांच्या प्रयोगशीलतेत आणि सामाजिक संशोधनदृष्टीत दडलेलं असतं,’ यावर त्यांचा विश्वास आहे.

Advertisement

प्रयोगशाळेबाहेरच्या सामान्य जीवनाशीही निगडित संशोधन होणं गरजेचं आहे हे त्यांचं ठाम सांगणं आहे. या प्रेरणेतून त्यांनी औरंगाबादमधल्या ‘विज्ञानयात्रे’सारख्या कार्यक्रमांची धुरा सांभाळली. याअंतर्गत वैज्ञानिक जाणिवांचं संवर्धन करणारे निरनिराळे उपक्रम आयोजित केले गेले. अध्यापन, संशोधन आणि विज्ञानप्रसार अशी तिहेरी भूमिका त्या आनंदानं सांभाळू लागल्या. याच काळात त्यांना संशोधन मार्गदर्शिका म्हणूनही विद्यापीठाकडून मान्यता मिळाली. त्या वेळी महाविद्यालयीन स्तरावर संशोधनकार्य करणारे फार कमी लोक होते. त्याच सुमारास ‘पीएच.डी.’नंतरच्या संशोधनासाठी फ्रान्स सरकार आणि त्यानंतर अमेरिकेतल्या विद्यापीठात ‘पोस्ट डॉक्टरल फेलोशिप’ त्यांनी मिळवली. त्या काळात मराठवाडय़ातल्या एका स्त्रीनं अशा प्रकारच्या फेलोशिप मिळवून परदेशी जाण्याचा आणखी एक विक्रम त्यांनी रचला. परदेशात असताना

डॉ. सुनीती यांनी कर्करोगजन्य प्रदूषकांमुळे शरीरात होणाऱ्या बदलांविषयी तसंच त्या बदलांमुळे होणाऱ्या साधकबाधक जैविक परिणामांविषयी संशोधन केलं. यात आहारातल्या ओमेगा-३ मेदाम्लं आणि इतर मेदाम्लांची भूमिका महत्त्वाची आहे. कर्करोगाच्या जैविक प्रक्रियेची उकल करण्यासाठी आणि रासायनिक पदार्थाची जैविक विल्हेवाट कशी होते यावर प्रकाश टाकण्यासाठी अशा प्रकारचं संशोधन उपयुक्त ठरतं. तसंच बुरशीनाशक (फंगीसाईड) असलेल्या ‘इमिडॅझॉल’ औषधाच्या जैविक क्रियांचा अभ्यास त्यांनी केला. त्यातून इमिडॅझॉल औषधांची क्षमता समजण्यास मदत झाली. अद्ययावत प्रयोगशाळेतलं काम, विविध शोधनिबंधांचं प्रकाशन आणि फ्लोरिडा विद्यापीठातला अध्यापनाचा अनुभव अशा अभिमानास्पद अनुभवांचं संचित घेऊन तीन वर्षांनी त्या भारतात परतल्या. या काळात त्यांच्या कुटुंबाची आणि जोडीदाराची भरभक्कम साथ त्यांना लाभली, असं त्या सांगतात. त्यानंतरचं

Advertisement

डॉ. सुनीती यांचं संशोधन हे क्लिनिकल, पर्यावरणविषयक आणि आंतरशाखीय आहे. प्रयोगशाळेबाहेरील सामान्य जीवनाशी निगडित संशोधन करण्यावर त्यांचा भर आहे. मधुमेहात साखरेचं (ग्लुकोज) प्रमाण वाढतं हे सर्वाना ठाऊकच आहे. हिमोग्लोबिन या रक्तातल्या घटकाबद्दलही आपल्याला माहीत असतं. मधुमेहात रक्तातल्या ग्लायकेटेड हिमोग्लोबिनचं (HbA1c) प्रमाणही वाढतं. ते मोजून आपल्याला तीन महिन्यातल्या रक्तातल्या साखरेच्या सरासरी प्रमाणाची कल्पना येते. केवळ मधुमेहातच नाही, तर मूत्रिपडाच्या आजारातही ग्लायकेटेड हिमोग्लोबिनचं प्रमाण आपल्याला त्या रोगाची स्थिती समजण्यासाठी उपयोगी पडतं. तसंच एकंदरीत आरोग्यासाठी आणि हृदयरोगाच्या प्रतिबंधासाठी अँटीऑक्सिडंट्स (जीवनसत्त्वं ए, ई आणि सी) यांची भूमिका महत्त्वाची असते, हे त्यांच्या संशोधनातून दिसून येतं. सध्या आपण करोना विषाणूच्या ‘एसीई रिसेप्टर’बद्दल ऐकत असतो. त्यासंबंधित एसीई विकराचा उच्च रक्तदाबाशी थेट संबंध आहे. उच्च रक्तदाबासाठी वापरण्यात येणाऱ्या अनेक औषधांचा आणि या विकराचा तुलनात्मक अभ्यास हासुद्धा त्यांच्या संशोधनाचा भाग होता.

रोजच्या वापरातल्या भाज्यांच्या गुणधर्मावर संशोधन करताना त्यांना असं दिसून आलं, की कारलं, दुधी भोपळा, आलं, काकडी, भेंडी, टोमॅटो यांमध्ये वेगवेगळय़ा प्रमाणात अँटीऑक्सिडंट गुणधर्म आहेत. कर्करोग आणि मधुमेहासारख्या आजारांमध्ये त्यांचा उपयोग होतो. औरंगाबाद शहरातल्या औद्योगिक परिसरातलं पाणी प्रदूषण, मराठवाडय़ातल्या डेअरीमधून बाहेर पडणाऱ्या पाण्याचं (एफ्लूअंट) प्रदूषण, तसंच थर्मल पॉवर स्टेशनचं राखयुक्त एफ्लूअंट प्रदूषण, यांच्या जीवरासायनिक परिणामांचा अभ्यास या सर्वाचे आरोग्यावर होत असलेले दुष्परिणाम दर्शवतो. त्या इतकंच करून थांबल्या नाहीत, तर सामाजिक- पर्यावरणीय अभ्यास करताना त्यांनी वाहतूक पोलिसांचं वायूप्रदूषणाविषयीचं आकलन समजून घेण्यासाठी त्यांना प्रश्नावली दिल्या. वैज्ञानिक संशोधनासाठी विज्ञान प्रसार जसा आवश्यक, तसंच जागरूकताही महत्त्वाची, हे जाणून त्यांच्या विश्लेषणाचा अभ्यास करून त्यांच्यासाठी प्रदूषणाचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम आणि त्यावरच्या उपाययोजना यांची माहिती देणारी पुस्तिका लिहिली. ती पोलीस आयुक्त कार्यालयानं प्रकाशित केली. फीडबॅक प्रश्नवलीतून त्या पुस्तकेचा उपयोग झाल्याचं दिसून आलं. हे सारं त्या करत असलेल्या कार्यातलं अगदीच मोजकं. आणि ही यादी वाढतच जाते.

Advertisement

जीवरसायनशास्त्र विषयातल्या कार्यासाठी ‘उल्लेखनीय स्त्री वैज्ञानिक’ या पुरस्कारानं गौरवण्यात आलेल्या या वैज्ञानिकेच्या शिरपेचात अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सन्मान आहेत. १०६ शोधनिबंध, १३० हून अधिक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांमधील सहभाग, या जोडीनं विपुल लेखन त्यांनी केलं आहे. या घडीला त्यांची विज्ञानविषयक ११ पुस्तकं प्रकाशित झाली असून एक पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर आहे. विविध वृत्तपत्रं, आकाशवाणी, मासिकं अशा माध्यमांतूनही विज्ञान प्रसारासाठी त्या लेखन आणि कार्यक्रम करत असतात. 

सर्वसामान्याना स्तिमित करणाऱ्या डॉ. सुनीती मल्टिटास्किंग आणि उत्साहाचं मूर्तिमंत उदाहरण आहेत. आपल्या अनुभवाचं सार सांगताना हसत हसत त्या तरुणांना, या क्षेत्रात नव्यानं पदार्पण करणाऱ्या मुलींना संयम बाळगायला आणि स्वत:वर विश्वास ठेवायला सांगतात. त्या म्हणतात, ‘आपल्याला काय हवं आहे याविषयी फारशी कल्पना नसल्यास हरकत नाही. पण काय नको हे ठरवलं की आपली ऊर्जा योग्य दिशेने वापरता येते. याबरोबरच स्त्री वैज्ञानिक म्हणून नाही, तर वैज्ञानिक म्हणून अनुभवांना सामोरं जायला हवं.’ हा डॉ. सुनीती यांचा संदेश केवळ विज्ञान क्षेत्रापुरता सीमित नाही. त्यांचा आनंदी स्वभाव आणि कामाप्रति असणारी निष्ठा केवळ नव्या पिढीसाठीच नाही तर साऱ्यांसाठीच प्रेरणादायी आहे.

Advertisement

postcardsfromruchira@gmail.com

Source link

Advertisement