संशोधिका : विश्वनिर्मितीचं मूळ शोधताना..रुचिरा सावंत

Advertisement

विश्वनिर्मितीचं मूळ शोधणं म्हणजे महासागरात उडी मारून मोती शोधण्यासारखं आहे. उत्क्रांती जीवशास्त्र आणि अनुवंशशास्त्राचा अभ्यास ही त्या प्रवासातली एक महत्त्वाची पायरी. हे विषय प्रचंड आवडणाऱ्या डॉ. रिद्धी देशमुख यांना ‘मिमिक्री बचावा’चा अवलंब करणाऱ्या फुलपाखरांपासून उत्क्रांतीच्या संदर्भातल्या जनुकीय घटकांपर्यंतच्या विषयांनी भुरळ घातली. सध्या दोन प्रकारच्या मुंग्यांवर संशोधन करणाऱ्या आणि या आगळय़ा विषयांच्या सौंदर्याबद्दल भरभरून बोलणाऱ्या डॉ. रिद्धी यांच्याविषयी..

नवी मुंबईमधल्या नेरुळ येथील ‘एपीजय विद्यालया’त सहावीत शिकणाऱ्या रिद्धीची ‘होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षे’च्या प्रात्यक्षिक फेरीसाठी निवड झाली आणि ती आनंदून गेली. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणं, विज्ञान अभ्यासासाठी त्यांना प्रोत्साहन देणं आणि त्यांच्यातले वैज्ञानिक गुण हेरण्याच्या उद्देशानं १९८१ पासून ‘द ग्रेटर बॉम्बे सायन्स टीचर्स असोसिएशन’ होमी भाभा स्पर्धा परीक्षांचं आयोजन करते. तिथल्या त्या प्रयोगशाळेत मांडलेल्या प्रयोगांविषयी त्या छोटय़ा मुलीला फारशी कल्पना नव्हती, पण तरी तिला तिथे खूप मजा येत होती.  तिच्याच भाषेत सांगायचं, तर त्या उपकरणांबरोबर ती खेळत होती. विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं, अनुमान याविषयी तिला त्या वयात असणाऱ्या माहितीच्या आधारे अंदाज लावत होती, विचार करत होती. तिला ही प्रक्रिया आवडत होती. प्रयोगशाळेतला हा खेळ आयुष्यभर खेळायला किती मजा येईल असा विचार तिच्या मनात डोकावला आणि तिला विज्ञान जमतं तर आहेच, पण आवडतंयसुद्धा यावर त्या दिवशी शिक्कामोर्तब झालं. प्रयोगशाळेत रमलेली, तिथे मनसोक्त बागडणारी ही मुलगी म्हणजेच पुढे उत्क्रांती आणि अनुवंशशास्त्र विषयात महत्त्वपूर्ण संशोधनकार्य करणाऱ्या डॉ. रिद्धी देशमुख.

Advertisement

एका रासायनिक कंपनीमध्ये ‘आयटी मॅनेजर’ असणारी आई- मनीषा, बालरोगतज्ज्ञ असणारे वडील- डॉ. माधव आणि लहान भाऊ उत्कर्ष अशा चौकोनी कुटुंबात रिद्धी यांचं बालपण गेलं. स्वत: डॉक्टर असले तरी आपल्या मुलांनी मात्र त्यांना आवडेल तेच क्षेत्र निवडावं, असा त्यांच्या वडिलांचा आग्रह होता. शाळेत असताना रिद्धी यांनी पहिला क्रमांक वगैरे पटकावला नसला, तरी विज्ञान आणि समाजशास्त्र आवडणाऱ्या आणि मनापासून अभ्यास करणाऱ्या प्रामाणिक विद्यार्थिनी त्या नक्की होत्या. या जोडीनं पोहण्याच्या स्पर्धेतील अनेक पारितोषिकं त्यांनी पटकावली होती.

 ‘होमी भाभा स्पर्धा’ परीक्षेवेळी आलेल्या अनुभवामुळे प्रयोगशाळेविषयीची आवड लक्षात आली होतीच. एकूणच जीवशास्त्र विषयात गोडी आहे हेही ध्यानात येऊ लागलं होतं. अशातच उच्च माध्यमिक अभ्यासाच्या वर्षांत उत्क्रांती जीवशास्त्र, अनुवंशशास्त्र अशा विषयांतला काही भाग अभ्यासाला आला आणि ‘अरे हे आपल्याला आवडतंय की!’ असं त्यांच्या सुप्त मनात नोंदवलं गेलं. बारावीमध्ये जीवशास्त्र शिकवणाऱ्या प्राध्यापक शकुंतला सिंग यांनी तर आपल्या शिकवण्याच्या पद्धतीनं या विषयाच्या अभ्यासात आणखीनच रुची निर्माण केली. एखाद्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी दिशा दाखवणाऱ्या दिशादर्शकाची भूमिका त्या स्वीकारत. यामुळेच कदाचित विद्यार्थ्यांमध्ये केवळ घोकंपट्टी न करता खोलात जाऊन अभ्यास करण्याची वैज्ञानिक विचार व कार्यपद्धती रुजली असं रिद्धी सांगतात आणि यासाठी त्या आपल्या या प्राध्यापिकेचे खूप आभार मानतात.

Advertisement

उच्च माध्यमिक वर्षांत विज्ञान निवडणाऱ्या इतर विद्यार्थ्यांसारखं रिद्धी यांना अभियांत्रिकी किंवा वैद्यकशास्त्र निवडायचं नव्हतं. विज्ञानावर असणाऱ्या प्रेमामुळे त्यांनी मूलभूत विज्ञानाचा अभ्यास करायचं ठरवलं. माटुंगा येथील ‘रुईया महाविद्यालया’त जैवतंत्रज्ञान विषयाच्या अभ्यासाला त्यांनी प्रवेश घेतला. तिथल्या तीन वर्षांत विज्ञानाशी गट्टी जमल्याचं त्या सांगतात. विज्ञानातल्या विविध विषयांची तोंडओळख तिथे झाली. बागकामाचं शास्त्र व कला/ उद्यानशास्त्र (हॉर्टीकल्चर) हा विषय तिथे त्यांना पर्यायी अभ्यासात होता. विषय इतका चित्तवेधक असतानाही तिथे प्रात्यक्षिक आणि संशोधनाचा अनुभव घेता न आल्याची खंत रिद्धी यांना वाटते. यामुळेच विषयात रुची निर्माण होऊनही पुढील संशोधनाला हा विषय निवडण्याविषयी त्यांना खात्री वाटत नव्हती.

   रिद्धी यांनी ‘टाटा मूलभूत संशोधन केंद्र’ (टी.आय.एफ.आर.), ‘आय.आय.टी.’- मुंबई, ‘आय.आय.एस.सी.’ अशा तीन प्रवेश परीक्षा पदव्युत्तर शिक्षणासाठी दिल्या. ‘टी.आय.एफ.आर.’ची तर्कशुद्ध विचारांवर भर देणारी, विचार करायला भाग पाडणारी प्रवेश परीक्षा त्यांना आवडली. पण नेमकी पुढच्या टप्प्यात मुलाखतीच्या दिवशी त्यांची शेवटच्या वर्षांची एक प्रयोग परीक्षासुद्धा आली आणि आपल्याला मुलाखतीची वेळ बदलता येऊ शकेल याची कल्पना नसल्यामुळे त्यांनी मुलाखतीला न जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यांची ती संधी हुकली. परंतु ‘टी.आय.एफ.आर.’साठी लिहिलेल्या लेखी परीक्षेतूनच बंगळूरुमधल्या ‘नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजीकल सायन्स’ (एन.एस.बी.सी.) यासाठीसुद्धा अर्ज करता येत होता. या संशोधन संस्थेनं त्यांच्यावर गारूड केलं. तिथलं वातावरण पाहून त्या या संस्थेच्या प्रेमातच पडल्या. मुलाखतीआधी दिला जाणारा एक संशोधन करण्यासाठी प्रयोग डिझाइन करण्याचा अभ्यास, मुलाखतीमध्ये तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीची केली जाणारी चाचणी, देशातल्या महत्त्वाच्या, मोठय़ा वैज्ञानिकांबरोबर केलेल्या विचारप्रवर्तक गप्पा, एखादा प्रश्न विचारल्यावर उत्तर देण्यासाठी आपली बुद्धी चालवण्यासाठी गरज पडेल तेव्हा अगदी सहज पुरवलेली मूलभूत माहिती, एखादा प्रयोग फसला किंवा संशोधनात अपेक्षित यश आलं नाही, तर काय करता येईल यावर दिलेला भर, हे सगळं किती महत्त्वाचं असतं एखाद्या वैज्ञानिकाच्या आयुष्यात! खरं तर कोणताही वैज्ञानिक प्रयोगशाळेतला बराचसा वेळ यातच तर घालवत असतो. मग ते क्षेत्र निवडताना त्यासाठीची मानसिक तयारी करून देणारी अशी मुलाखत म्हणजे किती छान! तिथलं सगळं सगळं आवडूनही, त्या संस्थेसोबत एकदा तरी जोडलं जाण्याची मनापासून इच्छा असतानाही तिथे ‘पीएच.डी. समावेशक’ (इंटिग्रेटेड) अभ्यास असल्यामुळे रिद्धी यांनी त्या संस्थेत प्रवेश न घेता ‘आय.आय.टी.’- मुंबईची निवड केली. ‘पीएच.डी.’साठीचा विषय ठरवण्याआधी आपल्याला आणखी काय काय पर्याय आहेत हे त्यांना आजमावून पाहायचं होतं.

Advertisement

 ‘आयआयटी’-मुंबई मधल्या पदव्युत्तर अभ्यासाचा काळ हा एक वेगळाच अनुभव होता. आपल्या क्षेत्रात इतरांपेक्षा वेगळं कार्य करणाऱ्या अनेक वंदनीय व्यक्तींचा सहवास इथे त्यांना मिळाला. तिथे शिकवण्यासाठी तर अगदी तरुण प्राध्यापकांपासून, खूप अनुभवी, ज्येष्ठ वैज्ञानिकांपर्यंत असं वैविध्य होतं, यामुळे विद्यार्थी समृद्ध झाले. अनुवंशशास्त्र शिकवणाऱ्या प्रोफेसर डॉ. के. कृष्णमूर्ती राव यांची आठवण काढताना रिद्धी हरखून जातात. ‘डी.एन.ए.’च्या क्षेत्रात मूलभूत संशोधन करून क्रांती आणणाऱ्या वॉटसन आणि क्रीक त्यांच्या क्षेत्रात स्थिरावलेलं असताना वैज्ञानिक प्रवासाला आरंभ करणाऱ्या डॉ. राव यांच्याविषयी त्या भरभरून बोलतात. डॉ. राव विज्ञानातल्या संकल्पनांच्या, हे क्षेत्र घडत असताना त्यात होणाऱ्या बदलांच्या, संशोधनाच्या गोष्टी अतिशय रंगवून सांगत.

डॉ. स्वाती पाटणकर हे रिद्धी यांच्यावर प्रभाव टाकणारं आणखी एक व्यक्तिमत्त्व. ‘आय.आय.टी.’मध्ये प्राध्यापिका असणाऱ्या या संशोधिकेनं विद्यार्थ्यांची संशोधन या शब्दाशी मैत्री करून दिली. केवळ  संकल्पना न शिकवता, त्या शोधल्या जात असतानाचा प्रवास त्यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडला. अगदी शोधप्रबंध कसे वाचावेत याचंही शास्त्रोक्त शिक्षण त्यांनी विद्यार्थ्यांना दिलं. परीक्षेतही सर्जनशीलतेचा कस लावून विचारप्रवर्तक आणि प्रायोगिक परीक्षा त्यांनी घेतल्या. खऱ्या अर्थानं मूलभूत विज्ञानाशी, संशोधनाशी विद्यार्थ्यांचा- म्हणजेच या भावी वैज्ञानिकांचा सुसंवाद त्यांनी घडवून आणला. हे असे विलक्षण अनुभव देणाऱ्या गुरुवर्यामुळे आपला पाया भक्कम झाल्याचं रिद्धी सांगतात.

Advertisement

 ‘आय.आय.टी.’मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेत असतानाच रिद्धी यांनी डॉ. समीर माजी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा पहिला संशोधन प्रकल्प केला. तो प्रथिनांशी संबंधित होता. हे संशोधन त्या इतर दोन ‘पीएच.डी.’च्या विद्यार्थ्यांबरोबर करत होत्या. या संशोधनामुळे प्रयोगात काय चुकलं आहे आणि ते का, या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा इतका भरभरून अनुभव त्यांनी घेतला, की ‘आपण आता पीएच.डी. करण्यासाठी आणि त्यात येणारा ताण सहन करण्यासाठी तयार आहोत,’ असं त्यांनी घोषितच केलं. याच काळात ‘आयसर-पुणे’ इथल्या     डॉ. गिरीश रत्नपारखी यांच्या प्रयोगशाळेत त्यांनी इंटर्नशिप केली. ते चिलटांच्या पंखांच्या वाढीसंबंधी संशोधन करत होते. हा अनुभव रिद्धी यांना अनुवंशशास्त्र आणि उत्क्रांती जीवशास्त्र या विषयांचा एकत्रित अभ्यास करण्यासाठी उभारी देणारा ठरला.

 ‘आय.आय.टी.’मध्ये दुसऱ्या वर्षांला विद्यार्थ्यांना उत्क्रांती विज्ञानाचा एक ऐच्छिक अभ्यासक्रम होता. रिद्धी यांनी तो विषय निवडला. त्या वर्गात उच्च माध्यमिक वर्गातल्या रिद्धीच जणू त्यांना पुन्हा नव्यानं भेटल्या. तेव्हा आवडलेलं अनुवंशशास्त्र आणि उत्क्रांती जीवशास्त्र हे विषय पुन्हा नव्यानं भेटले. त्या वेळी सुप्त मनानं नोंदवलेली या विषयातली रुची आणि गती त्यांना आठवली आणि रिद्धी यांना या ऐच्छिक विषयानं एक ‘युरेका’ क्षण दिला. विषयाला परीक्षेत किती महत्त्व आहे, यापेक्षा आपण त्या विषयाला किती महत्त्व देतो, किती प्रामाणिकपणे समजून घेतो हे महत्त्वाचं, हे या निमित्तानं अधोरेखित होतं.

Advertisement

 त्यानंतर सुरू झाला ‘पीएच.डी.’साठीच्या सुयोग्य विषयाचा शोध. इथेही पुन्हा एकदा एक वर्तुळ पूर्ण झालं. आता ‘एन.एस.बी.सी.’मध्ये त्यांनी प्रवेश घ्यायचं ठरवलं. तिथल्या प्रयोगशाळांमध्ये सुरू असणाऱ्या प्रयोगाची माहिती त्यांनी मिळवली. डॉ. कृष्णमेघ कुंटे यांच्या प्रयोगशाळेतला संशोधन विषय ऐकून त्या खूश झाल्या. ‘एका रानवेडय़ाची शोधयात्रा’ या पुस्तकासाठी प्रसिद्ध असणारे डॉ. कुंटे तेव्हा फुलपाखरांमधील ‘मिमिक्री’ (नक्कल करण्याची प्रवृत्ती) या विषयावर संशोधन करत होते. इथे रिद्धी यांना ते उत्तरं शोधत असलेले प्रश्न खूप भावले. त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी फुलपाखरं हा मार्ग होता. फुलपाखरांमध्ये मिमिक्री हा बचावाचा पवित्रा आहे. काही विषारी, रंगीबेरंगी फुलपाखरं खाल्ली की पक्ष्यांना त्रास होतो. पक्षी आपला हा वाईट अनुभव त्या रंगांशी जोडतात. काही खाण्यायोग्य फुलपाखरं मग अशा विषारी फुलपाखरांची नक्कल करून स्वत:चा बचाव करतात. यामध्ये जनुकांचा काय संबंध आहे हे जाणून घेण्यासाठी डॉ. कुंटे काम करत होते. अशी नक्कल का केली जात असेल? याची उत्क्रांती कशी झाली असावी? ती कोणत्या व किती टप्प्यांत झाली असेल? अशा प्रश्नांची उत्तरं तिथे शोधली जात होती. या ठिकाणी पुन्हा एकदा रिद्धी यांना ‘युरेका क्षण’ सापडला. त्यांच्या आवडीच्या अनुवंशशास्त्र आणि उत्क्रांती जीवशास्त्र अशा दोन्ही विषयांचा एकत्रित मेळ त्यांना इथे साधता येणार होता. मग आणखी काय हवं? ‘पीएच.डी.’ दरम्यान त्यांनी तीन प्रकारच्या मादी फुलपाखरांच्या जनुकीय जडणघडणीचा आणि ‘डबल- सेक्स जीन’चा अभ्यास केला. या साऱ्या फुलपाखरांमध्ये एकाच प्रकारची उत्क्रांती अनेकवार झाली आहे आणि गंमत म्हणजे वेगवेगळय़ा पद्धतीनं (मेकॅनिझम) झाली आहे. या फुलपाखरांमध्ये ‘सुपरजीन’ म्हणून जनुकांचा एक संच असतो. या फुलपाखरांच्या पंखांचा आकार, रंग आणि उडण्याची पद्धत त्यामुळे ठरते. फुलपाखरांचा बचाव करणारी ही उपयोगी पद्धती असल्यामुळे त्यात कोणताही बदल न करता ते पुढच्या पिढीकडे पाठवलं जातं. याउलट ‘डबल- सेक्स’ हा मात्र ‘युनिक’ जीन असतो. डबल-सेक्स जीन हे जनुक काही मोजक्या जनुकांपैकी एक आहे, जे स्त्री व पुरुषांमध्ये वेगवेगळय़ा पद्धतीनं काम करतं. यामुळे मादी किंवा नर प्रजातींच्या काही वैशिष्टय़पूर्ण किंवा प्रतिबंधित गोष्टी असतील त्यावर नियंत्रण ठेवणं सोपं जातं. डॉ. रिद्धी यांनी अभ्यास केलेल्या तीन प्रकारच्या मादी फुलपाखरांमध्ये त्यांना या डबल-सेक्स जीनच्या वैशिष्टय़ांचा आणखी सविस्तर अभ्यास करता आला, कारण त्या प्रजातीच्या फुलपाखरांमध्ये डबल-सेक्स जीनमुळे होणारी ही नक्कल केवळ मादी फुलपाखरांपुरतीच प्रतिबंधित आहे.  

 स्वित्र्झलडच्या ‘युनिव्हर्सिटी ऑफ लोझ्ॉन’ इथे डॉ. रिद्धी ‘पोस्ट डॉक्टरल’ संशोधनात व्यग्र आहेत. आताचं संशोधन त्या दोन प्रकारच्या मुंग्यांवर करताहेत. यांपैकी एका प्रकारात वसाहतीत एकच राणी मुंगी असते, तर दुसऱ्या प्रकारच्या वसाहतीत अनेक राणी मुंग्या असतात. या दोन्ही प्रकारच्या वसाहतींचं एका ४ कोटी वर्ष जुन्या ‘सुपरजीन’द्वारे नियमन केलं जातं. या ‘सुपरजीन’च्या टॉवरमध्ये जवळपास ८०० जीन्स असतात. सध्या डॉ. रिद्धी यांची टीम, उत्क्रांती कशी झाली, या ‘सुपरजीन’ची व्यवस्था कशी ठेवली जाते, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधताहेत.

Advertisement

या विषयांचा अभ्यास करत असताना कित्येक वर्ष ‘शेती करणाऱ्या’ मुंग्या, वेगवेगळी ‘टूल्स’ वापरणारे कीटक, यांची सुंदर दुनिया त्या आपल्यासमोर उलगडतात. याचा आस्वाद घेता येणं आणि त्याविषयी कृतज्ञ असणं इतकं तरी आपण नक्कीच करू शकतो असं त्या सांगत राहतात. जैवविविधतेचा अभ्यास माणसाला समृद्ध करतो, असं त्यांचं सांगणं आहे. विश्वनिर्मितीच्या मुळाशी पोहोचण्यासाठी हा अभ्यासच अनेक दारं आपल्यासाठी उघडणार आहे यावर ठाम विश्वास असणाऱ्या डॉ. रिद्धी यांना पुढील संशोधनासाठी आणि रंजक प्रवासासाठी सदिच्छा!

[email protected]

AdvertisementSource link

Advertisement