संशोधिका : दीर्घिकांच्या संशोधनाचा ध्यासरुचिरा सावंत

Advertisement

खगोलशास्त्र विषयात संशोधन करणाऱ्या, ‘हबल’सारख्या  जगप्रसिद्ध अवकाश दुर्बिणीवर काम करणाऱ्या सुरुवातीच्या तरुण वैज्ञानिकांपैकी एक असणाऱ्या आणि माणसाच्या, पृथ्वीच्या आणि एकूणच विश्वाच्या निर्मितीची उकल होण्यासाठी दीर्घिकांचा अभ्यास करणाऱ्या डॉ. कॅरोलिन सिम्प्सन. समाजातल्या विविध घटकांना संशोधक होण्यासाठी त्या प्रोत्साहित करत आहेत. त्यांच्याविषयी..

आजपासून पन्नासहून अधिक वर्षांपूर्वी ईशान्य अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स भागात आठ वर्षांची चिमुरडी राहायची. आठवडाअखेर आणि सुट्टय़ांच्या दिवशी तिथून जवळच समुद्रकिनारी राहणाऱ्या आपल्या आजीआजोबांकडे धूम ठोकायची. त्या घराच्या खिडक्यांमधून दिसणाऱ्या समुद्राच्या लाटा पाहत तासन्तास बसायची. अशाच एका सुट्टीच्या दिवशी भल्या पहाटे तिला जाग आली आणि मग खिडकीमधून समुद्र न्याहाळत ती तिथेच बसून राहिली. इतक्यात एक नवा पाहुणा तिला दिसला..  

Advertisement

समुद्राच्या लाटांकडे बघणाऱ्या तिचं लक्ष वेधणं हे तसं कठीणच काम; पण त्यानं ते लीलया जमवलं. तिनं आजवर पाहिलेल्या सगळय़ा ताऱ्यांपेक्षा सर्वाधिक तेजस्वी आणि सूर्योदयापूर्वी तिच्याशी क्षितिजावर पहिली भेट झालेला हा नवा मित्र तिला खूपच आवडून गेला. घरातली इतर मोठी माणसं उठण्याची ती वाट पाहू लागली. त्या दिवशी तिच्या आईला जाग आल्यावर नव्या दिवसाच्या शुभेच्छा देतानाच ती आपल्या या नव्या मित्राचं कौतुक करू लागली. सतत प्रश्न विचारण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या तिच्या आईनं या दोस्ताची तितक्याच उत्साहात ओळख करून दिली. आपली मुलगी पुस्तकवाचनापलीकडे निरीक्षण करतेय, प्रश्न विचारतेय, जग पाहतेय याचा किती आनंद झाला त्या आईला! आकाशात दिसलेला तो प्रकाशाचा पुंज म्हणजे कुणी तारा नसून शुक्र ग्रह आहे हे समजल्यावर आपल्या या मैत्रिणीला गंमतच वाटली. शुक्राविषयी, ताऱ्यांविषयी आणखी जाणून घेण्याची तिला उत्कंठा लागली. तिच्या आईनं तिच्या हाती एक पुस्तक ठेवलं. अवकाशाच्या प्रेमात पडण्याची ही सुरुवात होती. पुढे अनेक प्रसंग घडले तरी या आगळय़ावेगळय़ा भेटीचा क्षण तिनं मनात जपून ठेवला.

‘बिझनेस’ या विषयाचे प्राध्यापक असणारे वडील आणि कलेत रमण्याचा वारसा असलेली आई यांच्यासमवेत शैक्षणिक पार्श्वभूमी असणाऱ्या शहरातील बालपणामुळे जे आवडतंय ते शिकण्याची, करून पाहण्याची संधी त्या चिमुरडीला मिळाली. त्या वेळी मनसोक्त विहार करण्याचं स्वातंत्र्य मिळालेली, शुक्राला पाहून खूश होणारी ही मुलगी पुढे जाऊन खगोलशास्त्र विषयात संशोधन करेल, दीर्घिकांचा अभ्यास करेल, ‘हबल’सारख्या जगप्रसिद्ध अवकाश दुर्बिणीवर काम करणाऱ्या सुरुवातीच्या तरुण वैज्ञानिकांपैकी ती एक असेल, असं त्यांच्याच काय, तर तिच्या स्वत:च्याही ध्यानीमनी नव्हतं. या कथेतली ती मुलगी म्हणजे आजची शास्त्रज्ञ

Advertisement

डॉ. कॅरोलिन सिम्प्सन. मॅसॅच्युसेट्ससारख्या शैक्षणिक शहरातील वास्तव्यामुळे पदवी अभ्यासक्रमातच खगोलशास्त्र या विषयाचा अभ्यास करण्याची संधी डॉ. कॅरोलिन यांना मिळाली. या लेखासाठी व्हिडीओ कॉलद्वारे त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलण्याची, त्यांना पाहण्याची संधी मला मिळाली. तो अनुभव अविस्मरणीय होताच, पण खूप काही शिकवणाराही होता. सुरुवातीचा आपला अनुभव सांगताना त्या म्हणाल्या, ‘‘भौतिकशास्त्र आणि गणित हा खगोलशास्त्राचा पाया आहे. या दोन्ही विषयांत फारशी गती नसल्यामुळे सुरुवातीला मी संभ्रमात होते. मला गणित जमत नाही, असं एकदा शाळेतल्या बाईंनी सांगितलं होतं. माझं इंग्रजी चांगलं असल्यामुळे मी लेखन वाढवावं, असं माझ्या शिक्षकांना वाटायचं; पण मला विज्ञान आवडत असल्यामुळे माझी मेहनतीची तयारी होती,’’ असं हसत सांगणाऱ्या डॉ. कॅरोलिन यांचा उत्साह समोरच्याकडे अगदी सहज प्रवाहित होतो. सुरुवातीचं एक वर्ष खगोलशास्त्राचा अभ्यास करून पाहायचा आणि न जमल्यास दुसऱ्या शाखेकडे वळायचं, असं ठरवून आपल्या आवडीच्या विषयाला वेळ आणि संधी द्यायचं त्यांनी ठरवलं. वर्षांअखेर त्यांना जाणीव झाली, की वर्षभर त्यांनी केवळ भौतिकशास्त्र आणि गणिताचाच अभ्यास केला होता. अजूनही खगोलशास्त्राचा स्वतंत्र अभ्यास सुरू झाला नव्हताच. अभ्यासक्रम कठीण होत चालला असला, तरी आतापर्यंत या विषयातला रस वाढला होता. विज्ञान शाखेतच शिक्षण घ्यायचं ठरवल्यावर विषय बदलण्याचा एकमेव पर्याय- अर्थातच भौतिकशास्त्र उपलब्ध होता. संपूर्ण भौतिकशास्त्राचा अभ्यास करण्यापेक्षा आपल्या लाडक्या विषयाचा अभ्यास करण्यासाठी थोडी जास्त मेहनत घ्यायचं त्यांनी ठरवलं आणि त्यानंतर खगोलशास्त्राला त्यांनी आपलंसं केलं ते कायमचंच. खगोलशास्त्र विषयात पदवीचं शिक्षण घेतल्यानंतर अनुभव घेण्याच्या उद्देशानं त्यांनी खगोलशास्त्रात संशोधन करणाऱ्या संस्थांमध्ये अर्ज पाठवण्यास सुरुवात केली. सर्वात मोठय़ा आणि बहुपयोगी दुर्बिणींपैकी एक असणाऱ्या ‘हबल’ अवकाश दुर्बिणीच्या प्रक्षेपणापूर्वीचा तो काळ होता. या दुर्बिणीची व्यवस्था पाहणाऱ्या ‘स्पेस टेलिस्कोप सायन्स इन्स्टिटय़ूट’ या संस्थेत आपल्या मार्गदर्शकांच्या मदतीनं त्यांनी अर्ज पाठवला आणि मुलाखतीनंतर त्यांची तिथे ‘गाईड स्टार ऑपरेटर’ म्हणून नियुक्ती झाली. हबल दुर्बीण हा त्या वेळचा वेगळय़ा प्रकारचा पहिलाच प्रयत्न होता. हबल दुर्बीण ही पृथ्वीच्या ‘लोअर अर्थ ऑर्बिट’- म्हणजेच सर्वात नजीकच्या कक्षेत प्रक्षेपित करण्यात आली आहे. ही दुर्बीण प्रचंड प्रभावी असली, तरी आकाशाच्या एका छोटय़ाशा भागावर ती लक्ष केंद्रित करते. त्यामुळे एखाद्या ठरावीक ताऱ्याचा वेध घ्यायचा असेल तर तुम्हाला नकाशाची गरज असते. आकाशाच्या कुठल्याही भागावर लक्ष केंद्रित करण्यासाठी अचूक माहिती आणि स्थाननिश्चिती असणं गरजेचं असून त्यासाठी वेगवेगळय़ा ताऱ्यांच्या अचूक स्थानांची माहिती देणारं माहितीपुस्तक असणं आवश्यक आहे हे वैज्ञानिकांच्या लक्षात आलं. यासाठी जवळपास २० दशलक्ष ताऱ्यांचं अचूक स्थान निर्देशित करणारं माहितीपुस्तक तयार करण्याचं ठरलं. यापूर्वी असा प्रयत्न कुणीच केलेला नव्हता. आकाशाचे फोटो घेण्यासाठी काचेचा उपयोग करण्याची एक जुनी पद्धत आहे. मग वैज्ञानिकांच्या या फळीनं आकाशाच्या त्या भागाचे फोटो घेण्यासाठी त्या पद्धतीचा वापर करत मोठय़ा मशीन्समध्ये त्यांना ‘डिजिटाइज’ केलं. हबल दुर्बीण प्रक्षेपित होण्याआधी हे माहितीपुस्तक तयार असणं गरजेचं होतं. तिथल्या मुख्य वैज्ञानिकांच्या नेतृत्वाखाली चार स्त्रिया आणि काही पुरुष वैज्ञानिकांच्या समूहानं दिवसरात्र तहानभूक हरपून हे काम पूर्ण केलं. जवळपास चार वर्ष तिथे काम केल्यानंतर आपल्या पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेण्याचा विचार कॅरोलिन यांनी केला. या वर्षांत त्यांच्या टीमनं या माहितीपुस्तिकेची पहिली आवृत्ती पूर्ण केली. पुढे संस्थेनं वेगळय़ा पद्धतींचा वापर करून त्याची दुसरी आवृत्ती बनवली. खगोलशास्त्राच्या क्षेत्रातल्या या सर्वात महत्त्वाच्या प्रकल्पांपैकी एक असणाऱ्या प्रकल्पामुळे त्यांना आलेला हा पहिली माहितीपुस्तिका तयार करण्याचा आणि त्यासाठी घेतलेल्या मेहनतीचा अनुभव पुढील जीवनात फार उपयुक्त ठरला. त्यांचा प्रवाही स्वभाव त्यांना या क्षेत्रात टिकून राहण्यासाठी उपयोगी पडला. हबल दुर्बिणीसाठी काम करत असताना घेतलेले फोटोग्राफ्स पाहून दीर्घिकांविषयी त्यांची आत्मीयता आणखी वाढली. त्या फोटोग्राफिक प्लेटमध्ये दिसणारे बिंदूरूपी तारे आणि विविध आकार असणाऱ्या दीर्घिकांमध्ये नवनवे आकार असणाऱ्या, विविध प्रकारचे आयाम असणाऱ्या दीर्घिका अधिक आवडू लागल्या. माणसाच्या, या पृथ्वीच्या आणि एकूणच विश्वाच्या निर्मितीची उकल होण्यासाठी त्यांचा अभ्यास करायला मनानं कौल दिला. त्या दुसऱ्या वर्षांला असताना ओळखीतल्या एका संशोधकानं दीर्घिकांविषयीचं एक संशोधन अर्ध्यातच सोडलं होतं. खरं तर ‘रेडिओ अ‍ॅस्ट्रॉनॉमी’ हा फारसा आवडता विषय नसतानाही सगळंच जुळून आलं आहे म्हणून कॅरोलिना यांनी तो संशोधन प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. हे संशोधन फार वेगळय़ा पद्धतीचं होतं. लघु दीर्घिकांमधील हायड्रोजन गॅसचा अभ्यास या संशोधनांतर्गत केला जात होता. हायड्रोजन हा ताऱ्यांमधील एक महत्त्वाचा घटक असतो. रेडिओ टेलिस्कोपचा वापर करून या लहान दीर्घिकेमधील हायड्रोजनचा अभ्यास करता येतो. विश्वात अशा लहान आकाराच्या किती दीर्घिका आहेत, या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करण्यासाठी प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ आणि अवकाश विज्ञान संवादक नील टायसन यांनी सहलेखन केलेला एक सैद्धांतिक शोधनिबंध आहे. त्यानुसार विश्वात अशा अगणित दीर्घिका असून बऱ्याचदा लहान दीर्घिकांमधील ताऱ्यांच्या अभावामुळे त्या फारच अस्पष्ट दिसतात. त्यामुळे ऑप्टिकल दुर्बिणीतून काही वेळा त्या साऱ्याच पाहता येत नाहीत; पण त्यामध्ये हायड्रोजन मोठय़ा प्रमाणात असल्यामुळे रेडिओ दुर्बिणीतून त्या दिसतात. डॉ. कॅरोलिन करत असलेलं संशोधनकार्य म्हणजे तो सिद्धांत समजून घेण्यासाठी आणि सिद्ध करण्यासाठी केलेलं प्रात्यक्षिक होतं. हे प्रात्यक्षिक करून दाखवणं सोपं नव्हतं. त्यामध्ये खूप गणितं आणि स्टॅटिस्टिक्स (सांख्यिकी) होते. त्या शोधनिबंधातल्या एका सूत्रानं तर डॉ. कॅरोलिन यांना जेरीस आणलं. यामध्ये बराच वेळ गेला. एका परिषदेत त्यांची नील टायसन यांच्याशी अचानकपणे भेट झाली. त्या वेळी नील फारसे प्रसिद्ध नव्हते, पण त्यांची ओळख पटताक्षणीच वेळ न दवडता कॅरोलिन यांनी त्या त्रास देणाऱ्या सूत्रासाठी त्यांच्याकडे मदत मागितली. गोड हसत, कॅलिग्राफी करून नील यांनी त्यांच्या वहीत ते सूत्र लिहिलं आणि म्हटलं, ‘हिअर यू गो.’ कॅरोलिन यांच्यासाठी तो ‘युरेका क्षण’ ठरला. प्रश्न विचारण्यासाठी, मदत मागण्यासाठी ठिकाण, वेळ, प्रसंग या साऱ्याच्या पलीकडे जाण्याची शिकवण देणारे असे अगणित अनुभव विस्मयकारक आहे. कॅरोलिन यांची गोष्टी सांगण्याची हातोटी थक्क करणारी. फ्लोरिडा विद्यापीठात ‘पीएच.डी,’ करत असताना एक सेमिनार घेण्याची संधी त्यांना मिळाली. त्यांच्या सहज समजावण्यामुळे प्रभावित होऊन विद्यापीठातून त्यांना प्राध्यापकी करण्यासाठी विचारण्यात आले. लघु दीर्घिकांमधील ताऱ्यांची निर्मिती, दीर्घिकांची निर्मिती आणि विकास हे त्यांच्या संशोधनाचे विषय आहेत. थोडक्यात, विविध दीर्घिका आणि हे विश्व घेत असलेले विविध आकार, त्यात होत असलेले बदल आणि विश्वाची उत्क्रांती याचा त्या अभ्यास करताहेत. खगोलशास्त्राचा अभ्यास करणं ही जीवनावश्यक गोष्ट आहे, असं त्यांचं मत आहे. ऋतू, दिशा यांसारख्या खगोलशास्त्रीय घटकांची जाण असल्याशिवाय आपलं या पृथ्वीवर राहणं जवळपास अशक्य आहे, असं सांगत त्या या विषयाच्या अभ्यासाचं महत्त्व अधोरेखित करतात. एकोणिसाव्या शतकात जेव्हा

डॉ. सिम्प्सन खगोलशास्त्रात आल्या, तेव्हा या क्षेत्रातील स्त्रियांचा अगदीच तुरळक असणारा सहभाग ही एक समस्या होती. डॉ. सिम्प्सन याविषयी केवळ बोलत राहिल्या नाहीत, तर त्यासाठी त्यांनी योगदान देण्यास सुरुवात केली. विज्ञान आणि संशोधनाच्या क्षेत्रात स्त्रियांचा आणि समाजातील वेगवेगळय़ा पाश्र्वभूमींच्या, विविध घटकांचा सहभाग वाढायला हवा यासाठी त्या प्रयत्नरत आहेत. विविधतेमुळे आपल्याला मिळणारा दृष्टिकोन किती प्रभावी असतो हे त्या अनेक उदाहरणं देऊन सांगतात. अमेरिकन अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीच्या खगोलशास्त्रात स्त्रियांच्या सहभागासाठी काम करणाऱ्या समितीचा त्या भाग आहेत. केवळ स्वत: एका वेगळय़ा क्षेत्रातील मोजक्या स्त्री संशोधकांपैकी एक न होता त्या अनेक स्त्रियांना विविध संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. सत्तरच्या दशकामध्ये स्वत: कलेची अभ्यासक असतानाही मुलीला पडणाऱ्या विज्ञानाच्या प्रश्नांची उत्तरं तिच्यासमवेत शोधणारी आई, आपल्या नातीचं ग्रहताऱ्यांचं वेड लक्षात घेऊन विद्यापीठामधल्या प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञांना पत्रं लिहून दुर्बीण घेण्यासाठीचे सल्ले विचारणारे आणि त्यानंतर तशी दुर्बीण घेऊन देणारे आजोबा, आवड वृिद्धगत व्हावी यासाठी प्रोत्साहन देणारे महाविद्यालयातले भौतिकशास्त्राचे प्रेमळ प्राध्यापक, येणाऱ्या अपयशाला तोंड देताना सतत पाठीशी उभं राहून ‘कीप गोइंग’ असं शिकवणारे वडील, या सगळय़ांना आणि इतर अनेकांना आपल्या प्रवासातले महत्त्वाचे सहप्रवासी मानणाऱ्या

Advertisement

डॉ. सिम्प्सन म्हणजे उत्साहाची मूर्ती आणि प्रेरणेचा अखंड स्रोत आहेत. आपल्याला जे मिळालं आहे त्याची जाणीव ठेवून ते इतरांनाही मिळावं यासाठी त्या कृतिशील आहेत. ‘संशोधन करण्यासाठी हुशारी नाही, तर चिकाटी महत्त्वाची असते. विज्ञानाविषयी प्रेम आवश्यक असतं.’ असं आवर्जून सांगणाऱ्या डॉ. कॅरोलिन संशोधनाची, संशोधिकेची आणखी एक नवी व्याख्या आपल्याला देतात. पदोपदी जाणवणारी त्यांच्यातील कृतज्ञता त्या आपल्यालाही भेट देतात, अगदी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेशा निर्मळ आणि गडगडाटी हास्यासह!

postcardsfromruchira@gmail.com

AdvertisementSource link

Advertisement