संपूर्ण ‘आयपीएल’ महाराष्ट्रात?नवी दिल्ली : एकीकडे राज्यासह देशभरातील करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) १५वा हंगाम पूर्णपणे महाराष्ट्रात आयोजित करण्यासाठी प्रयत्नशील आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

Advertisement

करोनाचा प्रादुर्भाव वाढत असून राज्यात अनेक ठिकाणी कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र एका इंग्रजी संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार महाराष्ट्रात संपूर्ण ‘आयपीएल’ खेळवण्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि ‘बीसीसीआय’चे माजी अध्यक्ष शरद पवार यांनी हिरवा कंदील दर्शवला आहे. काही दिवसांपूर्वी ‘बीसीसीआय’चे हंगामी मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंग अमिन, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) अध्यक्ष विजय पाटील आणि शरद पवार यांची यासंबंधी चर्चा झाली. लवकरच ही मंडळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांची सदर स्पर्धेच्या आयोजनासाठी परवानगी घेतील, असे समजते.

मुंबईतील वानखेडे आणि ब्रेबॉर्न, नवी मुंबईतील डी. वाय. पाटील आणि पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अशा एकूण चार स्टेडियममध्ये ‘आयपीएल’चे सामने खेळवता येऊ शकतात. प्रेक्षकांना या स्पर्धेसाठी परवानगी नसेल. मुंबईसह पुण्यात जैव-सुरक्षा परीघ तयार करण्याची उत्तम सुविधा उपलब्ध असून खेळाडूंना विमान प्रवासही टाळता येईल. त्यामुळे फेब्रुवारीत खेळाडूंची लिलावप्रक्रिया झाल्यावर ‘बीसीसीआय’ ठिकाणांसंबंधी अंतिम निर्णय घेण्याचे अपेक्षित आहे.

Advertisement

अहमदाबादच्या कर्णधारपदासाठी हार्दिक शर्यतीत

अष्टपैलू हार्दिक पंडय़ा ‘आयपीएल’च्या आगामी हंगामात अहमदाबाद संघाचे कर्णधारपद भूषवण्याची शक्यता आहे. ‘बीसीसीआय’ने सोमवारी अहमदाबादच्या स्पर्धेतील प्रवेशावर शिक्कामोर्तब केले. खेळाडूंच्या लिलावप्रक्रियेपूर्वी नव्या संघांना प्रत्येकी तीन खेळाडू निवडण्याची मुभा आहे. त्यापैकी अहमदाबादने हार्दिकची निवड पक्की केली असून फिरकीपटू रशीद खान आणि धडाकेबाज फलंदाज इशान किशन यांनादेखील संघात सहभागी करून घेण्यासाठी अहमदाबाद उत्सुक असल्याचे समजते.

Advertisement

The post संपूर्ण ‘आयपीएल’ महाराष्ट्रात? appeared first on Loksatta.Source link

Advertisement