मुंबईएका तासापूर्वी
- कॉपी लिंक
उल्हासनगरमधील नंदकुमार ननावरे यांनी 1 ऑगस्ट रोजी पत्नीसह तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. पण पोलिस मात्र तपासात चालढकल करताहेत म्हणून त्यांचे बंधू धनंजय ननावरे यांनी आपले बोट कापून गृहमंत्र्यांना पाठवले होते. या संपूर्ण प्रकरणात शिंदे सरकारमधील दोन मंत्री सामील आहेत, असा आरोप ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला. राज्य सरकारमधील दोन मंत्र्यांच्या जाचाला कंटाळून ननावरे यांनी आत्महत्या केल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
हे राज्याचे दुर्दैव
संजय राऊत म्हणाले, नंदकुमार ननावरे यांना आत्महत्येला प्रवृत्त करणारे दोन मंत्री आहेत. एक मुंबईतील आहेत, एक सातारा आणि फलटण भागातले आहेत. त्यामुळे उद्वेगाने त्यांच्या भावाने आपले बोट कापून गृहमंत्र्यांना पाठवलं आहे. हे इतकं विदारक चित्र आहे, तरीही या राज्याच्या गृहमंत्र्यांना त्या संदर्भात जर वेदना टोचत नसेल तर ते या राज्याचं दुर्दैव आहे.
सत्य समोर आले पाहीजे
संजय राऊत म्हणाले, धनंजय ननावरे यांनी आपले बोट कापून गृहमंत्र्यांना पाठवल्यानंतर आता काही लोकांना अटक केल्याचे समजते. पण, त्याचे मुख्य आरोपी हे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातले आहेत. आमच्यावर लहान सहान बाबतीत खोटे आरोप करणारे आता कुठे आहेत. या प्रकरणाचं सत्य समोर आलं पाहिजे.
राज्यात अमानुष पद्धतीने राज्य
संजय राऊत म्हणाले, ननावरे यांच्या बंधुंविषयी आम्हाला सहानुभूती आहे, आपुलकी आहे. आणि त्यांच्या कुटुंबाविषयी आमच्या मनात वेदना आहे. जेव्हा मृताच्या कुटुंबातला एक भाऊ आपलं बोट कापून पाठवतो. त्याचा व्हिडीओ काढतो. जर माणुसकी असती, मानवतेचा प्रश्न असता तर त्या भावाला समोर बसवून गृहमंत्र्यांनी चर्चा केली असती. या राज्यात इतक्या अमानुष पद्धतीने राज्य चाललेलं आहे, त्याचं हे एक विदारक चित्र आहे, अशा शब्दांत राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.
संबंधित वृत्त
संजय राऊत यांचे निवडणुकीत उतरण्याचे संकेत:पक्षाने आदेश दिला तर निवडणुकही लढणार, ईशान्य मुंबईतून निवडणूक लढवण्याचे संकेत
ईशान्य मुंबईत साधा शिवसैनिक जरी उभा केला तरी तो निवडून येईल. मला पक्षाने आदेश दिला तर मी तुरुंगातही जातो. जर पक्षाने आदेश दिला तर मी निवडणूकही लढवणार असल्याचे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. या माध्यमातून त्यांनी पहिल्यांदाच निवडणूक लढवण्याचे संकेत दिले. वाचा सविस्तर