अहमदनगर5 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
रात्रीच्या वेळी बंद मोबाइल टॉवरवर विविध प्रकारचे पक्षी आराम करत असतात. त्यांना पकडण्यासाठी रविवारी रात्री अंदाजे एक ते दीडच्या सुमारास गणेश गवळी दारूच्या नशेत मोबाईल टॉवरवर चढला. परंतु टॉवरवर जास्त उंचीवर गेल्यानंतर तोल न सांभाळता आल्याने या तरुणाचा टॉवरवरून पडून मृत्यू झाल्याची घटना संगमनेर तालुक्यातील अंभोरे येथे घडली. गणेश भास्कर गवळी (वय २७, रा. अंभोरे, ता. संगमनेर) असे मृताचे नाव आहे.
संगमनेर तालुक्यातील अंभोरे येथील गणेश गवळी हा युवक लहानपणापासूनच अंभोरे येथे त्याचा मेव्हणा काळू बर्डे यांच्याकडे राहत होता. लग्नानंतरही गणेश गवळी हा पत्नी, दोन मुलीसह येथेच राहत होता. रविवारी रात्री त्याच्या घरा शेजारी वरात होती. त्यामुळे त्या ठिकाणी गणेशने दारू पिल्याचे माहिती आहे. दारू पिऊन तो दारूच्या नशेत पाखरं पकडण्यासाठी गावातील बंद असलेल्या मोबाइल टॉवरवर गणेश गवळी चढला. प्रमाणापेक्षा जास्त उंचीवर गेल्यानंतर तोल न सांभाळता आल्यामुळे तो खाली कोसळला. खाली येत असताना टॉवरच्या मध्यभागी लोखंडी अँगलला तो लटकला. सकाळी गावातील टॉवर शेजारील लोकांनी पाहिले असता पोलिस पाटील विनोद साळवे यांना सविस्तर माहिती सांगितली. पोलिस पाटील यांनी सदर ठिकाणी प्रत्यक्षात जाऊन बघितल्यानंतर गणेश गवळी हा मृत झाले असल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी त्यांनी संगमनेर ग्रामीण पोलिस स्टेशनला माहिती दिली. त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी संगमनेर कॉटेज हॉस्पिटलला पाठवण्यात आला आहे.