अमरावती11 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
महानुभाव पंथाचे संस्थापक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या अष्टजन्मशताब्दीनिमित्त आगामी रविवार, १७ सप्टेंबर रोजी अमरावतीत शोभायात्रा काढली जाणार आहे. कलशधारी महिला, बग्गी, घोडे, कृत्रीम हत्ती व आकर्षक प्रकाशयोजना यामुळे ही शोभायात्रा आकर्षणाचे केंद्र बनणार असून अमरावती शहरात असा सोहळा पहिल्यांदाच होत असल्याची माहिती आज, गुरुवारी येथे एका पत्रकार परिषदेत देण्यात आली.
माताखिडकी, बुधवारा परिसरातील श्रीकृष्ण मंदिरातून सायंकाळी ५ वाजता या शोभायात्रेचा प्रारंभ होईल, असे मंदिर अध्यक्ष सुभाष पावडे व सचिव अॅड. अरुण ठाकरे यांनी माध्यमांना सांगितले. श्रीकृष्ण मंदिरातून पुढे कलोती सभागृह बुधवारा, अंबागेट, गांधीचौक, राजकमल चौक, रेल्वे स्टेशन, एसटी स्टँड रोड, रुक्मीणी नगर, कल्याणनगर असे मार्गक्रमण ही शोभायात्रा कंवरनगर स्थित महानुभाव आश्रमात पोहोचेल. याठिकाणी यात्रेचा समारोप होणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
सुमारे 800 वर्षांपूर्वी सर्वज्ञ चक्रधर स्वामींनी महाराष्ट्र ही कर्मभूमी निवडून राज्यभर पायी प्रवास केला. त्याच काळात त्यांनी महानुभाव पंथाची स्थापना करुन तत्कालीन चातुवर्ण व सनातन कर्मकांडात अडकलेल्या समाजाचे प्रबोधन केले. सत्य, अहिंसा व व्यसनमुक्तीचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविला. महिलांना पुरुषांएवढाच धर्माचा, संनास्याचा व मोक्षाचा अधिकारही प्राप्त करुन दिला, असे यावेळी सांगण्यात आले. हा संपूर्ण इतिहास जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठीच ही शोभायात्रा काढली जात असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
पत्रकार परिषदेला अध्यक्ष, सचिवांसह उपाध्यक्ष डॉ. अशोकराव राऊत, कोषाध्यक्ष निवृत्त अभियंता एस. पी. देशमुख, राऊळ माय पारायण मंडळाचे अनंतराव तेलखेडे, प्रकाश तेलखेडे, अनंत जुनघरे, अनिल रोहणकर, बाबुराव बोराळकर आदी पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.