औरंगाबाद6 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
क्रीडा भारती व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीच्या वतीने श्री गुरुजी पुरस्कार निमित्ताने सोमवारी (ता. 23) आयोजित आंतरशालेय लेझीम स्पर्धेत प्रजासत्ताक दिनाचे रंग दिसले. या स्पर्धेचे जिजामाता विद्यालयाच्या संघाने शानदार प्रदर्शन करत प्रथम पारितोषिक पटकावले आहे.
द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या जन्म दिनानिमित्त ‘श्री गुरुजी पुरस्कार’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या पुरस्कार सोहळ्यानिमित्त आंतरशालेय लेझीम स्पर्धेचे आयोजन आज धर्मवीर संभाजी विद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले.
स्पर्धेचे उदघाटन जनकल्याण समितीचे देवगिरी विभागाचे कार्यवाह बाळकृष्ण खानविलकर, प्राचार्य डॉ सर्जेराव ठोंबरे, क्रीडा भारतीचे प्रांताध्यक्ष पंकज भारसाखळे यांचे हस्ते करण्यात आले. सर्व सहभागी संघांनाही याप्रसंगी क्रीडा भारतीच्या वतीने स्मृतिचिन्ह देण्यात आले. पारितोषिक वितरण वसंतराव नाईक महाविद्यालयाचे सचिव नितिन राठोड, जनकल्याण समितीचे जिल्हा कार्यवाह प्रसन्नकुमार बोठे, दीनदयाळ संस्थेचे अध्यक्ष शामराव नाईक यांच्या हस्ते झाले.
बळीराम पाटील संघ उपविजेता
या स्पर्धेत 16 संघ आणि सुमारे 500 स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धेत बळीराम पाटील विद्यालयाच्या संघाने द्वितीय तर धर्मवीर संभाजी विद्यालयाच्या संघाने तृतीय क्रमांक मिळवला. त्यांना अनुक्रमे अकरा, सात व पाच हजारांचे रोख बक्षीस व चषक प्रदान करण्यात आला.
लेझीममधून देशभक्ती
क्रीडा भरतीच्या पुढाकाराने आयोजित या लेझीम स्पर्धेत औरंगाबाद शहरासह ग्रामीण भागातील अनेक संघ व खेळाडू सहभागी झाले होते. देशभक्तीपर गीते आणि वाद्यांच्या तालावर या खेळाडूंनी लेझीम खेळताना अनेक प्रात्यक्षिके पण दाखवली. तिरंगा, अशोक चक्राच्या आकारात लेझीम खेळून सहभागी संघांनी उपस्थितांची मने जिंकली.
गुणांकन पध्दतीने ठरला विजेता
या स्पर्धेचे गुणांकन वेगळ्या पद्धतीने करण्यात आले. यात आगमन, ताल, लय, जोश, फॉर्मेशन, ड्रेसिंग, देखावा, वाद्य, कौशल्य आणि निर्गमन या विषयात आई एकूण अधिकाधिक 100 गुण संघांना प्रदान करण्यात आले. त्यावरून विजेता संघ ठरला. लेझीम स्पर्धेचे परिक्षक म्हणून प्रा. डॉ. रंजन बडवणे व प्रा. डॉ. युसुफ पठाण यांनी काम पाहिले.