श्रीलंकेचा लेगस्पिनर वानिंदू हसरंगाने भारताच्या युजवेंद्र चहल पेक्षाही उजवा ठरला, नेमका कसा वाचा…

श्रीलंकेचा लेगस्पिनर वानिंदू हसरंगाने भारताच्या युजवेंद्र चहल पेक्षाही उजवा ठरला, नेमका कसा वाचा...
श्रीलंकेचा लेगस्पिनर वानिंदू हसरंगाने भारताच्या युजवेंद्र चहल पेक्षाही उजवा ठरला, नेमका कसा वाचा...

मागच्या हंगामापर्यंत भारताचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल आयपीएल फ्रँचायजी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे प्रतिनिधित्व करत होता. परंतु चालू हंगामात तो राजस्थान रॉयल्सचा खेळाडू आहे आणि त्याची जागा श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज वानिंदू हसरंगाने घेतली आहे. हसरंगा संघात चहलची कमतरता जाणवू देत नाहीये. या उत्कृष्ट गोलंदाजी प्रदर्शनासाठी आरसीबीचे फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक श्रीधरन श्रीराम यांनी त्याचे कौतुक केले आहे.

आयपीएल २०२२च्या मेगा लिलावात आरसीबीने युजवेंद्र चहल याची जागा भरण्यासाठी वानिंदू हसरंगा याला खरेदी केले. संघाच्या या निर्णयानंतर कुणालाच वाटले नसावे की, हसरंगा चहलची जागा भरून काढू शकेल, पण त्याने तसे करून दाखवले आहे. चालू हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्यांच्या यादीत युजवेंद्र चहल पहिल्या क्रमांकावर असला, तरी हसरंगा देखील त्याला चिटकून म्हणजेच दुसऱ्या क्रमांकावर आहे. हसरंगा कोणत्याही सामन्यामध्ये चहलला मागे देखील टाकू शकतो. श्रीलंकेच्या या २४ वर्षीय गोलंदाजासाठी आरसीबीने मेगा लिलावात तब्बल १०.७५ कोटी रुपये मोजले. हसरंगाने देखील मिळालेल्या बक्कळ पैशाला साजेशे प्रदर्शन करून दाखवले आहे. आरसीबीचे प्रशिक्षक श्रीधरन श्रीराम यांनी याच पार्श्वभूमीवर त्याचे कौतुक केले.

Advertisement

आरसीबी बोल्ड डायरीय पॉडकास्टमध्ये बोलताना श्रीधरन श्रीराण म्हणाले की, “आरसीबीमध्ये युजवेंद्र चहलची जागा घेण्याच्या अपेक्षा त्याने ज्या पद्धतीने सांभाळल्या आहेत, ती काही सोपी गोष्ट नाहीये. त्याच्याकडून खूप जास्त अपेक्षा होत्या. प्रत्येकाला माहिती आहे की, युझीने (चहल) संघासाठी काय केले आहे. त्याची जागा घेणे आणि सर्वाधिक विकेट्सच्या यादीत दुसरे स्थान मिळवणे अप्रतिम आहे. याचे पूर्ण श्रेय त्यालाच (हसरंगा) जाते. कारण, ज्या पद्धतीने त्याने भारतीय जनता आणि दबाव सांभाळला आहे, टीका करणाऱ्यांमधून त्याने ज्या पद्धतीने प्रत्येक वेळी पुनरागमन केले आहे, हे त्याच्या स्वभावातील आत्मविश्वास दाखवते.”

दरम्यान, वानिंदू हसरंगा चालू हंगामाता आरसीबीसाठी प्रत्येक सामना खेळला आहे. त्याने आतापर्यंत १२ सामन्यांमध्ये २१ विकेट्स घेतल्या आहेत. सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळलेल्या सामन्यात त्याने पाच विकेट्स नावावर केल्या होत्या. सुरुवातीच्या सामन्यांमध्ये त्याला अपेक्षित यश मिळाले नव्हते, पण स्पर्धा जसजशी पुढे जात आहे, तसतसा तो अधिका घातक ठरत आहे.

Advertisement