‘श्रीं’च्या आगमनासाठी नगर शहरात प्रथमच ५२ मंडळांच्या मिरवणुका: अडीच हजारांवर सार्वजनिक गणपती; ३२५ गावांत एकच बाप्पा‎

‘श्रीं’च्या आगमनासाठी नगर शहरात प्रथमच ५२ मंडळांच्या मिरवणुका: अडीच हजारांवर सार्वजनिक गणपती; ३२५ गावांत एकच बाप्पा‎


नगर28 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक
  • गणेश मूर्ती, पूजा साहित्य खरेदीसाठी भक्तांची गर्दी

नगर शहरासह जिल्ह्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. गणेश मूर्तींची व पूजा, सजावटीच्या साहित्याची खरेदी करण्यासाठी नागरिकांची बाजारात झुंबड उडाली होती. सार्वजनिक गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनीही लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी जय्यत तयारी केली आहे. जिल्हाभरात सुमारे अडीच हजारांहून अधिक सार्वजनिक मंडळे गणेशोत्सव साजरा करत आहेत. तर सुमारे ३२५ गावांनी ‘एक गाव एक गणपती’ उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, नगर शहर व उपनगरात यंदा प्रथमच श्रीगणेशाच्या आगमनासाठी ५२ गणेश मंडळे मिरवणुका काढणार आहेत.

Advertisement

नगर शहरात मानाचे १२ गणपती आहेत. पहिला मानाचा व ग्रामदैवत असलेल्या श्री विशाल गणेश मंदिरात सकाळी १० वाजता जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या हस्ते ‘श्रीं’ची प्राणप्रतिष्ठापणा होणार आहे. दरवर्षी गणेश स्थापनेच्या दिवशी आठ ते दहा प्रमुख मंडळांकडून मिरवणुका काढल्या जात होत्या. यंदा मात्र पहिल्यांदाच ५२ सार्वजनिक गणेश मंडळे पहिल्याच दिवशी मिरवणूक काढणार आहेत. यात पारंपरिक वाद्यांसह डीजेचाही समावेश असणार आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने शहरात मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. माळीवाडा, चितळे रस्ता, गांधी मैदान, प्रोफेसर कॉलनी चौक, भिस्तबाग चौक या ठिकाणी आज गणेश मूर्ती, सजावट व पूजा साहित्य खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होणार आहे. तसेच कल्याण रस्त्यावरही गर्दीमुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.

यावर्षी शाडू मातीच्या गणेश मूर्तींना मागणी वाढली

Advertisement

मागील वर्षीपेक्षा यंदा शाडूच्या गणेश मूर्तीची मागणी वाढली आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी शाळेत झालेल्या जनजागृतीचा परिणाम दिसून आला. मात्र, या गणेश मूर्तींचे दर ३० ते ४० टक्क्यांनी वाढल्याने पीओपीच्या तुलनेत शाडू मातीच्या मूर्तींची मागणी मात्र कमीच दिसून आली. गणेश मंडळांनी मात्र पीओपीच्याच मूर्तीला अधिक पसंती दिल्याचे चित्र होते.

७७५ मंडळांचेच ऑनलाईन अर्ज

Advertisement

जिल्ह्यात अडीच हजारांहून अधिक सार्वजनिक मंडळे श्री गणेशाची प्रतिष्ठापना करणार आहेत. स्थानिक पातळीवर त्यांनी परवानग्या घेतल्या आहेत. मात्र, जिल्हा पोलिस दलाकडे सोमवारी सायंकाळपर्यंत ७७५ मंडळांनी परवानगीसाठी ऑनलाईन अर्ज केले आहेत. अनेक मंडळांनी परवानगीकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. काहींनी थेट पोलिस ठाण्यात जाऊन ऑफलाईन परवानगी मिळवली आहे. नगर शहरात महापालिकेने २७४ मंडळांना परवानगी दिली आहे.

जिल्ह्याबाहेरील पोलिस कुमक दाखल

Advertisement

गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, यासाठी अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली २ अप्पर अधीक्षक, ७ उपअधीक्षक, २८ निरीक्षक, ३३ सहाय्यक निरीक्षक, ५२ उपनिरीक्षक, १७२५ अंमलदार, ३ आरसीपी पथके, दंगल नियंत्रण व स्ट्राईकींग फोर्स, १६५० होमगार्ड असा बंदोबस्त आहे. आहे. यंदा जिल्ह्याबाहेरून अतिरिक्त कुमक मागवण्यात आली आहे. यात १ उपअधीक्षक, ५ निरीक्षक, ८ उपनिरीक्षक, १५० पुरुष कर्मचारी, १०० महिला कर्मचारी, एसआरपीएफची १ कंपनी, रॅपिड अॅक्शन फोर्स आदींचा समावेश आहे. तसेच नगर शहरात पावणे तीनशे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे पोलिसांचा वॉच राहणार आहे.



Source link

Advertisement