शोध वारशाचा : लोहगड परिक्रमेतला पुरातन खजिना (पूर्वार्ध)साईप्रकाश बेलसरे

Advertisement

मावळातल्या दुर्ग लोहगडाच्या घेऱ्यातून दुर्गम परिक्रमा करताना १७ दुर्गम कातळलेणी धुंडाळली. थरारून गेलो, पुरातन अप्रकाशित प्राकृत-ब्राह्मी शिलालेखाच्या दर्शनाने! कोडं पडलं.. लोहगड असेल की प्राचीन जैन लेणी-मठ?

२०१९च्या मे महिन्यातली आमची मोहीम होती दुर्ग लोहगडची! इंद्रायणीच्या नाणेमावळातला लोहगड सगळ्यात महत्त्वाचा दुर्ग. शिवप्रेमींचं स्फूर्तिस्थान, तज्ज्ञांनी अभ्यासलेला आणि पर्यटकांनी फुललेला. सुपरिचित गजबजलेल्या लोहगडवर नवीन काय अनुभूती मिळणार, असा पूर्वग्रह करून घेतला नाही. पुसटशी माहिती मिळालेली, की ‘लोहगडाच्या घेऱ्यात कातळकोरीव लेणी-विवरं आहेत’. गडाच्या माथ्यावर नव्हे, तर त्याच्या कातळकडय़ात खोदलेली लेणी-टाकी धुंडाळण्यासाठी गडाची परिक्रमा आखली. आम्हाला एक पुरातन खजिना आढळणार आहे, याची कल्पनाच नव्हती.

Advertisement

नकाशावर लोहगडाचा परीघ बघताना, त्रिकोणी माथा आणि ईशान्य टोकाबाहेर विंचवाच्या नांगीसारखी धावलेली ‘विंचूकाटा’ माची दिसली. दुर्गपरिक्रमेच्या पहिल्या टप्प्यात होता लोहगड-विसापूर दरम्यानच्या ‘गायखिंडी’पासून विंचूकाटय़ापर्यंतचा उत्तरकडा. विंचूकाटय़ाच्या कातळपट्टीत लेणी शोधणं हा दुसरा टप्पा. तिसरा टप्पा विंचूकाटा ते लोहगडवाडीपर्यंतचा नैर्ऋत्य कातळकडा. चौथा टप्पा, म्हणजे पूर्वेला लोहगडवाडीसमोरचा कातळकडा. समव्यसनी दणकट ट्रेकरमंडळी जमली. सह्यद्री-जिओग्राफिक-कार विवेक काळे, मावळगूगल अमेय जोशी, आडवाटांमध्ये रमणारा निनाद बारटक्के आणि दुर्ग-लेणी-घाटवाटांवर रमणारे अस्मादिक (साईप्रकाश बेलसरे). दिग्गज गिर्यारोहक अजय ढमढेरे आणि इंडॉलॉजिस्ट अभिनव कुरकुटे सामील झालेले. गायखिंडीत पोहोचलो, तेव्हा पूर्वमान्सून ढगांच्या लाटा गडमाथ्याला धडका देत गुरफटून टाकत होत्या, पूर्वेला निसटत होत्या. गळ्यातल्या घंटा किणकिणत गाई-शेरडं माळावर विखुरलेली.

* गायखिंडीजवळ कातळकडय़ात पाण्याची टाकी

Advertisement

गडाच्या माथ्याकडून झेपावणारा कातळकडा जिथे संपतो, तिथे माकडवाटांनी कडय़ाला बिलगून धोंडे-झाडी-जाळ्यांमधून प्रदक्षिणा घालायची होती. डोक्यावर हेल्मेट आणि त्यावरून मधमाश्याप्रतिबंधक जाळीची टोपी चढवली. गायखिंडीपासून धारेवरून ५० मी उंची चढून नेढय़ापाशी पोहोचलो. पूर्वाभिमुख कातळात जमिनीच्या पातळीवर मुख असलेले, दीड मीटर रुंदी-उंचीचे टिचके कोरडे टाके होते. नेढय़ापासून गडाच्या उत्तर पोटातून विंचूकाटय़ाच्या दिशेने आडवे निघालो. कातळातल्या दोन पावठय़ा नोंदवत, दगड-घसाऱ्यातून कारवीचे बुंधे पकडून तोल सांभाळत दरडीवरून उतरलो. उत्तराभिमुख कातळात जमिनीच्या पातळीशी मुख असलेले, बोगद्यासारखी खोदाई केलेले टाके आढळले. विवेकसरांनी नोंदवहीत निरीक्षणे आणि रेखाटन केले. दोन अनवट टाक्यांच्या नोंदीसोबत, लोहगड परिक्रमेची सुरुवात झक्क झालेली.

* उत्तर कातळकडय़ाच्या पोटातून दुर्गम धाडसी वाटचाल

Advertisement

डावीकडे डोकावणाऱ्या कातळकडय़ावर वाळलेल्या गवताचे-शेवाळ्याचे पट्टे विखुरलेले; पायथ्याशी शिळांचा खच आणि माजलेली झुडपं यातून कसरत करत जाणारी शिकाऱ्यांची पुसट पावठी. आमच्यासोबत उंडारायला निघालेला कुत्रा रानातले आवाज-गंध टिपत कधी पायात घुटमळायचा, तर कधी गुरगुरत सावध व्हायचा. एका क्षणी रानातल्या शांततेला चिरणारा आवाज घुमला. आमच्या चाहुलीमुळे भेकराने धोक्याची सूचना दिलेली. कडय़ाच्या पोटात ओलावा-गारवा होता. राखाडी कातळात स्फटिकांची नक्षी, त्यावर कोळ्याच्या जाळ्यांचे नक्षीकाम आणि बाहेर पाकोळ्यांच्या विष्ठेचा खच पडलेला. कुठे तिरकी लगबगीने जाणारी ‘रॉक गेको’ पाल, तर कुठे कपारीबाहेर शिकाऱ्यांनी साळिंदर-सशाला कोंडीत पकडण्यासाठी पन्हळीसारखी दगडांची रास रचलेली. एके ठिकाणी दगड-झुडपांच्या गचपणात अडकलो. हेल्मेट आणि मधमाश्यारोधक टोपीमुळे हालचाल अवघड झालेली. वाट बंद झाल्याचं वाटू लागलं. इतक्यात, गडमाथ्यावरून शिवछत्रपतींचा जयघोष दरीत घुमला. मार्गही निघाला आणि गायखिंडीपासून गडाची उत्तर बाजू दोन तास कडय़ाच्या पोटातून जात आम्ही पोहोचलो विंचूकाटा माचीच्या कुशीत.

* विंचूकाटा माचीच्या पोटातली लेणी-विवरे-टाकी

Advertisement

लोहगड परिक्रमेच्या दुसऱ्या टप्प्यात विंचूकाटा माचीच्या पोटात मानवनिर्मित लेणी-टाकी उलगडणार होती. पहिली कातळकपार खुणावू लागली. १४ मीटर रुंद आणि ४.५ मीटर खोलीच्या कपारीत दोन ठिकाणी त्रोटक खोदाई आणि विभाजक खाच होती. तळाची सपाटी, पाठीमागचा कातळ आणि छत छिन्नीने तुळतुळीत केलेले. निसटत्या कातळपट्टीवरून पश्चिमेला २० मीटर आडवं गेल्यावर, २१ मीटर रुंद आणि ४ मीटर खोल कपार उलगडली. एका बाजूला सपाटी आणि छत छिन्नीने तासलेलं. गुहेचा विस्तृत उघडा भाग बघता, तात्पुरत्या निवाऱ्यासाठी वापर होत असावा. समोरच्या आंब्यावर फांदीवरून धांदल करणारी ‘शेकरू’ खार पाहून आश्चर्य-आनंद वाटलं. लोहगडच्या उरल्यासुरल्या रानात शेकरू तग धरून होती. गुहेतून पायथ्याशी सात मीटर उतरण्यासाठी उत्तम कटाई असलेला अरुंद जिना कातळात खोदलेला. कातळात साध्या-रांगडय़ा पावठय़ा खोदण्याऐवजी कोण्या पाथरवटाने अदाकारी दाखवलेली.

पश्चिमेला १०० मी. आडवे जात कपारी-गुहा तपासत निघालो. किंचित उंचावरची कपार चढून गेलो. ओबडधोबड कातळमुखाजवळ खोदीव खळगे होते. वाकून प्रवेश केल्यावर चार मीटर रुंद, साडेपाच मीटर खोल आणि दीड मीटर उंचीचा विस्तार आणि छिन्नीने सपाट केलेल्या भिंती दिसल्या. निवासी लेणींमध्ये नैसर्गिक झरा लागल्याने गारेगार पाणी साठले होते. कुठे तरी लपलेल्या बेडकाने सूर लावलेला. निसरडय़ा वाटेवरून पुढे निघालो. उजवीकडे खाली घेरेवाडीतली चिमुकली घरं, तर डावीकडे होती माथ्यावर विंचूकाटा माचीची तटबंदी. गडाचं विहंगम दर्शन घेणाऱ्या ‘ड्रोना’चार्याला गडाच्या पोटातल्या गुहांची आणि तिथे लुडबुड करणाऱ्या ट्रेकर्सची चाहूल लागली नव्हती.

Advertisement

पुढे उत्तराभिमुख कातळपोकळीत किंचित नागमोडी बोगदा खोदलेला दिसला. आम्ही आलेलं न आवडल्याने, गुहेतून हजारोंच्या संख्येने कसल्याशा माश्या घोंघावत बाहेर आल्या. मधमाश्यारोधक टोपी, शरीर पूर्ण झाकणारे कपडे असल्याने आम्ही स्तब्ध राहिलो. मीटरभर रुंदीच्या बोगद्यातून रांगत गेल्यावर इंग्रजी ‘एल’ आकारात खोदलेले एकापाठोपाठ दोन टप्पे उतरलो. साम्ेचार मीटर खोल- दोन मीटर रुंदीची खोली आणि गच्च दगड-धोंडे साचलेले.

विंचूकाटा माचीच्या टोकाच्या बुरुजाच्या पोटात पोहोचलो. कोसळणाऱ्या जलधारांचे ओरखडे सोडले तर गवताचं पातंही नसलेला भव्य कातळकडा जणू अंगावर कोसळू पाहत होता. विंचूकाटा लेणीसमूहातील शेवटच्या गुहेची खोदाई उलगडू लागली. कंबरेवर हात ठेवून गुहेकडे चढणाऱ्या आरोहकांकडे बघत होतो. इतक्यात ओरडा झाला, ‘अरे माकडं बघ सॅकपाशी.’ खाऊच्या आशेने माकडांनी सॅकची चेन सराईतपणे उघडलेली आणि पोटाला पिल्लं बिलगलेल्या माकडिणीने दात विचकारलेले. कसंबसं सॅक सोडवून दडवली.

Advertisement

वायव्येकडे उघडणाऱ्या गुहेच्या मुखापर्यंत तीन मीटर सोपा कातळटप्पा चढून गेलो. टॉर्चचे प्रखर झोत, हाकारे टाकून आणि दांडक्याने कातळ ठोकून, गुहेत कदाचित दडलेल्या सरीसृपांना- साळिंदरांना आगमनाची वर्दी दिली. नैसर्गिक पोकळीला खोदत नेलेल्या छिन्नीचे घाव कातळावर उमटलेले. जेमतेम एक मी. उंच-रुंदीच्या गुहेत डोकावल्यावर, तळाशी षटकोनी आकाराचे आणि पाऊण मी. लांबी-रुंदीचे मुख दिसले. मुखापासच्या डावी-उजवीकडच्या खोदीव खाचा निरखून आत डोकावल्यावर इंग्रजी ‘एल’ आकारामध्ये काळोखात विवर हरवलेले दिसले. दोन्ही बाजूंच्या कातळपट्टीवर तळवे टेकवून, अलगद विवराच्या आत पाय सोडत गेलो. दीड मीटर खोलीवर पाय टेकले.

विवराच्या आत डोकावल्यावर थक्क झालो. पाऊण मीटर रुंदीचा आणि सहा मीटर लांब चौकोनी गूढ बोगदा समोर होता. सरपटत पुढे सरकताना उडणारे धुळीचे कण टॉर्चच्या प्रकाशात उजळत होते. भिंतीला चिपकलेला एखादा कोळी अचानक समोर आल्याने दचकलो. टोकाशी अजून एक इंग्रजी ‘एल’ आकाराची खोदाई होती. सव्वा मीटर उतरल्यावर अंधारी खोली जाणवू लागली. डावीकडे-उजवीकडे चार मी. लांब, अडीच मी. रुं दी आणि दीड मी. उंची असा विस्तार. खोलीच्या भिंती आणि माथा छिन्नीच्या घावांनी तासलेल्या, पण खोदाईनंतर धोंडे बाहेर काढले नव्हते. छतापाशी हलका ओलावा असला तरी भरभरून पाणी साठत नसावे. सरपटी विवरात धपापलेलो. गुदमरू लागलेले. काय असेल या विवर-लेणीचे प्रयोजन? लेणी कोण्या साधकांची? की पाण्याचे टाके? की लोहगडाचे संरक्षण मेट? की शिकाऱ्यांनी खोदलेले? काहीच निष्कर्ष काढता येईना.

Advertisement

लोहगड परिक्रमेच्या पूर्वार्धात कडय़ातली लेणी-टाकी धुंडाळताना, गायखिंडीवरच्या कडय़ात दोन पाण्याची टाकी आणि विंचूकाटा माचीच्या पोटात पाच लेणी-टाकी आढळलेली. अभ्यासू ट्रेकर दोस्तांबरोबर कष्टसाध्य निखळ आनंद अनुभवत होतो. कल्पनाही नव्हती, की परिक्रमेच्या उत्तरार्धात गडपुरुष प्रसन्न होऊन पुरातन खजिना उलगडणार आहे..

नोंदी :

Advertisement

१. सहकार्याबद्दल ‘भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागा’चे आभार

२. नकाशा, फोटो : साईप्रकाश बेलसरे

Advertisement

response.lokprabha@expressindia.com

The post शोध वारशाचा : लोहगड परिक्रमेतला पुरातन खजिना (पूर्वार्ध) appeared first on Loksatta.

AdvertisementSource link

Advertisement