मुंबई4 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
उद्धव ठाकरे यांना सत्तेची भूरळ पडली होती. म्हणूनच त्यांनी शरद पवार यांच्याकडून मुख्यमंत्रिपदाबाबत वदवून घेतले होते त्यानंतर ते मुख्यमंत्री झाले, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. यासह उद्धव ठाकरेंनी हिंदुत्त्वाची भूमिका बदलली, सावरकर आणि हिंदुत्वावर त्यांन बोलण्याचे टाळले असा आरोपही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर केला. आज कोकणातील खेड (जि. रत्नागिरी) येथे गोळीबार मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या सभेला ते संबोधित करत होते.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा झाली. त्यावेळी ते सभेत बोलत होते. आपल्या भाषणात त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडले.
त्याच मैदानावर ठाकरेंना प्रत्युत्तर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जमलेल्या माझ्या तमाम कोकणातील बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो म्हणत भाषणाला सुरूवात केली. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सभेपेक्षा आमचे भगवे वादळ मोठे आहे, हे दाखवून द्या असे म्हणत टोला लगावला. काही दिवसांपूर्वी खेडच्या याच मैदानावर उद्धव ठाकरे यांनी सभा घेत सीएम शिंदेंवर तोफ डागली होती. आता तेथेच सभा घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.
ठाकरेंचा थयथयाटएकनाथ शिंदे म्हणाले, या मैदानात बाळासाहेब ठाकरेंची सभा झाली होती, ती सर्वांनी ऐकली. मात्र, मागच्या आठवड्यात येथे ठाकरेंच्या सभेचा फुसका बार झाला. त्यांच्याकडून थयथयाट आणि आदळआपट सुरू असून त्यांच्याकडे मोजून 2 ते 3 शब्द आहेत असा टोलाही मुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरेंना लगावला.
सर्कशीप्रमाणे ठाकरेंच्या सभा होणार
सीएम शिंदे म्हणाले, सर्कशीप्रमाणे त्यांच्या राज्यभर सभा होतील, आमच्या या सभेने त्यांना उत्तर दिले आहे. कोकणी माणूस आमच्या पाठिशी आहे. आमची भूमिका ही बाळासाहेबांचे विचार आणि हिंदुत्वाची भूमिका आहे. आमच्या क्रांतीमध्ये कोकण विभागातील अनेक आमदार शिलेदार सोबत आले.
आम्ही पक्ष वाचवला
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, हा निर्णय जर घेतला नसता तर आज काय परिस्थिती झाली असती. ज्येष्ठ नेत्यांनी का मला पाठिंबा दिला याचा विचार करण्याची गरज आहे. आमचेही जिव्हाळ्यांचे नाते आहे. सत्तेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दावनीला पक्ष बांधला होता. पक्ष गहाण ठेवला होता तो आम्ही वाचवला.
तो डाग आम्ही पुसला
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, लोकांनी बाळासाहेबांच्या विचारांना मतदान केले होते, ते मतदान भाजपसोबत असताना झाले होते. मात्र, सत्तेसाठी मविआसोबत गेले, तो डाग पुसण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला. म्हणूनच निवडणूक आयोगाने आमच्या बाजूने निर्णय दिला. बाळासाहेबांचा विचार आमच्यासोबत आहे. सत्तेसाठी सगळी तडजोड करण्यात आली, पैसा आणि सत्ता येते जाते पण नाव गेले की ते पुन्हा येत नाही असे बाळासाहेब कायम म्हणायचे. त्यांच्या विचाराचे खरे वारस म्हणून आपण शिवसेना पुढे नेण्याचे काम करू असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
2019 मध्ये गद्दारी झाली
सीएम शिंदे म्हणाले, गद्दारी आम्ही नाही तर 2019 ला उद्धव ठाकरेंनी गद्दारी केली. बाँबस्फोट करणाऱ्या लोकाशी संबंधित लोकांशी मांडीला मांडी लावून आपण कसे बसू शकतो? सावरकरांचा अपमान आम्ही सहन करु शकत नाही, राहुल गांधी त्यांच्या विरोधात बोलला तरी आपण त्यांना काही बोलू शकले नाही. सत्तर वर्षे देशाची लूट करणाऱ्या टोळीसोबत आपण आहात की 370 रद्द करणाऱ्यांसोबत आहात? देशासाठी काम करणाऱ्या देशभक्तांसोबत आपण आहात?
भाजपने बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण केले
सीएम शिंदे म्हणाले, बाळासाहेब ठाकरेंचे 370 हटवण्याचे आणि राममंदिराचे स्वप्न हे भाजपने पू्र्ण केले. म्हणून आम्ही देशभक्तासोबत जाण्याचा निर्णय आम्ही घेतला असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. राहुल गांधी यांच्या यात्रेत काश्मीरमध्ये तिरंगा मोदींनी 370 हटवल्याने फडकवता आला. बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा उद्धव ठाकरेंनी सोडला आहे. तुम्ही केवळ त्यांच्या संपत्तीचे वारसदार आहेत.
काॅंग्रेससाठी ठाकरे मते मागतात हे चुकीचे
एकनाथ शिंदे म्हणाले की, राहुल गांधी जर पक्षाचे अध्यक्ष पद सांभाळू शकत नाही, तो पंतप्रधान काय होणार. त्यांच्यासाठी बाळासाहेबांचा नातू आणि मुलगा मते मागतो हे बरोबर आहे का? असा सवाल एकनाथ शिंदेंनी उपस्थित केला आहे. उद्धव ठाकरेंनी पक्षासाठी काय केल असा सवाल एकनाथ शिंदेंनी उपस्थित केला आहे. तर माझ्यावर 109 केसेस आहेत, तुमच्यावर किती केस आहे असा सवालही ठाकरेंना केला आहे.
उद्धव ठाकरेंनी पक्ष संपवला
सीएम शिंदे म्हणाले, रामदास कदम यांना संपविण्यासाठी दोन नगरपालिका राष्ट्रवादीच्या धश्यात टाकल्या असा आरोपही मुख्यमंत्री शिंदेंनी केला आहे. आपल्या आमदारांना पाडण्यासाठी कोणता पक्षप्रमुख कट करू शकतो असा सवाल उपस्थित करत उद्धव ठाकरेंवर जोरदार टीकास्त्र डागले आहे. राज ठाकरेंपासून तर रामदास कदम यांच्यापर्यंत सगळ्यांना पक्ष वाढवण्याची जबाबदारी घेत असताना त्यांना पक्ष सोडण्यासाठी मजबूर केले.
शिंदे गद्दार नाही, खुद्दार
सीएम शिंदे म्हणाले, ज्या काँग्रेसने देशाला लुटले, ज्यांनी मुंबईत बाँबस्फोट घडवले त्यांच्यासोबत केवळ सत्तेसाठी मांडीला मांडी लावून बसलात अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. काश्मीरमधील 370 कलम मोदींनी हटवले, ज्यांना राम मंदिराची उभारणी केली, ज्यांनी बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण केले, त्यांच्यासोबत जाण्याची आमची भूमिका चुकीची कशी असा सवालही त्यांनी विचारला. हा शिंदे गद्दार नाही, खुद्दार आहे, शिंदेच्या रक्तात बेईमानी नाही, आम्ही तुमच्यासारखे सत्तेसाठी मिंधे झालेलो नाही.