हिंगोली2 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
माझ्यासोबत असलेली जनता हीच माझी शक्ती असून त्यासाठी प्रदर्शन करण्याची गरज नाही, असे मत माजी मंत्री तथा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी रविवारी (ता. 10) हिंगोलीत पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी शिवशक्ती परिक्रमा यात्रेच्या निमित्ताने औंढा नागनाथ येथे दर्शन घेतले. यावेळी त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती. त्यानंतर त्यांचे हिंगोली येथे आ. संतोष बांगर यांनी स्वागत केले.
हिंगोली येथे माजी आमदार गजानन घुगे यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष फुलाजी शिंदे, आमदार तानाजी मुटकुळे माजी आमदार गजानन घुगे, माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी त्या म्हणाल्या की, शिवशक्ती परिक्रमेमध्ये आज औंढा नागनाथ येथे नागनाथाचे दर्शन घेतले. शिवशक्ती परिक्रमा प्रचंड यशस्वी झाल्याचेही त्यांनी सांगितले. शिवशक्ती परिक्रमा हे शक्तिप्रदर्शन नाही तर शक्ती आहे. प्रत्येक वेळी जनता माझ्यासोबत राहिलेली आहे. त्यामुळे जनता हीच माझी शक्ती असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या शिवशक्ती परिक्रमा यात्रेमध्ये जनतेचे भरपूर प्रेम मिळाले पक्ष जातीच्या, धर्माच्या पलीकडे जाऊन लोकांनी मोठे स्वागत केले. लातूर जिल्ह्यात शंभर टक्के मुस्लिम समाज असलेल्या गावातही आपले स्वागत झाल्याचेही त्यांनी सांगितले. आमदार संतोष बांगर यांचा दबंग कारभार आहे. त्यांना मंत्रीपदासाठी भरपूर आशीर्वाद देते त्यांना नक्कीच संधी मिळेल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
राज्यात मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर बोलताना त्या म्हणाल्या की, मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हा प्रश्न आता निकाली लागण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी शासनाने ही बैठक बोलावली आहे. या बैठकीला मलाही निमंत्रित करण्यात आली आहे मात्र परिक्रमा यात्रेचा समारोप असल्यामुळे बैठकीला उपस्थित राहता येणार नाही. मात्र मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सकारात्मक विराम लागला पाहिजे असे त्यांनी यावेळी सांगितले.