अमरावती2 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
येथील शासकीय विदर्भ ज्ञान-विज्ञान संस्था (व्हीएमव्ही) या परीक्षा केंद्रावर विधी विषयाच्या परीक्षेदरम्यान झालेल्या कॉपी प्रकरणाचा रितसर अहवाल आज, बुधवार, २४ मे रोजी विद्यापीठात पोहोचला. अहवाल देण्यासाठी टाळाटाळ सुरु असल्यामुळे प्र-कुलगुरु डॉ. प्रसाद वाडेगावकर यांनी मंगळवारी व्हीएमव्हीतील परीक्षा केंद्र प्रमुखांना संदेश पाठविला होता.
सकाळी साडे अकरापर्यंत अहवाल सादर न केल्यास दुपारनंतर विद्यापीठ योग्य ती कारवाई करेल, असे त्यांच्या संदेशात म्हटले होते, अशी माहिती आहे. त्यामुळे व्हीएमव्ही प्रशासनाने दुपारी अहवाल सादर केल्याचे विद्यापीठ सूत्रांनी स्पष्ट केले.
२० मे रोजी विधी विषयाच्या दुसऱ्या सत्राचा दुसरा पेपर होता. या पेपरदरम्यान एका परीक्षार्थ्याने व्हाॅटस्अपद्वारे एका त्रयस्थ व्यक्तीला प्रश्नपत्रिका पाठविली. पुढे ती आणखी एकाच्या मोबाइपर्यंत पोहोचली. त्यामुळे पोलिसांनी दोन विद्यार्थ्यांसह तिघांना ताब्यात घेऊन विचारपूस केली व चौकशीअंती त्यांना सोडून दिले.
विद्यापीठ सूत्रांनुसार १८, २०, २२ व २४ मे रोजी विधी विषयाच्या दुसऱ्या सत्राची परीक्षा होती. त्यापैकी दुसऱ्या पेपरदरम्यान हे कॉपी प्रकरण उघड झाले. नेहमीच्या पद्धतीनुसार कॉपी प्रकरणाचा अहवाल केंद्राधिकाऱ्यामार्फत तत्काळ विद्यापीठाला सादर केला जातो. त्यामध्ये एकूण कॉपी प्रकरण कसे घडले, परीक्षार्थ्याने गैरमार्गासाठी कोणत्या पद्धतीचा वापर केला, त्याच्याकडून काय-काय हस्तगत करण्यात आले, सदर विद्यार्थ्याची उत्तरपत्रिका आदी सर्व दस्तऐवज अहवालासोबत सादर करावयाचे असतात. परंतु या प्रकरणात कमालीची टाळाटाळ सुरु होती, असा विद्यापीठाचा अनुभव आहे.
पुढे काय होणार?
प्राप्त झालेला महाविद्यालयाचा अहवाल आणि कॉपी प्रकरण ज्या दिवशी घडले, त्यावेळी व्यवस्थापन परिषद सदस्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळ गाठून तयार केलेला अहवाल या दोन्ही बाबी विद्यापीठाच्या ४८-५ समीतीसमोर (परीक्षेतील गैरमार्गाविरुद्ध निर्णय घेणारी प्राधिकारिणी) ठेवला जाईल. ही समिती खुद्द कॉपी बहाद्दरांना पाचारण करुन त्यांचेही जबाब नोंदवून घेईल. त्यानंतर आवश्यक त्या शिफारशींसमोर हा मुद्दा अंतिम निर्णयासाठी कुलगुरुंपुढे ठेवला जाईल, असे परीक्षा संचालक डॉ. मोनाली तोटे यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले.