सोलापूर17 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
सरकारी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये (आयटीआय) डिप्लोमाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना यंदाच्या (सन २०२३-२४) या शैक्षणिक वर्षांपासून दरमहा ५०० रुपये विद्यावेतन (स्टायपेंड) देण्यात येणार आहे.
त्याचा फायदा सोलापूर शहरातील दोन आयटीआयसह ग्रामीण भागातील १० आयटीआय मधील २५०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना होणार आहे.
दूर्बल घटकांना विद्यावेतन
आयटीआयमध्ये शिकणारे विद्यार्थी प्रामुख्याने आर्थिक दुर्बल घटकांसह, ग्रामीण भागातील असतात. सध्या आयटीआय मधील विद्यार्थ्यांना ४० रुपये, अनुसूचित जाती, जमातीच्या विद्यार्थ्यांना ६० रुपये विद्यावेतन मिळते. त्यामध्ये वाढ करावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने सुरु होती.
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी वाढीव विद्यावेतनाची घोषणा केली होती. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय तर्फे राज्यातील सर्व जिल्ह्यांसह मतदारसंघामध्ये छत्रपती शाहू महाराज युवाशक्ति करिअर शिबिराचे आयोजन केले आहे. त्यामध्ये एका कार्यक्रमात मंत्री लोढा यांनी त्या निर्णयाचा पुनरुच्चार केला असून यंदाच्या शैक्षणिक वर्षांपासून विद्यावेतन मिळेल असे स्पष्ट केले.
विद्याथ्यांना हमखास नोकरी
दहावीनंतर दोन वर्षांचा आयटीआय डिप्लोमा केल्यानंतर विद्यार्थ्यांना हमखास नोकरी मिळू शकते.त्यामुळे प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांचा आेढा आयटीआयकडे असतो. अनेक आयटीआय मध्ये वसतिगृहांची सुविधा असल्याने दैनंदिन खर्च भागविण्यासाठी आर्थिक मदतीच्या दृष्टीने विद्या वेतनाचा फायदा विद्यार्थ्यांना होईल.
रोजगाराच्या संधी
उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाविन्यपूर्ण रोजगाराच्या संधी आहेत. मात्र, त्यासाठी कौशल्याचे प्रशिक्षण घ्यायचे कुठे? त्या संस्था कोणत्या आहेत? प्रवेश प्रक्रीया असते कशी? याबाबतची माहिती अनेकांना नसल्याने युवक-युवती पुन्हा पारंपारिक शिक्षण, प्रशिक्षणाकडे वळतात. त्या युवक-युवतींना आत्मनिर्भर होण्यासाठी नवीन अभ्यासक, त्याची तांत्रिक माहिती व्हावी यासाठी सोलापुरातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये छत्रपती शाहू महाराज युवाशक्ति करिअर शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. सहा जून पर्यंत हे शिबीर चालणार आहे.
शनिवारी (दि. २०) शहरातील मुलींची औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अक्कलकोट येथील आयटीआय मध्ये होणार असल्याचे, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी सुरेश भालचीम यांनी सांगितले.
बँकखत्यात जमा होईल विद्यावेतन
सरकारी आयटीआय मधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षांपासून ५०० रुपये विद्यावेतन मिळेल. उत्पन्नाचे निकषासह, प्रवेश अर्जासोबत बँक खाते क्रमांक घेण्यात येईल. शासनाकडून त्यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना आल्यानंतर त्यामधील निकषांच्या आधारे थेट बँक खात्यामध्ये विद्यावेतन जमा होईल. त्यासाठी विद्यार्थ्यांना आयटीआय मध्ये कोणतेही वेगळे काम करावे लागणार नाही.
– सुरेश भालचीम, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी