औरंगाबादएका तासापूर्वी
- कॉपी लिंक
गेल्या वर्षी झालेल्या अध्ययनस्तर निश्चितीमध्ये भाषा विषयांसह जवळपास 55 टक्के विद्यार्थी हे गणित विषयात मागे, तर 48 टक्के विद्यार्थी विज्ञानात कच्चे असल्याचे समोर आले होते. त्यावर आता संघटनांनी शिकवण्यासाठी शिक्षकच नसतील तर विद्यार्थी गुणवत्ता वाढणार तरी कशी? असा सवाल उपस्थित केला आहे. जिल्हा परिषदेत 200 हून अधिक शिक्षकांची पदे रिक्त आहेत. यात सर्वाधिक प्रमाण विज्ञान व गणित विषयाच्या शिक्षकांचे आहे. त्यातच तब्बल 104 शिक्षकांची नेमणूक केंद्र प्रमुखांच्या रिक्त जागांवर केल्यामुळे आता विद्यार्थ्यांचा गणित व विज्ञान विषयातील गुणवत्तेचा टक्का घसरण्याची भीती निर्माण झाली आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्हयात एकूण 128 पदे केंद्र प्रमुखांची मंजूर आहेत. त्यातील केवळ 24 जागांवर पूर्णवेळ केंद्र प्रमुख आहेत. तर 104 केंद्र प्रमुखांची पदे रिक्त आहेत. त्यांचा अतिरिक्त कार्यभार सहशिक्षकांकडे देण्यात आला आहे. शिक्षकांची 200 हून अधिक पदे रिक्त असतानाही असे करण्यात आले आहे. बदली प्रक्रियेतही काही शिक्षक दुसऱ्या ठिकाणी गेले आहेत.
केंद्र प्रमुख आणि विस्तार अधिकारी शाळांपर्यंत पोहोचून शिक्षकांना मार्गदर्शन करणे, नवनवीन अध्ययन, अध्यापन कौशल्य सांगण्यासह प्रशासन व शिक्षकांमधील दुवा म्हणून काम करतात. मात्र शिक्षक आणि केंद्र प्रमुखांची पदेे रिक्त असल्यावर काय करायचे?, असा प्रश्न संघटनांनी एका निवेदनाद्वारे प्राथमिक शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांना केला आहे. अगोदरच जिल्हा परिषद विद्यार्थ्यांची गुणवत्ता कमी असल्याची टीका केली जाते. ती वाढवण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न केले जात आहेत. पण शिक्षकांच्या रिक्त जागांमुळे घोडे अडत आहे, असे या संघटनांनी म्हटले आहे.
शालेय शिक्षण विभागाने 6 वी ते 8 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना भाषा, समाजशास्त्र, गणित, विज्ञान हे विषय प्राधान्याने ठरवून दिले आहेत. जिल्हा परिषद शाळांमध्ये भाषा व समाजशास्त्राचे शिक्षक सर्वाधिक आहेत. त्यानंतर प्राधान्यक्रम बदलला. विज्ञान, भाषा, समाजशास्त्र असा क्रम निश्चित केला गेला. 2014 आणि 2015 मध्ये विज्ञान व गणित या विषयाच्या शिक्षकांची संख्या कमी असल्याची वस्तुस्थिती समोर आली. त्यामुळे गणित व विज्ञान शिक्षकांची भरती करण्याची मागणी शिक्षक संघटनेतील राजेश हिवाळे, मधुकर वालतुरे आणि बळीराम भुमरे यांनी केली आहे.
संख्येनुसार हवेत शिक्षक
जिल्हा परिषदेच्या शाळेत 45 पटसंख्या असलेल्या वर्गासाठी विज्ञान व भाषा विषयांचे 2 शिक्षक आवश्यक असतात. तर 46 ते 79 विद्यार्थ्यांसाठी भाषा, विज्ञान व समाजशास्त्र या 3 विषयांचे शिक्षक आवश्यक आहेत. तसेच 80 पेक्षा जास्त विद्यार्थी पटसंख्या असलेल्या शाळेत विज्ञान, भाषा, समाजशास्त्र व विज्ञान असे एकूण 4 विषयांचे शिक्षक शाळेत असणे आवश्यक आहे.