औरंगाबाद33 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
मुंबई प्रादेशिक हवामान केंद्रातून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार छत्रपती संभाजीनगर शहर जिल्ह्यात बुधवार ते रविवार दरम्यान आकाश ढगाळ राहुन हलका ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र, जिथे पोषक वातावरण असेल तिथेच पावसाचा जोर राहणार आहे. म्हणजेच कुठे धो धो तर कुठे हलका ते मध्यम व कोरडे ठाकही असेल. अशा पद्धतीने स्थळनिहाय पडणाऱ्या पर्जन्यमानात कमालीचा फरक राहणार आहे.
सप्टेंबरचे पहिले पाच दिवस कोरडे ठाक गेले. मात्र, बंगालच्या उपसागरावरील शाखा ६ सप्टेंबरपासून पाऊस घेऊन आली. ९ सप्टेंबर सकाळी साडेआठ वाजेपर्यंत शहर जिल्ह्यांत ६८ मिमी पाऊस पडला. यामुळे मोठा दिलासा मिळाला. दुष्काळाचे तीव्र सावट काही अंशी कमी झाले. तर गत तीन दिवसांपासून ग्रामीण भागात अत्यल्प पाऊस पडण्याची नोंद झाली. शहरात उघडीप होती. तर १३ व १४ सप्टेंबर रोजी तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. १५ ते १७ सप्टेंबरला बहुतांश ठिकाणी हलका ते जोरदार पाऊस पडणार आहे. वाऱ्याचा वेग ताशी १० ते ३० किमी पेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.
श्री. गणेशा पाऊस घेऊन येणार
प्रादेशिक वेध शाळेच्या विस्तारीत अंदाजानुसार १७ ते २३ सप्टेंबर दरम्यान आकाशात अंशत:ढगाचे आच्छादन राहणार आहे. अधून मधून जोरदार पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. म्हणजेच श्री गणेश दुष्काळाचे सावट कमी करण्यासाठी यंदा पाऊस बरोबर घेऊन येणार असल्याचे स्पष्ट होते. याचा खरीप बरोबरच रब्बी पेरणीसाठी खुप उपयोग होईल.
तापमानात 2 अंशांनी वाढ
कमाल तापमानात गत दोन दिवसांपासून दोन अंश सेल्सियसने वाढ होवून ते ३१.५ तर किमान तापमान स्थिर आहे. दिवसाचे तापमान व आर्द्रतामुळे उकाड्यात वाढ झाली आहे.