स्वप्नील सवाळे | अमरावती33 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
चार वर्षे ठप्प राहिलेली निर्बीजीकरण प्रक्रिया, प्राणिमित्रांचा विरोध यामुळे शहरासह जिल्ह्यात मोकाट श्वानांची संख्या अनियंत्रितपणे वाढली असून नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. रात्री फिरताना कुत्री अंगावर धावून येत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिक घाबरले आहेत. जिल्ह्यात वर्षभरात २८ हजार ३९१ नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतला.
मनपा क्षेत्रात वर्षभरात १६ हजार ५२९ कुत्र्यांनी चावा घेतला. त्यानुसार दररोज सरासरी ४५ नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. तरीही या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ठोस उपाययोजना शासन स्तरावरून होत नसल्याबद्दल संताप आणि चीड व्यक्त केली जात आहे. नगर पालिका, मनपा प्रशासनाकडून या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी मागील काही वर्षांत खर्च झालेल्या निधीच्या प्रमाणात कुत्र्यांची संख्या कमी होण्याऐवजी त्यात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे निर्बीजीकरणाच्या मोहिमेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मनपा क्षेत्रात १६ हजार ५२९ जणांना कुत्री चावल्याचे धक्कादायक वास्तव आहे. त्यामुळे रात्रीचे घराबाहेर पडताना आम्हाला भीती वाटते, अशा प्रतिक्रिया नागरिकांनी दिल्या.
खेळणाऱ्या मुलांना घेतला चावा
परिसरामध्ये अलीकडे भटक्या कुत्र्यांचे प्रमाण वाढले आहे. हे कुत्रे घरात घुसायलाही कमी करत नाही. सायंकाळच्या वेळी लहान मुले अंगणात खेळत असताना हे कुत्रे त्यांच्यावर हल्ला चढवून चावा घेत आहेत. सुदैवाने काही मुले त्यांच्या तावडीतून सुटलीत. परंतु, ज्या मुलांना चावा घेतला त्यांच्या मनामध्ये कुत्र्यांविषयी धास्ती निर्माण झाली असून परिसरातील नागरिकांनीदेखील कुत्र्यांचा धसका घेतला आहे. -अजिंक्य नळकांडे, नागरिक
दाेन हजार श्वानांचे निर्बीजीकरण
मे २०१६ ते जुलै २०१७ या कालावधीत ९ हजार ८८४ श्वानांची नसबंदी करण्यात आली. त्यावर प्रति श्वान ७४५ रुपये खर्च केला. त्यानंतर काही कारणास्तव निर्बिजीकरण मोहीम बंद होती. मात्र, मध्यंतरी मनपा प्रशासनाने पुन्हा सुरू केली आहे. अलीकडे २ हजारांच्या वर कुत्र्यांवर निर्बिजीकरण शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यासाठी पथकेही गठीत करण्यात आली आहेत. -डॉ. सचिन बोंद्रे, पशू शल्य चिकित्सक, मनपा,अमरावती.
कुत्र्यांनी चावा घेतलेल्या नागरिकांवर झालेले उपचार
इर्विंन रुग्णालय १६५२९, अंजनगाव सूर्जी १४६८, भातकुली ४४८, चांदूर बाजार १५०१, चांदूर रेल्वे ६१३, चिखलदरा ६०, चूरणी २७८, धामणगाव रेल्वे ३९७, नांदगांव खंडेश्वर ५६४, वरूड ९०१, अचलपूर २१७७, दर्यापूर १०९३, धारणी ८३९ मोर्शी ८७०, तिवसा ६५३ एकूण २८३९१.