अमरावती14 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
दुचाकीवर दळण घेऊन जाणाऱ्या एका ४२ वर्षीय व्यक्तीच्या दुचाकीसमोर एक दुचाकी आली, त्यामुळे तो व्यक्ती खाली पडला. त्याने अचानक समोर आलेल्या दुचाकीस्वाराला याबाबत विचारणा केली तर त्याने थेट मारहाण केली. तसेच त्याचा एक साथीदार त्या ठिकाणी आला व दोघेही दुचाकी घेऊन निघून गेले. जाताना त्या व्यक्तीला ठाण्यात ये म्हणाले, परंतु ठाण्यात न पोहाेचता पसार झाले होते. ही घटना रविवारी शहरातील महेंद्र कॉलनी भागात घडली आहे. प्रवीण भाऊराव मेहरे (४२, रा. प्रवीणनगर) असे तक्रारदाराचे नाव आहे. प्रवीण मेहरे रविवारी दुचाकीने दळण घेऊन महेंद्र कॉलनी भागातून जात होते.
त्याचवेळी रस्त्यात त्यांच्या दुचाकीसमोर एक व्यक्ती दुचाकी घेऊन आला. त्यामुळे मेहरे दुचाकीवरून खाली पडले. त्यांनी दुचाकीस्वाराला विचारणा केली. मात्र तो काही न बोलता त्याने प्रवीण मेहरेंना मारहाण सुरू केली. याच दरम्यान त्या व्यक्तीचा परिचित व्यक्ती त्या ठिकाणी आला व त्याने मेहरेंच्या दुचाकीची चाबी घेतली. काही वेळानंतर त्याने दुचाकीला चाबी लावली आणि ठाण्यात ये, असे मेहरेंना सांगितले व ते निघून गेले. दरम्यान मेहरे तत्काळ पोलिस ठाण्यात पोहाेचले तर त्यांची दुचाकीही नव्हती अाणि ते दोन व्यक्तीसुद्धा नव्हते. बराच वेळ त्यांनी प्रतीक्षा केली.
मात्र ते दुचाकी घेऊन आले नाही. अखेर प्रवीण मेहरे यांनी गाडगेनगर ठाण्यात दोन अज्ञाताविरुद्ध तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला. दरम्यान अशीच एक घटना काही दिवसांपूर्वी चिखलदरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतही घडली होती. त्यामुळे अशाप्रकारे वाद घालून दुचाकी पळवण्याचा नवा फंडा चोरट्यांनी सुरू केला का, अशी भीती सर्वसामान्य नागरिकांमध्ये व्यक्त केली जात आहे.