मुंबई29 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
आम्ही शरद पवारांपेक्षा काही वेगळी भूमिका घेतलीय, असे दाखवण्याचे कारण नाही, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेकांच्या प्रश्नार्थांक नजरांना एका झटक्यात उत्तर दिले आहे. अजित पवार यांनी घेतलेली भूमिका शरद पवार यांच्या संमतीनेच घेतली असल्याचा दावा आतापर्यंत अनेकांनी केला आहे. गेल्या काही दिवसांतील घटना पाहता, त्याला पुष्टी देखील मिळते. मात्र, तरी देखील शरद पवार वेगळी भूमिका मांडताना दिसतात. आता या प्रकरणावर अजित पवारांनीच उत्तर दिले आहे. आम्ही शरद पवारांपेक्षा काही वेगळी भूमिका घेतलीय, असे दाखवण्याचे कारण नाही, असे अजित पवारांनी ठणकावून सांगितले आहे.
या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, ‘सत्तेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने स्वत:ची विचारधारा बाजुला ठेवून 2019 मध्ये शिवसेनेबरोबर आघाडी केली होती. तिच शिवसेना आणि भाजप 25 वर्षांपासून मित्रपक्ष होते. भाजपबरोबर 25 वर्षे युती केलेला मित्रपक्ष अडीच वर्षे आम्हाला चालू शकतो. तर मग पुढच्या काळात युतीतील दुसरा मित्रपक्ष असेला भाजपही चालून घेतला पाहिजे.’
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्यासह जवळपास 40 आमदारांनी काही दिवसांपूर्वी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देत सत्तेत स्थान मिळवले होते. मात्र, अजित पवार यांच्यासह आमदारांनी सत्तेत सहभागी होण्यामागे शरद पवार यांची राजकीय खेळी असल्याचा दावा काही जाणकार करत आहेत. तर दुसरीकडे काहीही झाले तरी मी भाजपबरोबर जाणार नाही, अशी भूमिका शरद पवारांनी स्पष्ट केली आहे. या सर्व घडामोडींनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेली प्रतिक्रिया खुप काही सांगून जाते.
सगळ्यांनी बहुमताने निर्णय घेतला
या संदर्भात भाजपसोबत युती करण्याचा निर्णय शरद पवारांच्या संमतीने किंवा संमतीशिवाय घेतला का? असा प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला होता. यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, ‘लोकशाहीमध्ये बहुमताचा आदर करायचा असतो. लोकशाहीची हीच खरी पद्धत आहे. त्यामुळे आम्ही सगळ्यांनी बहुमताने हा निर्णय घेतला आहे.’