नाशिक14 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी 2019 मध्ये भाजपला गाफील ठेवून ऐनवेळी आमचा घात केल्याचा दावा राज्याचे कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना केला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी कोल्हापुरातील सभेत शरद पवार यांच्यावर टीकेची झोड उठवली. उद्धव ठाकरे यांचे सरकार संकटात सापडले तेव्हा राष्ट्रवादीच्या 52 आमदारांनी स्वतःच्या सहीनिशी सत्तेत सहभागी होण्याचे पत्र दिले होते. हे खरे नसेल, तर मी राजकारणातून संन्यास घेईल. पण हे खरे असेल तर तुम्ही राजकारणातून बाजूला व्हा, असे ते म्हणाले होते. त्यांच्या या विधानाचा दाखला देत गिरीश महाजन यांनी उपरोक्त दावा केला.
गिरीश महाजन म्हणाले की, 2019 मध्ये शरद पवार यांनी दिल्लीत भाजपसोबत जवळपास 4 बैठका घेतल्या. पण त्यांनी आम्हाला गाफील ठेवून ऐनवेळी आमचा घात केला.
काय म्हणाले गिरीश महाजन?
शरद पवारांनी 2014 ते 2019 दरम्यान भाजपला पाठिंबा दिला होता. तुम्ही काहीच काळजी करू नका. मी तुमच्या पाठिशी आहे, असे ते म्हणाले होते. त्यानंतर 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर त्यांनी दिल्लीत भाजपच्या नेत्यांसोबत 4 बैठका केल्या. या बैठकांत सर्वकाही ठरले होते. शरद पवारांची आमच्याबरोबर चर्चा सुरू होती. पण त्यांनी आम्हाला गाफील ठेवून आमचा ऐनवेळी घात केला, असे गिरीश महाजन म्हणाले.
वाचा खालील बातमी…
शरद पवारांनी मोठा डाव टाकला:NCP चा पुण्यातील पहिला उमेदवार ठरला, पवारांचा विद्यमान आमदार चेतन तुपे यांना जबर झटका
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार अंग झटकून कामाला लागलेत. आता त्यांनी अजित पवारांना शह देण्यासाठी पुण्यात मोठा डाव टाकला आहे. पवारांनी विधानसभा निवडणुकीची जय्यत तयारी सुरू केली असून, त्यांचा पुण्यातील पहिला उमेदवार ठरल्याचा दावा केला जात आहे.
पुण्यातील हडपसर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. शरद पवारांनी या ठिकाणी राष्ट्रवादीचे (शरद पवार) शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना विधानसभेची तयारी करण्याचे आदेश दिल्याची माहिती आहे. जगताप यांनी 2019 मध्ये या मतदार संघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण येथून राष्ट्रवादीने चेतन तुपे यांना संधी दिली. आता प्रशांत जगताप यांनी पवारांची साथ दिल्यामुळे त्यांना या मतदार संघातून तयारीला लागण्याचे आदेश देण्यात आलेत. वाचा संपूर्ण बातमी…