व्यर्थ चिंता नको रे : संकटक्षणाचं दुष्टचक्र


 प्रगत देशात साधारणपणे २-३ टक्के  प्रौढांना नि १-२ टक्के  मुलांना हे थैमान त्रास देतं.

Advertisement

|| डॉ. आशीष देशपांडे
अनेकांच्या बाबतीत संकट येऊन गेल्यावरही ‘संकटक्षण’ काही मनातून जात नाही. तो सतत आठवतो, त्रास देतो, मनावर आणि पर्यायानं शरीरावरही परिणाम करत राहातो. हे झुरणं म्हणजे ‘पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसॉर्डर’. आताचं करोनाचं संकट अनेक लोकांच्या मनात असा संकटक्षण ठेवून जाणार आहे. यातील एक गट करोनामुळे अनाथ झालेल्या, आप्तेष्टांचा मृत्यू वा घरातली नाजूक आर्थिक स्थिती जवळून पाहिलेल्या, शाळेपासून दूर राहून एकट्या पडलेल्या लहान मुलांचाही असेल. या सगळ्यांना सावरून पुन्हा चालायला शिकवावं लागेल.   

मो. भा. चव्हाण या कवीची एक कविता आठवतेय, ‘आठवून आठवे ना, मला माझे बालपण; कोण जाणे कसा होता, माझा आषाढ-श्रावण?’ साध्या-सोप्या शब्दांच्या सहज रचनेत, उतारवयात मागे वळून पाहाणारा हा कवी, आपल्या आयुष्यातल्या उण्यादुण्यांच्या तात्पुरत्या तारतम्याचा लेखाजोखा मांडताना म्हणतो, ‘तुला कळणार नाही, तुझा वेळ तुझा काळ; अरे आयुष्य म्हणजे, बिनकाट्याचे घड्याळ!’

Advertisement

करोना संक्रमणात तिसरी लाट येणार की नाही, हे कदाचित दिवाळीच्या अभ्यंगस्नानापर्यंत नक्की होईल. पण गेल्या पावणेदोन वर्षांत जे आपण सर्वांनी सोसलंय त्याची आठवण तर आपल्या मनात सदोदित कोरलेली राहाणारच ना? प्रत्यक्ष आजार आणि त्याचे शारीरिक परिणाम, आजाराची भीती, बंदिवास, उपजीविकेची झालेली कुतरओढ आणि शिक्षणाची घसरलेली गाडी, या सगळ्यांमुळेच ‘आयुष्याच्या चित्रकाराच्या’ मनात आपल्यासाठी काय वाढून ठेवलंय?, याची कमी-जास्त चिंता लागणं स्वाभाविकच आहे. आपल्यातले बरेच जण ‘दाताखाली जीभ माझी चावली मी अनेकदा; माझ्याकडून जिंदगी, दुखावली अनेकदा!’ म्हणून मोकळे होतील, नि करोनानंतरच्या अध्यायात मश्गुलही! पण बऱ्याच जणांच्या आयुष्यात गेलेले स्नेही, आप्तेष्ट, गमावलेल्या संधी, झालेलं नुकसान, परिस्थितीतला कोंडमारा घर करून बसणार आहे. भीती, उद्वेग, राग, वैफल्य, औदासीन्याची परिचित-अपरिचित घालमेल आपण सर्वच थोड्याफार प्रमाणात अनुभवतोय आणि पुढेही अनुभवणार आहोत.

लहानपणी वाचलेल्या रामायणाच्या कथांमध्ये मायावी मारिच राक्षसाची गोष्ट आठवतेय? आपल्या मायावी ताकदीच्या गर्वात नखशिखांत बुडालेला हा राक्षस! त्याच्या त्रासानं वैतागून विश्वामित्र राजा दशरथाकडे १३ वर्षांच्या रामाला आश्रमात पाठवण्याची विनंती करतात. विश्वामित्रांच्या आश्रमात धुडगूस घालणाऱ्या या मायावी मारिच आणि सुबाहू बंधूंना अवघ्या १३ वर्षांचा राम असा धडा शिकवतो की मारिच शंभर ‘युगं’ दूर जाऊन पडतो. बिचाऱ्या मारिचाला श्रीरामाची इतकी भीती बसते, की ‘जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी’ त्याला श्रीराम दिसायला लागतात. त्याला आपल्या मायावी ताकदीचा वापर करण्याचीही भीती वाटायला लागते. भयग्रस्त, निरिच्छ, दु:खी जीवन त्याला त्याच्या आप्तेष्टांपासून दूर दूर घेऊन जातं. पुढे जेव्हा कैकयीच्या हट्टाखातर श्रीरामांना वनवास घडतो नि सीताहरणासाठी रावण कट रचतो, तेव्हा हरतºहेनं मारिच रावणाला रामाशी वैर न धरण्याची विनंती करतो. पण रावणाहाती मरायचं, की श्रीरामाहाती?, अशा दुविधेत मारिच ‘सुवर्णहरीण’ बनायचं ठरवतो.

Advertisement

शाळेत असताना पुस्तकात शाहिस्तेखानाची ओळख झाली. औरंगजेबाच्या दरबारातल्या वाकबगार सेनापतीला आदिलशाही आणि मराठे यांच्या स्वप्नांना मुरड घालण्यासाठी दख्खनला पाठवण्यात येतं. अवाढव्य सैन्य घेऊन आलेला हा सेनानी पुणे-उत्तर कोकणापर्यंत मजल मारून पुण्यात ठाण मांडतो. पण गनिमी काव्यानं लग्नाच्या वरातीतून महालापर्यंत पोहोचून शिवाजी महाराज रातोरात शाहिस्तेखानाला पळता भुई थोडी करतात. ‘जीवावर बेतलं, बोटांवर निभावलं’, या भावनेनं खजील झालेला खान औरंगजेब नि स्वत:च्या नजरेतून उतरतोच, पण ‘दख्खन’पासून जितकं दूर जाता येईल तितकं दूर, बंगाल-बांग्लादेशात जाऊन बसतो. पण दख्खनमध्ये येतानाची अरेरावी, लूट, मदमस्तपणा बांग्लादेशात कुठेच दिसत नाही. सुराज्य, लोकहितकारी निर्णय, ईस्ट इंडिया कंपनीला विरोध, गरीबधार्जिणी व्यवस्था… सगळंच महाराजांसारखं! असं म्हणतात, महाराजांची खानसाहेबांनी अशी काही धास्ती घेतली होती, की त्यांनाही ‘जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी’ महाराजच दिसायचे.

कॉलेजात गेल्यावर होमरच्या ‘इलिआड’ काव्यावरचा एक निबंध वाचला. ग्रीक साहित्यात महाभारताच्या युद्धासारखं महत्त्व मिळालेल्या त्रोजानच्या युद्धानंतरचं हे ‘आरण्यक’! त्रोजान धर्मगुरूक्रायसिअस एखिअन्सना पाहिजे तेवढी धनदौलत देऊन आपली युद्धबंदी कन्या क्रायसिस हिला परत करण्याची विनंती करतात. राजा एगेमेम्नॉन तयार नसतो. क्रायसिअस एखिअन्सवर प्लेगच्या महासाथीचं  संकट घडवून आणतो. पराक्रमी योद्धा एखिल्स यावर तोडगा काढण्यासाठी बैठक बोलावतो. बैठकीत एगेमेम्नॉन क्रायसिसच्या बदल्यात एखिल्सची युद्धबंदी ‘ब्रायसिस’ मागून घेतो आणि कोणालाच त्यात काही वावगं वाटत नाही. एखिअन साम्राज्यावरील संकट टाळण्यासाठी केलेल्या या प्रयत्नात झालेल्या मानहानीनं एखिल्सचा जळफळाट होतो आणि तो एखिअन युद्धापासून फारकत घेऊन दूरदूर जातो. झालेल्या मानहानीची आठवण त्याला ‘जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी’ त्रस्त करते. मानहानी, वैफल्य, राग… एखिअन सैन्यावरचं प्लेगचं संकट टाळण्यासाठीच्या एखिल्सच्या प्रयत्नाला राजा एगेमेम्नॉननं दिलेलं अनावश्यक व्यक्तिगत वळण आणि बाकीच्यांनी दिलेला दुजोरा त्याला निराश करतो. महारथी एखिल्स झालेल्या अवहेलनेतून बाहेरच पडू शकत नाही. त्याच्या आईकरवी तो ग्रीक देवाधिदेव झिअसची मनधरणी करून एखिअन्सना युद्धासाठी प्रवृत्त करण्यास सांगतो, ज्यामुळे एखिअन्सना एखिल्सचं महत्त्व कळेल. नंतर झालेल्या युद्धात मानहानीनं बेभान झालेला एखिल्स अतोनात संहार करतो, नदीमध्ये प्रेतांचा खच पाडतो, मृत्यूच्या तांडवात मृतात्म्यांनाही ‘विधिवत निरोपाच्या’ युद्धनियमाची तमा बाळगत नाही. अपमानाच्या परिमार्जनाच्या आगीत त्याला काहीच चुकीचं वाटत नाही.

Advertisement

अचानक आलेली संकटं, उद्ध्वस्त झाल्याची भावना, विवशता, उद्वेग, जळफळाट, भीती, राग, अशा कित्येक भावना घेऊन येतात. ‘विचार-भावना-आठवण’ या मेंदूच्या त्रयींना असा काही महापूर येतो, की त्यांना काही धरबंदच राहात नाही. एरवी त्यांना वेसणात बांधून ठेवणारा ‘हायपोथॅलॅमो पिट्युटरी अ‍ॅक्सिस’ एड्रेनॅलिनच्या धक्क्यानं असा काही हादरतो की हूं-का-चूं करू शकत नाही. एड्रेनॅलिनला आंजारून गोंजारून शांत करणारा हा मनाचा ‘कर्ता पुरुष’ ‘नाकर्ता’ झाला, की भावना (एड्रेनॅलिनचं घर- लोकस सिर्युलिअस) आणि आठवण (भावनिक मेमरीचं घर- एमिग्डेला) यांचं साटलोटं होतं. एकमेकांना पूरक उन्मादनाट्य सुरू होतं आणि साहजिकच विचारी मेंदूला या नाट्याचीच ‘स्क्रिप्ट’ लिहायला लागते. परत परत येणारी संकटाची जीवघेणी आठवण, ती येऊ नये म्हणून प्रयत्नपूर्वक घेतलेला सगळ्यापासून ‘दूर दूर’ जाण्याचा निर्णय, हरल्याचं/ हरवल्याचं नैराश्य नि उद्वेग आणि भविष्याबद्दलचा बदलेला दृष्टिकोन! या दुष्टचक्रात मेंदू अडकून पडतो. संकटक्षणाचे विचार-आठवण जागेपणी नि स्वप्नातसुद्धा वारंवार येत राहाते. ‘कालाय तस्मै नम:’चा नियम विसरून त्रास देतच राहाते. मन या अनुभवासमोर ‘सपशेल’ शरणागती पत्करतं नि या आठवणी जाग्या होतील असे जे अनुभव, ज्या परिस्थिती आहेत (खऱ्या किंवा ‘मनगढंत’) त्यापासून दूर दूर जाण्याचा प्रयत्न करतं. नकारात्मकतेत कशावरच विश्वास ठेवावासा वाटत नाही. आणि ‘जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी’  ‘संकटक्षण’ दिसत राहातो. औदासीन्य, व्यसनाधीनता, बेचैनी, एकटेपणा, कमालीचा, सततचा उद्वेग या ‘संकटानंतरच्या ताणतणावांच्या थैमानाला’ बऱ्याच वेळी साथीला येतो. इंग्रजीत त्याला ‘पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसॉर्डर’ (पीटीएसडी) म्हणतात.

प्रगत देशात साधारणपणे २-३ टक्के  प्रौढांना नि १-२ टक्के  मुलांना हे थैमान त्रास देतं. गरिबी, नात्यांपासून ताटातूट, घरातला कोंडमारा, घरातल्या कोणाचा मृत्यू/ आजारपण ‘पीटीएसडी’ची शक्यता वाढवतात. वंचितांमध्ये हे प्रमाण १६ टक्क्यांपर्यंत वाढू शकतं. लहानग्यांमध्ये जरी प्रमाण कमी असलं, तरी त्याचे दुष्परिणाम १०-१२ वर्षांनंतरही त्यांच्यावर, त्यांच्या नात्यांवर किंवा कार्यक्षमतेवर दिसू शकतात. काही दिवसांत आपण या करोनानामक अग्निदिव्यातनं बाहेर पडू. पण आपल्यातल्या कित्येकांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल झालेले असतील. आपलं घर, काम, नाती, दिनचर्या, प्रवास, मनोरंजनाच्या पद्धती, सणसोहळे साजरे करायच्या पद्धती बदललेल्या असतील. त्यात लहानग्यांच्या शाळाही आल्याच. ही मुलं शाळेत आल्यावर त्यांच्या मनावर काय परिणाम झाले असतील या शाळेपासून घेतलेल्या फारकतीचे? फक्त शिक्षणच थांबलं असेल? काय पाहिलं असेल त्यांनी? किती कंटाळा आला असेल त्यांना सवंगड्यांना न भेटण्यानं? जवळच्यांना पाहिलं असेल त्यांनी मरताना, हरताना, घाबरताना? झाली असेल त्यांची परवड त्यांच्या स्वत:च्याच घरात?  या सगळ्यावर फुंकर घातल्याशिवाय होऊ शकेल ओनामा?

Advertisement

१९७० मध्ये ‘जंजीर’ चित्रपटानं सिनेसृष्टीला अमिताभ दिला. लपाछपीच्या खेळात कपाटात लपलेला विजय दरवाजाच्या फटीतून आपल्या आईवडिलांच्या मारेकऱ्याच्या हातातली पिस्तूल नि त्याच्या हातातलं पांढऱ्याशुभ्र घोड्याचं लॉकेट पाहतो. त्या अनाथाला एक इन्स्पेक्टर आपल्या घरी वाढवतो. अगदी जळी-स्थळी नाही, तरी रात्री-अपरात्री स्वप्नात तोच शुभ्र घोडा नि त्यावर एक अनोळखी घोडेस्वार दिसणारा विजय एकेकटा वाढतो. घरात, शाळेत, मैदानात सगळ्यांपासून दूर दूर राहातो. दत्तक घरातला जिव्हाळाच तो काय त्याला तारून नेतो आणि त्याला एक जबाबदार पोलीस बनवतो. मुलांना शाळेत आल्यावर तोच ‘जिव्हाळा’ लागणार आहे. अभ्यास, अभ्यासक्रम नि परीक्षा तर येतीलच त्यांच्या आयुष्यात. पण आताच मायेची फुंकर मारली नाही, तर त्याचा खरंच काही उपयोग राहाणार नाही.

‘सेंटर फॉर मेंटल हेल्थ अ‍ॅडव्होकसी, रीसर्च अँड ट्रीटमेंट’ आणि ‘टोपिवाल नॅशनल हॉस्पिटल’ यांच्या संयुक्त प्रयत्नांनी Reopening Schools & Sustaining Children in Universal Education by Enhancing Resilience (Project RESCUER) असा उपक्रम राबवला जाणार आहे. त्यात करोनापश्चात शाळेत आलेल्या तिसरी ते सहावीच्या मुलांना शाळेत व अभ्यासात हळुवार रुळवण्यासाठी मानसशास्त्रीय मार्गदर्शन दिलं जाणार आहे. शिक्षक, पालक, मानसशास्त्रज्ञ यांना ‘ट्रॉमा-ग्रीफ वर्क’बाबत मार्गदर्शन करून जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न या उपक्रमात होणार आहे.

Advertisement

‘जंजीर’मध्ये घाबरलेल्या विजयचा इमानदार पोलीस अधिकारी होण्यासाठी एका जबाबदार घराची गरज होती. आज महाराष्ट्रातच १५ हजारांच्या आसपास करोनामुळे एक किंवा दोन्ही पालक गेलेली मुलं आहेत. घरातलं कोणीतरी एक गेलेल्यांची संख्या त्यापेक्षाही जास्त असणार. ‘प्रोजेक्ट रेस्क्युअर’द्वारे आपण जरूर त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो. त्यांच्या आयुष्याच्या विस्कटलेल्या घडीला थोडंसं सारखं करू शकतो. मानसशास्त्राच्या फुंकरीनं!

अचानक आलेल्या या अरिष्टामुळे आत्मविश्वास डळमळून, पद्मा लोकूर यांच्या शब्दात, ‘झुरे पाखरू दिवाणे, नेला सखा पावसाने; वाट अंधारली माझी, डोळा पाणियाची लाट!’ असा घोर त्यांच्या मनाला लागू नये, त्यांनी आपल्यापासून दूर दूर जाऊ नये, नि त्यांना करोनाची इडा-पिडा करोनापश्चात सलू नये, म्हणून आपण त्यांचं तेवढं देणं नक्कीच लागतो!

Advertisement

‘देशाचा संसार माझे शिरावर, असे थोडे तरी वाटू द्या हो’, हे सेनापती बापटांचे शब्द आठवायची हीच तर वेळ आहे.

[email protected]

Advertisement

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

AdvertisementSource link

Advertisement