व्यर्थ चिंता नको रे: आरसा- मनातला!


लहानपणी या मनातल्या आरशाला बसलेले तडे जोडणं कठीण असतं. मोठेपणीचे तडे तात्पुरते असतात.

Advertisement

डॉ. आशीष  देशपांडे [email protected]

प्रत्येकाच्या मनात एक आरसा असतो. आपलं वागणंबोलणं, दिसणं, चारचौघांच्या तुलनेत चांगलं की वाईट, याचे काही ठोकताळे आपण लहानपणापासून येणाऱ्या अनुभवांवरून मनात बांधू लागतो. मनाच्या आरशात निरखून स्वत:ची किं मत करू लागतो. या आरशानं दाखवलेलं प्रतिबिंब विद्रूप वाटलं, तर प्रचंड अस्वस्थ होतो. त्याला ‘बॉडी डिस्मॉर्फिक डिसॉर्डर’ म्हणतात. ही प्रतिमा बदलण्याचा, ‘सुधारण्याचा’ किं वा ती कु णालाच न दाखवण्याचा, मार्गही आपला आपणच ठरवून टाकतो. पण हे सर्व टाळून मनाच्या आरशातली प्रतिमा पाहण्याची निकोप दृष्टी मिळवता येईल का?..   

Advertisement

काही महिन्यांपूर्वी टीव्हीवर ‘द किंग्स स्पीच’ हा ऑस्करविजेता चित्रपट पाहिला होता.  राजा पंचम जॉर्जच्या मृत्यूनंतर त्याचा ज्येष्ठ पुत्र आठवा एडवर्ड सिंहासनावर बसला, पण त्यास राजघराण्याच्या रीतिरिवाजांशी जुळवून घ्यायचं नव्हतं. दोनदा घटस्फोट झालेल्या स्त्रीशी लग्न करण्याचा त्याचा निर्णय चर्चला पचणार नव्हता. सध्याच्या इंग्लंडच्या राणीचे वडील- म्हणजे पंचम जॉर्जचा लहान मुलगा अल्बर्ट तोतरा होता. हिटलरच्या वक्तृत्वाला जबाब देण्यासाठी इंग्लंडला तोतरा राजा कसा चालणार? हा प्रश्न सगळ्यांनाच भेडसावत होता, नि एडवर्ड काही आपला अट्टहास सोडायला तयार नव्हता. राजपुत्र अल्बर्टच्या पत्नीनं त्याच्या तोतरेपणावर इलाज करण्यासाठी लायोनेल या समुपदेशकाला पाचारण केलं. साधा समुपदेशक आणि राजपुत्र अल्बर्ट यांच्या संवादातून उमलत जाणारं दोघांचं नातं आणि त्यातून राजपुत्राला ‘राजा जॉर्ज’ बनण्यासाठी गवसलेला आत्मविश्वास, याचं अलगद उलगडणारं कथानक या चित्रपटात आहे.

नाझींविरुद्ध युद्धघोषणेच्या भाषणानं सहावा राजा जॉर्ज आपल्या मनातल्या शंकाकुशंका बाजूला सारून त्यांवर कसा मात करतो? जगातल्या महायुद्धाच्या आधी हे मनातलं ‘महायुद्ध’ अतिशय समर्थपणे दाखवलंय या चित्रपटात! लायोनेलच्या पहिल्याच भेटीत केवळ बायकोच्या आग्रहाखातर तिथे उपस्थित राहिलेल्या, धुसफुसणाऱ्या राजपुत्राकडून पैज लावून ‘टू बी ऑर नॉट टू बी’ हा ‘डायलॉग’ न अडखळता बोलवून घेताना लायोनेल एक युक्ती करतो. कानाशी हेडफोनवर मोझार्टचं संगीत लावून राजपुत्राला हॅम्लेट वाचायला सांगतो, नि त्याचं वाचन रेकॉर्ड करतो. बोलताना आपण अडखळतो आहोत का, याकडेच कान देऊन ऐकायची सवय झालेला राजपुत्र लायोनेलच्या अनाकलनीय प्रयत्नांनी वैतागून तिरीमिरीत संवाद वाचून दाखवतो, नि त्यास जाणीव होते त्याच्या तोतरेपणाच्या कारणाची!      

Advertisement

आपण सगळेच वावरताना स्वत:चं हसं होणार नाही, आपल्याकडून चुका होणार नाहीत, याची काळजी घेत असतो. काही लोक बिनधास्त असतात, तर काही लोक अति काळजी करतात. खरं तर लहानग्यांना कधीच बोलण्याची, चुका करण्याची भीती नसते. पण ती भीती आजूबाजूची माणसं तयार करतात. वागण्याचे, बोलण्याचे, पेहरावाचे, चांगल्या-वाईटाचे नियम करून. कुटुंबातल्या लोकांचा याबद्दलचा अट्टहास नि कोवळ्या मनांनी त्याला दिलेलं महत्त्व आत्मविश्वासाला धक्का देतं, नि मग मुलं स्वत:च्या वागण्याकडे फारच कटाक्षानं बघायला लागतात. वागण्यातला स्वाभाविकपणाच हरवून जातो, नि आपलंच वागणं सदोदित भिंगातून बघायला सुरुवात होते. नसलेल्या चुका दिसायला लागतात, मोठय़ा बनतात नि इतरांच्या समोर नाक कापलं जाण्याची भीती सतत वाटत राहते. ‘नसती भानगड नको’ असा विचार करून लोकांसमोर जाण्याच्या संधीच नकोशा होतात. हसं होण्याच्या भीतीनं संपूर्ण आयुष्य एक कारावास बनतं. अशी ‘स्वीकारलं जाण्याची चिंता’ (सोशल एंग्झाईटी डिसॉर्डर) अनेकांना असते. रंग-भाषा-आहार-पेहराव-धर्म-जात-उच्चार-राहणीमान-व्यंग-बुद्धिमत्ता-संवादकुशलता अशा विविध मानवनिर्मित वैषम्यांमधून या चिंता फोफावतात. शंभरातल्या  ७ ते १२ जणांना हा आजार असू शकतो किंवा होऊ शकतो नि ज्यांना तो होतो, ते आपल्याच वागण्याच्या विच्छेदनात इतके ‘त्रस्तमग्न’ होतात, की ते स्वत:च्या आयुष्यालाच पारखे होतात.

जी तऱ्हा वागण्याची, तीच दिसण्याचीसुद्धा! मायकल जॅक्सनसारखा तालनृत्याचा अनभिषिक्त सम्राट संगीतप्रेमींच्या मनावर राज्य करत होता, पण त्याचं स्वत:चं मन त्याला ‘स्वीकारत’ नव्हतं. बऱ्याच प्लॅस्टिक सर्जरी करून, मलमं-औषधं करूनसुद्धा हवं तसं नाक,चेहरामोहरा किंवा कांतीचा रंग मिळवण्याच्या वेडात तो मरण पावला,असं म्हणतात. ‘ट्रायल’, ‘मेटामॉफरेसिस’सारख्या जगाला वेड लावणाऱ्या कथा लिहिणारे फ्रांझ काफ्का स्वत:ची शरीरयष्टी व दिसण्याबद्दल इतके नाखूश असायचे, की काहीही घातलं तरी आपण विचित्रच दिसणार या खात्रीनं आरशालाच घाबरायचे. आपण आहोत त्यापेक्षा तरुण दिसायचा प्रयत्न करणं, स्वत:ला नेटकं ठेवणं अजिबात चुकीचं नाही. पण त्यासाठी आकाशपाताळ एक करणं गैरच. चेहरा उजळ करण्याची क्रीम्स, लोशन्स, लेप, केस वाढवण्याची नि वय कमी करण्याची औषधं-नुस्खेमनातल्या ‘नसलेल्या स्वीकृतीचं’ व्यापारीकरणच आहे. पण जेव्हा ही शरीराच्या स्वीकाराची चिंता मनाला घेरून टाकते, उठता-बसता असलेल्या किंवा नसलेल्या वेगळेपणाचा ध्यास लावते, नि जिणं हराम करते, तेव्हा ती नक्कीच घातक ठरते. त्याला ‘बॉडी डिस्मॉर्फिक डिसॉर्डर’ असं म्हणतात.

Advertisement

आपल्या घरात जसा आरसा असतो ना, तसाच आरसा आपल्या मनातही असतो. वयाच्या पाचव्या वर्षांच्या आसपास बनू घातलेला हा आरसा साधारणपणे नवव्या वर्षांपर्यंत तयार होतो. वाढत्या वयात त्यात माणूस स्वत:ची नि स्वत:च्या वागण्याची छबी पाहात असतो नि ती मनात चांगली-वाईट ठरवत असतो. साहजिकच ती चांगली-वाईट ठरवण्याचे संदर्भ परिसरातूनच त्याला मिळतात. मुलींच्या वागण्या-दिसण्यावर जास्त काटेकोर नियमांची नामुष्की असल्यानं स्वत:ला स्वीकारायची घालमेल त्यांना अधिक सहन करायला लागते. जर या मनातल्या आरशाला घरच्याच आहेराने तडा दिला, तर मनातली छबीच बिघडते. मनाच्या आरशातली बिघडलेली छबी बदलण्याचा प्रयत्न ती व्यक्ती बाहेरच्या खराखुऱ्या आरशातील आपली छबी बदलून/ स्वत:च्या मते सुधारून करू पाहते. बाहेरच्या ‘शल्य’क्रियेनं मनातलं शल्य कसं दुरुस्त होणार?

 हिंदी चित्रपटातील एक गाणं आहे- लता मंगेशकरांचा स्वर्गीय आवाज, पंडित नरेंद्र शर्माचे लाघवी शब्द, आणि लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांचं सुश्राव्य संगीत. ‘यशोमती मैय्या से बोले नंदलाला, राधा क्यूँ गोरी?, मैं क्यूँ काला?’ लहानग्यांच्या मनातल्या आरशाला तडा जाऊ नये यासाठी काय करायला लागतं, याचं यापेक्षा चांगलं उदाहरण अजून कुठे मिळणार नाही. वागणं असो की दिसणं असो, त्यांच्या स्वीकाराविषयीच्या चिंतेला जसा घरचा ‘आहेर’ कारणीभूत असतो, तशीच अजून एक महत्त्वाची गोष्ट कारणीभूत असू शकते. स्वत:ची चांगली-वाईट छबी तयार करण्यासाठी वागण्या-दिसण्याबरोबर ‘कौशल्याची’ जाणीव आवश्यक असते. कला, खेळ, अभ्यास, स्वास्थ्य, समज, नेतृत्वगुण, मैत्री, यांपैकी कुठल्याच कौशल्याच्या अभावी वागण्या-दिसण्याला अवाजवी महत्त्व मिळतं आणि त्यात ‘शल्य’ आलं की सुरुवात होते आजाराला. लहानपणी या मनातल्या आरशाला बसलेले तडे जोडणं कठीण असतं. मोठेपणीचे तडे तात्पुरते असतात.

Advertisement

आपल्या वागण्याबद्दलची किंवा दिसण्याबद्दलची चिंता किंवा एकूणच कुठलीही चिंता दूर करण्याच्या दोन पद्धती आहेत. एक म्हणजे ‘साप समजून भुई बडवायला लागल्यानंतर’ थांबून समजून घ्यायचं, की तिथे साप नाही, नि भुई बडवून काही हशीलही होणार नाही. म्हणजेच बेभान विचारांच्या बुलेट ट्रेनला थांबवायचं, विचारांची शहानिशा करून घ्यायची, हवं तर त्यात योग्य ते बदल घडवायचे आणि मग तिला ‘पॅसेंजर ट्रेन’सारखं सोडायचं! ज्यामुळे चुकीचा ‘निष्कर्षप्रलय’ टाळता येईल. दुसरी पद्धत म्हणजे वर दिलेल्या गोष्टीत लायोनेलनं राजपुत्रासाठी वापरलेली डिस्ट्रॅक्शन’ची (म्हणजे विचार दुसरीकडे वळवण्याची) पद्धत. साधारणपणे या पद्धतीला हवं तितकं महत्त्व आपण देत नाही. लहानपणी मूल पडल्यानंतर रडत असताना त्याला कडेवर घेऊन ‘तो काऊ बघ काऊ!’ म्हणून त्याचं दुखणं-खुपणं विसरायला न लावणारं घर शोधूनही सापडणार नाही! पण मोठं झाल्यावर असाच प्रयत्न आपल्याला थिल्लरपणाचा वाटेल. आपल्या कामातून घेतलेल्या सुटय़ा, कुटुंबाबरोबर केलेले प्रवास नि त्यांच्या आठवणी, छंद-कला-खेळ-मित्रांच्या गप्पा नि ‘त्यात गेलेला नि न कळलेला’ झकास वेळ, किंवा अगदी कामात केलेला बदलसुद्धा चिंता/ बेचैनी कमी करायला मदत करतो.

एडवर्ड द बोनो एक प्रथितयश ‘विचारशास्त्रज्ञ’आहे. त्याच्या ‘लॅटरल थिंकिंग’ या पुस्तकात तो असाच एक किस्सा सांगतो. शिकागो शहरात जगातलं पहिलंवहिलं शंभराहून अधिक मजल्यांचं ‘वर्ल्ड ट्रेड सेंटर’ बांधलं, तेव्हा बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या वरिष्ठांनी साहजिकच सर्वात वरचे मजले त्यांच्या ऑफिससाठी खरेदी केले. पण सकाळच्या घाईगर्दीच्या वेळेत उपलब्ध लिफ्ट्सनी त्यांच्या मजल्यावर पोहोचायला फारच वेळ लागायला लागला. त्यांनी लिफ्टचा वेग वाढवण्याचा सल्ला दिला. तंत्रज्ञांनी वेग जास्तीत जास्त करूनसुध्दा काहीच फायदा झाला नाही. इमारतीच्या बाहेरून किंवा आतून नवीन लिफ्टचा कॉलम तयार करण्याचाही विचार झाला, पण त्याला महानगरपालिकेनं आणि अभियंत्यांनी परवानगी नाकारली. ‘आमच्याच ऑफिसात पोहोचायला एवढा वेळ लागणार असेल, तर हे ऑफिसच आम्हाला नको’ असा सूर उमटायला लागले. तेव्हा या बोनो महाशयांना पाचारण केलं गेलं. त्यांनी लिफ्टमध्ये आरसे लावून बहुराष्ट्रीय कंपनींच्या अतिरथी-महारथींना लिफ्टमधून जाताना व्यर्थ जाणाऱ्या वेळापासून ‘डिस्ट्रॅक्ट’ केलं आणि हा लिफ्टच्या वेगाचा प्रश्न सोडवला. तेव्हापासून लिफ्टमध्ये जिकडेतिकडे आरसे लावायची प्रथा सुरू झाली.

Advertisement

विचारांना रोखणं आणि मनाला दुसरीकडे वळवणं, या दोन्ही पध्दतींचा वापर आणि औषधांची साथ वागण्या-दिसण्यातल्या ‘स्वीकारलं जाण्याबद्दलची चिंता’ कमी करू शकते. पण त्याची सुरुवात मात्र लहानपणीच झाली तर उत्तम. म्हणूनच शाळेतल्या मुलांच्या वयानुसार पुढच्या आयुष्यात त्यांना अडचणी कमी याव्यात म्हणून प्रतिबंधात्मक समुपदेशनाला अनन्यसाधारण महत्त्व आलं आहे. पोलिओ झाल्यावर इलाज करण्याऐवजी, होऊ नये असाच प्रयत्न केल्यानं आज भारतातून त्याचं समूळ उच्चाटन झालं आहे. व्यर्थ चिंतेचे आजारही होऊच नयेत यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे, खास करून शाळांमधून, कारण त्यामुळे लहानग्यांच्या मनातल्या आरशाला गेलेला तडा तेव्हाच जोडला जाईल नि नंतर उगाच त्रास देत राहणार नाही.

मागील लेखात नमूद के लेल्या Project RESCUER (REopening schools & Sustaining Children in Universal Education by Enhancing Resilience) या प्रकल्पाबद्दल माहिती विचारण्यासाठी आलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद!

Advertisement

कबीर दासांच्या शब्दांत सांगायचं झालं तर,

चलती चक्की देख के, दिया कबीरा रोये।

Advertisement

दो पाटन के बीच में, साबुत बचा न कोए।

जिन खोजा तिन पाइया, गहरे पानी पैठ।

Advertisement

मैं बपुरा बूडन डरा, रहा किनारे बैठ।

अर्थात, या विश्वरुपी चक्कीच्या घरघरीत जन्ममृत्यूच्या पाटय़ापासून कोणाचाच बचाव नाही. पण आयुष्याच्या अथांग सागरात अर्थ शोधण्यासाठी जे जे उडी मारतात, प्रयत्न करतात, त्यांना काही ना काही जरूर मिळतं. बुडायच्या भितीनं जे उडीच मारत नाहीत, ते फक्त किनाऱ्यावर बसूनच राहतात; काहीही न मिळवता. काहीही न मिळवताच पाटय़ाखाली भरडल्या जाण्याबद्दल कबीरांना वाईट वाटतं. Project RESCUER द्वारे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून आपल्यालाही काहीतरी मिळेल, अशी मला नि माझ्या सहकाऱ्यांना खात्री वाटते.

Advertisement

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.Source link

Advertisement