पुणे14 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
नाशिक पदवीधर मतदारसंघात काहीतरी वेगळेच शिजत आहे, असे मी अगोदरच बाळासाहेब थोरात यांना सांगितले होते. मात्र त्यांनी माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. असा दावा आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे.
नाशिक शिक्षक पदवीधर निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरायच्या शेवटच्या दिवशी नवा ट्विस्ट निर्माण झाला. काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर केलेली असताना त्यांच्या जागी त्यांचे पुत्र सत्यजीत तांबे यांनी अचानक शेवटच्या क्षणी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला. सत्यजित तांबे हे काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे आहेत.
थोरातांच्या अडचणी वाढणार
काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे यांना नाशिक शिक्षक पदवीधर निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली. हा अर्ज भरण्यासाठी डॉ. सुधीर तांबे नाशिकमध्ये पोहचले. मात्र, ऐनवेळी त्यांचे सुपुत्र सत्यजीत तांबे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला. त्यामुळे नाना चर्चेला उधाण आले आहे. नाना पटोलेंनी काँग्रेस असल्या गोष्टींचे समर्थन करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात सत्यजीत तांबेंचे मामा असल्याने त्यांच्या या बंडखोरीने तेच अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
काय म्हणाले अजित पवार?
अजित पवार यांनी देखील बाळासाहेब थोरात यांच्यावर निशाणा साधला आहे. अजित पवार म्हणाले, दोन दिवसांपासून कानावर वेगळे येत होते. त्यामुळे मी स्वत: बाळासाहेब थोरात यांच्याशी बोललो. मी बाळासाहेब थोरात यांना आदल्या दिवशी पूर्णपणे सांगितले होते की, काहीतरी वेगळे शिजत आहे, माझ्या कानावर आले आहे. तुम्ही काळजी घ्या. मात्र बाळासाहेब थोरात यांनी तुम्ही अजिबात काळजी करू नका. आम्ही आमच्या पक्षाची जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडू. उद्या डॉ. सुधीर तांबे यांचाच अर्ज दाखल होईल, असे मला सांगितले होते. अशी माहिती अजित पवार यांनी दिली.
आता जरा काम बिघडले
अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका केली आहे. अजित पवार म्हणाले, आमच्याकडे होते तेव्हा चांगले होते. आता जरा काम बिघडले. हे महाविकास आघाडी सरकार असताना चाकणमध्ये वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प येणार होता. दोन लाख कोटींची गुंतवणूक होणार होती. आम्हाला सभागृहात मुख्यमंत्री झाल्यावर एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पाचा उल्लेख केला होता. पण हा प्रकल्प गुजरातला गेल्यावर ते काही बोलायला तयार नाही.