पुणे7 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
शहीद जवान दिलीप बाळासाहेब ओझरकर यांच्या पार्थिवावर आज पुणे कॅन्टोन्मेंट स्मशानभूमी (धोबीघाट) येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी भारतीय सैन्य दलाच्या जवानांच्या तुकडीने हवेत बंदुकीच्या फैरी झाडून तसेच अंतिम बिगुल वाजवून शहीद जवानास मानवंदना दिली.
यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी शहीद जवान दिलीप ओझरकर यांना पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली. शहीद दिलीप ओझरकर यांचे वडील बाळासाहेब ओझरकर आणि लहान मुलगा यांनी पार्थिवाला मुखअग्नी देऊन अंत्यसंस्कार केले.
यावेळी आमदार रविंद्र धंगेकर, सुनिल कांबळे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, सैनिक कल्याण विभागाचे संचालक ब्रिगेडिअर राजेश गायकवाड (नि.), उपसंचालक लेफ्टनंट कर्नल आर. आर. जाधव (नि.), जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल एस. डी. हंगे(नि.), लष्कराचे विविध आजी, माजी अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.कारगिल येथे देशसेवा बजावत असताना ३ सप्टेंबर रोजी दिलीप ओझरकर शहीद झाले.
पसार आरोपी गजाआड
बलात्काराच्या गुन्हा दाखल झाल्यानंतर हडपसरमधील मगरपट्टा पोलीस चौकीतून पसार झालेल्या आरोपीला आळंदी परिसरातून अटक करण्यात आली. प्रीतम चंदुलाल ओसवाल (वय 32, रा. उरुळी देवाची, ता. हवेली)असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध हडपसर पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल आहे.
ओसवाल याला याप्रकरणी पोलिसांनी 31 ऑगस्ट रोजी अटक केली होती .तपासासाठी त्याला पोलिस कोठडीत ठेवण्यात आले होते. पोलिसांनी त्याला चौकशीसाठी सोमवारी (4 सप्टेंबर) सायंकाळी मगरपट्टा पोलिस चौकीत नेले होते. पाेलिस कर्मचाऱ्यांना धक्का देऊन ओसवाल पसार झाला. त्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. ओसवाल आळंदी परिसरात असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. पोलिसांच्या पथकाने त्याला आळंदीतून अटक केली.