अमरावती39 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
येथील प्रवीण खोडके मेमोरियल ट्रस्ट व शोध प्रतिष्ठानच्यावतीने आगामी २७, २८, व २९ जानेवारी रोजी आयोजित सांस्कृतिक महोत्सव पुढे ढकलण्यात आला आहे. विधान परिषदेच्या अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता आड आल्याने आयोजकांना हा निर्णय घ्यावा लागला.
आगामी ३० जानेवारी रोजी ही निवडणूक होत आहे. त्यासाठीची आचारसंहिता २ जानेवारीपासून लागू झाली असून ती ४ फेब्रुवारीपर्यंत सुरु राहणार आहे. या आचार संहितेमुळे स्वर शोध व समूह नृत्यस्पर्धेच्या ऑडीशनही रद्द करण्यात आल्या असून तशी सूचना सहभागी स्पर्धक व कलावंतांपर्यंत पोचविण्यात आली आहे. दरवर्षी होणारा हा महोत्सव कोरोनाच्या सावटामुळे गेल्या दोन वर्षात घेण्यात आला नव्हता. त्यामुळे यावर्षी अत्यंत धुमधडाक्यात आयोजनाची आखणी करण्यात आली होती. परंतु विधान परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता सुरु असल्याने सर्व जण निराश झाले आहेत.
सदर सांस्कृतिक महोत्सवांतर्गत राज्यस्तरीय स्वर शोध हिंदी-मराठी खुली सिने गीत स्पर्धा व राज्यस्तरीय समुह नृत्य स्पर्धाही घेण्यात येणार होती. त्यासाठीचे ऑडीशन आरसीएन डिजिटल कार्यालयात घेण्यात येणार होती. परंतु ती रद्द करण्यात आली असून आज, रविवार, १५ जानेवारी रोजी येथील मातोश्री विमलाबाई देशमुख सभागृहात होणारी निवड फेरीही (ऑडिशन) रद्द करण्यात आली.
आयोजकांनी या सर्व स्पर्धांची तयारी केली होती. त्यासाठीच्या वेगवेगळ्या प्रवेशिकासुद्धा छापून घेतल्या होत्या. मात्र पदवीधर निवडणुकीच्या आदर्श आचार संहितेचे पालन करायचे असल्याने ही संपूर्ण तयारी रद्द करण्यात आल्याचे आयोजकांनी कळविले आहे. दरम्यान नव्या तारखांबद्दल सर्व संबंधितांना कळविले जाईल, असेही त्यांचे म्हणणे आहे.