हिंगाेली3 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
- कळमनुरी आणि छत्रपती संभाजीनगरचे विद्यार्थी एकमेकांमध्ये भिडले
लातूर येथील स्वामी विवेकानंद नामांकित इंग्रजी शाळेत कळमनुरी व छत्रपती संभाजीनगरच्या विद्यार्थ्यांमध्ये वाद झाल्याने हाणामारीची घटना घडली. यात कळमनुरीचे दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. या प्रकरणाच्या चौकशीसाठी आता कळमनुरीचे पथक सोमवारी (६ मार्च) लातूर येथे रवाना होणार आहे. याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी आदिवासी प्रकल्प कार्यालय अंतर्गत सुमारे ३२५ विद्यार्थी लातूर येथील स्वामी विवेकानंद नामांकित इंग्रजी शाळेत शिक्षणासाठी दाखल करण्यात आले आहेत. याच शाळेमध्ये छत्रपती संभाजीनगर येथील विद्यार्थीदेखील आहेत. इयत्ता दुसरी ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी या ठिकाणी शिक्षणासाठी ठेवण्यात आले आहेत. दरम्यान, मागील दोन दिवसांपासून कळमनुरी व छत्रपती संभाजीनगर येथील विद्यार्थ्यांमध्ये वाद सुरू हाेता. किरकोळ कारणावरून सुरू असलेल्या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. शनिवारी रात्री झालेल्या या हाणामारीत कळमनुरी प्रकल्पाचे दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी लातूर येथील रुग्णालयात हलविण्यात आल्याचे कळमनुरीचे आदिवासी प्रकल्प अधिकारी छंदक लोखंडे यांनी सांगितले. दरम्यान, या घटनेच्या चौकशीसाठी कळमनुरी प्रकल्प कार्यालयाच्या अधिकाऱ्यांची एक पथक सोमवारी तारीख सहा चौकशीसाठी लातूर येथे पाठविले जाणार आहे. या चौकशीनंतरच पुढील प्रक्रिया केली जाणार असल्याचे लोखंडे यांनी सांगितले.