अमरावती2 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात ८० कोटी २८ लाख रुपयांची तूट आहे. कुलसचिव डॉ. तुषार देशमुख यांनी आज, बुधवारी पार पडलेल्या सिनेट बैठकीत हा अर्थसंकल्प सादर केला. त्यात काही सुधारणा सूचवत तो सिनेट सदस्यांनी मान्य केला. कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारपासून सुरु झालेल्या सिनेटच्या पहिल्या बैठकीचे उर्वरित कामकाज आज, बुधवारी पूर्ण करण्यात आले. प्र-कुलगुरु डॉ. प्रसाद वाडेगावकर यावेळी उपस्थित होते. कुलसचिवांनी केलेल्या मांडणीनुसार पुढील वर्षी विद्यापीठाच्या तिजोरीत १७८ कोटी ३२ लाख रुपये प्राप्त होणार असून खर्च २५८ कोटी ६० लाख रुपये केले जाणार आहेत. त्यामुळे आगामी वित्तीय वर्षात ८० कोटी २८ लाख रुपयांची तूट दर्शवण्यात आली आहे. वेतन व भत्त्यांसाठी शासनाकडून प्राप्त होणारा निधी, परीक्षा शुल्क, महाविद्यालयांचे संलग्नीकरण शुल्क, विद्यापीठात सुरु असलेल्या विविध शैक्षणिक विभागातील विद्यार्थ्यांकडून प्राप्त होणारे शुल्क आणि इतर प्राप्ती हे विद्यापीठाच्या एकूण उत्पन्नाचे पाच स्रोत आहेत. याउलट वेतन व भत्ते, परीक्षा विभाग, ग्रंथालय, शैक्षणिक विभाग, क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग, वेगवेगळे प्रकल्प आणि विकासात्मक इतर कार्यावर होणारा खर्च ह्या खर्चाच्या बाजू आहेत. अशा या आव्हानात्मक स्थितीत ‘कोणत्याही यशापर्यंत पोहचण्यास जर मार्ग असेल तर मी तो शोधेन, जर कोणताही मार्ग नसेल तर तो मी बनवेन’, या प्रतिबद्धतेसह कुलसचिवांनी तो सभागृहासमोर ठेवला. त्यानंतर वरिष्ठ सदस्य प्रा. डॉ. प्रवीण रघुवंशी, प्राचार्य डॉ. सुभाष गवई, प्रा. सुभाष गावंडे, प्रा. प्रशांत विघे, प्राचार्य निलेश गावंडे, प्राचार्य राधेश्याम सिकची, प्रा. कैलास चव्हाण, डॉ. संतोष बनसोड, सीए उज्वल बजाज, श्यामकांत मुंजे, प्रताप अभ्यंकर, गजानन कासावार, संकेत सावजी, डॉ. अर्चना बारब्दे, डॉ. अविनाश असनारे, डॉ. एस. एस. पाटील, डॉ. मोहन खेरडे, डॉ. नितीन कोळी, डॉ. मोनली तोटे आदी सदस्यांनी त्यामध्ये वेगवेगळ्या सुधारणा सुचविल्या. या सर्व सुधारणा करण्यात येईल, असे पीठासीन सभापती कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी स्पष्ट केले. त्यानंतर सभागृहाने त्या अर्थसंकल्पाला हात उंचावून आवाजी मतदानाने मंजुरी दिली