मुंबईएका तासापूर्वी
- कॉपी लिंक
सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर शुक्रवारी भंडारा उधळण्याची घटना घडली. धनगर आरक्षण कृती समितीच्या शेखर बंगाळे नामक तरुणाने हे कृत्य केले. बंगाळे हा सोलापूर विद्यापीठाच्या विद्यार्थी चळवळीतून पुढे आला आहे. त्याने आतापर्यंत अनेक आंदोलनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे प्रश्न तडीस नेण्याचा प्रयत्न केला आहे.
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील सध्या सोलापूर दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी सकाळी शासकीय विश्रामगृहावर कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत असताना धनगर समाज कृती समितीचे अध्यक्ष शेखर बंगाळे यांनी त्यांच्या अंगावर भंडारा उधळला. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
कोण आहेत शेखर बंगाळे?
शेखर बंगाळे सोलापूर विद्यापीठाच्या विद्यार्थी चळवळीमधून समोर आलेत. धनगर समाजाच्या नेत्यांनी सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याची मागणी केली होती. त्यावेळी शेखर बंगाळे सर्वप्रथम प्रकाशझोतात आले होते.
सोलापूर विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केल्यानंतर शेखर बंगाळे यांनी विविध मार्गांनी आपले आंदोलन सुरू ठेवले. त्यांच्यावर सोलापुरातील विविध पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत. त्यांनी सोलापुरातील अवैध धंदे बंद करण्यासंबंधीचे एक निवेदन शाळेच्या काळ्या पाटीवर लिहून जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते.
तावडेंवरही उधळला होता भंडारा
उल्लेखनीय बाब म्हणजे शेखर बंगाळे यांनी एखाद्या राजकारण्यावर भंडारा उधळण्याची ही काही पहिलीच वेळी नाही. त्यांनी यापूर्वी तत्कालीन शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्यावर सोलापूर शहरातील हुतात्मा स्मृती मंदिरात भंडारा उधळला होता. त्यावेळीही शेखर बंगाळे यांच्या आंदोलनाची चर्चा रंगली होती.
वाचा यासंबंधीची बातमी…
आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक:राधाकृष्ण विखे यांच्या अंगावरच उधळला भंडारा; कारवाई न करण्याचे विखे यांचे निर्देश
राज्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलन तीव्र होत असतानाच धनगर आरक्षणासाठी धनगर समाज देखील आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. या संदर्भात सोलापूर दोऱ्यावर असलेले मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याची चर्चा करण्यासाठी गेलेल्या आंदोलकांनी थेट त्यांच्या अंगावरच भंडारा उधाळला आहे. एकंदरीत आरक्षणाच्या मागणीवर धनगर समाज चांगलाच आक्रमक झाला आहे.
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे आज सोलापूर दौऱ्यावर आले होते. या दरम्यान धनगर समाजाच्या आंदोलकांनी त्यांची वेळ मागत त्यांना भेटण्याची विनंती केली. पोलिसांच्या मार्फतच राधाकृष्ण विखे पाटील यांनी या आंदोलकांना भेटण्याची तयारी दाखवली. आंदोलक आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात चर्चा सुरू असतानाच एका आंदोलकाने विखे पाटील यांच्या अंगावर भंडारा उधळला. त्यामुळे जवळील सुरक्षा रक्षकांनी त्या आंदोलकाला चांगलेच बदडले. वाचा संपूर्ण बातमी…