रवींद्र लाखोडे । अमरावती40 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
पाऊस विक्रमी झाल्याने यावर्षी बहुतेक धरणे तुडूंब भरली. त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्गही विक्रमी झाला. जिल्ह्यातील एकमेव मोठे धरण असलेल्या अप्पर वर्धा धरणातून आजपर्यंत तब्बल 4100 दशलक्ष घनमीटर (दलघमी) पाणी सोडावे लागले. या धरणाची क्षमता 564 दलघमीची आहे. अर्थात त्या क्षमतेच्या अंदाजे आठ पट पाणी वाया गेले असून एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी सोडावे लागण्याची गेल्या 15 वर्षांतील ही पहिलीच घटना आहे.
जिल्ह्यात अप्पर वर्धा हा मोठा प्रकल्प असून शहानूर, चंद्रभागा, पूर्णा, सपन हे मध्यम प्रकल्प आहेत. तर निम्न पेढी (भातकुली), बोर्डीनाला (अचलपूर), गर्गा (धारणी) आणि पंढरी (वरुड) हे चार मध्यम प्रकल्प निर्माणाधीन अवस्थेत आहेत. आजच्या (गुरुवार) आकडेवारीनुसार अप्पर वर्धाचा जलसंचय 97.23 टक्के असून इतर धरणांचा जलसंचय सरासरी 97.48 टक्के आहे. दरम्यान निर्माणाधीन चार धरणे पूर्ण झाली असती तर कदाचित वेगवेगळ्या धरणांमधून जे पाणी सोडावे लागले, त्या पाण्यापैकी काही पाणी त्या धरणांमध्ये साठविता आले असते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे या धरणांच्या पूर्णत्वाचा मुद्दा पुन्हा एकदा पुढे आला आहे.
यावर्षीचा उन्हाळा कडक होता. त्याचवेळी पावसाळाही जोरदार असेल अन् मान्सून वेळेत येईल, असा अंदाज हवामान खात्याने मागेच वर्तविला होता. तो तंतोतंत खरा ठरला. त्यानुसार सुरवातीच्या काळात दडी मारून बसलेला पाऊस नंतर एवढा खुलला की त्याला आवर घालणे अशक्य झाले. परिणामी नदी-नाले तुडूंब भरले. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. पुढे शेतजमीन खरडून जाण्यासोबतच शेतीपिकेही बऱ्यापैकी नष्ट झाली. जिल्ह्यात 3 लाख 8 हजार 292.74 हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून 2 लाख 91 हजार 919 शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला. त्यासाठी शासनाने 533 कोटी 14 लाख 65 हजार 314 रुपयांची मदत जाहीर केली.
‘शिल्टींग रेट’ वाढणे हेही एक कारण
धरणातील पाण्याचा विसर्ग वाढण्यासाठी ‘शिल्टींग रेट’ (गाळ साचण्याची क्रिया) वाढणे हेही एक कारण आहे. मुळात पाऊस अधिक झाल्यास धरणाशी जोडलेल्या नद्यांच्या पुरासोबत धरणाच्या दिशेने गाळही वाहून येतो. हा गाळ ठिकठिकाणी अडविण्यासाठी वेगळी ‘ट्रीटमेंट’ करावी लागते. ती योग्य पद्धतीने न केल्या गेल्याने गाळाचे थर धरणाच्या तळाशी जमा होतात. यामुळे धरणाची एकूण जलसंचय क्षमता कमी होते. पर्यायाने पाणी साठवून ठेवणे शक्य होत नाही. ते वेळोवेळी सोडावेच लागते. अप्पर वर्धा धरणाच्या बाबतीत कदाचित तसेच घडले आहे. त्यामुळे विसर्ग विक्रमी झालेला दिसतो.
– विवेकानंद माथने, धरणांची चिकित्सा करणारे अभ्यासक तथा सिंचनतज्ज्ञ, अमरावती.