वाचायलाच हवीत : महागाईचं खत घातलेल्या झाडाचं फळ! | inflation Must read Rita Velinkar The homepage is eye catching of the novel Shanta Gokhale live independently amy 95वंदना बोकील-कुलकर्णी
‘कमावती मुलगी म्हणजे सोन्याचं अंडं देणारी कोंबडीच’ या विचारावर उभी असलेली किती तरी कुटुंबं आणि जबाबदाऱ्यांनी वाकत गेलेले या मुलींचे कोवळे खांदे. ही एका ‘रीटा वेलिणकर’ची गोष्ट नव्हेच. शांता गोखले यांनी मांडलेला आत्मनिर्भर जगण्याचं भान देणारा हा प्रवास प्रत्येकानं वाचायलाच हवा असा..

Advertisement

‘रीटा वेलिणकर’ ही शांता गोखले यांची कादंबरी चांगल्या जाणत्या वयात वाचली. तोवर गौरी देशपांडे, सानिया या लेखिकांनी अशा प्रकारच्या लेखनाची रुची केलीच होती तयार. मेंदूचं भुस्कट पाडणारं, भावनांचे पदर सोलून काढत आतल्या गाभ्याला भिडण्याचं धाडस करायला लावणारं ८० च्या दशकात येत गेलेलं लेखन झडप घालून वाचायची अपार ओढ निर्माण झाली होती. तरीही या कादंबरीनं अंतर्बाह्य ढवळून काढलं. अजूनही ती आहेच मनाच्या तळाशी. १९९० ची कादंबरी. ती प्रसिद्ध होऊन ३० वर्ष उलटली तरी ती समकालीन वाटतेच आहे.

या कादंबरीचं मुखपृष्ठ लक्षवेधक आहे. त्यावरच्या चित्रातल्या तिन्ही स्त्रिया एकमेकींशी खऱ्याखुऱ्या जिव्हाळय़ानं बांधल्या आहेत, हे अगदी स्वच्छ दिसतंय. त्यांच्या वयातली अंतरं, त्यांची शारीर-मानस अवस्था, त्यांची व्यक्तिमत्त्वं आणि चेहऱ्यांवरचे भाव.. सारं नजर बांधून घेणारं आहे. शांताबाईंनी यात लिहिलंय,

Advertisement

‘डॉ. गीव्ह पटेल यांच्या या चित्राचे नाव आहे- ‘काँग्रेच्युलेशन्स’. पण ते ‘कॉन्सोलेशन्स’ही असू शकेल. कोणत्याही झगडय़ात अखेरीस हाती येणारी द्वयर्थता इथे आहे. एकमेकींना बळकट-कोमल शक्तीने सांभाळणाऱ्या बायका जगात सर्वत्र आहेत. इथे त्यांची नावे आहेत- रीटा, सरस्वती, संगीता.’ खरोखरच ही या तिघींची गोष्ट आहे. कादंबरीची नायिका रीटा ही नलिनी साठे आणि शंकर वेलिणकर या मिश्र विवाह केलेल्या जोडप्याची मोठी मुलगी. नलिनी साठेनं प्रेमात पडून शंकर या देवदासीपुत्राशी लग्न केलं आणि म्हणून ‘ती तिच्या घराला मेली’. शंकर वेलिणकर एका ब्रिटिश कंपनीत नोकरी करता करता इंग्रजाळलेल्या आयुष्यात ‘शँक्स वेलिणकर’ म्हणून आपखुशीनं बंदी होतो. मलबार हिलवरचं मोठं घर, इंग्लिश पद्धतीचा ब्रेकफास्ट, ब्रोकेडचा हाऊसकोट, तोंडात अखंड पाइप, घरातही इंग्रजीच भाषा बोलणं, मुलींना कॉन्व्हेंट शाळेत घालणं, घरात व्हिक्टोरिया नावाची ‘मेड’ असणं आणि भारताला सतत ‘ब्लडी’, ‘डर्टी’ म्हणून हिणवणं, असा हा शंकर ऊर्फ शँक्स. नलिनी साठे ही नेली वेलिणकर बनून सतत आपल्या कातडीचं सौंदर्य जपत, नवऱ्याची आवडती राहाण्याच्या एकमेव कर्तव्याचं कसोशीनं पालन करणारी, उच्चभ्रू वर्गात मिसळून जाण्याचा खटाटोप करणारी केवळ एक ‘मादी’. चार मुलींना जन्म देण्यापुरतंच तिचं आईपण. ‘मम्मी चापट मारायची.. तेव्हढाच तिच्या हाताचा स्पर्श’ इतकी दुर्मीळ प्रजातीची आई. मुलींना व्हिक्टोरियाच्या ताब्यात देऊन नवऱ्याबरोबर पाटर्य़ा करत फिरणारी ही स्त्री. रीटा जेमतेम मॅट्रिक होते, तोच शंकरची नोकरी जाते; पण इंग्रजाळलेला रुबाब मात्र कायम राहातो. पुढच्या शिक्षणाचा विचारही न करता रीटा मिळेल ती नोकरी पत्करते आणि तिथे तिला भेटतो साळवी. तिचा बॉस. सज्जन, प्रेमळ, पण विवाहित, बालबच्चेवाला पुरुष! तो रीटाला पुढे शिकायला उद्युक्त करतो. नवी, अधिक चांगली नोकरी मिळवून देतो. कृतज्ञता, घरातून कधीही वाटय़ाला न आलेला जिव्हाळा आणि वय, यातून रीटाचे आणि त्याचे संबंध जुळतात. हे संबंध लपूनछपून चालू राहातात. रीटा घरच्या सगळय़ा जबाबदाऱ्यांचा भार कोवळय़ा खांद्यावर उचलते. त्यात साळवीचं सर्वतोपरी सहाय्य होतं. बदल्यात साळवीला आपला संसार अबाधित राखून रुचिवैचित्र्य, रीटावर उपकार केल्याची ‘फील गुड भावना’ आणि बरंच काही.. जे बहुधा अशा नात्यांत गृहीत असतं. धाकटय़ा बहिणींची शिक्षणं आणि लग्नं उरकता उरकता रीटा पस्तिशीची प्रौढ कुमारिका होते. साळवीच्याही कौटुंबिक जबाबदाऱ्या कमी होतात. आता हे चोरटे संबंध रीटाला नकोसे होतात. साळवीबरोबर उजळ माथ्यानं वावरणं, स्वच्छ मनानं प्रेमाचा, सहवासाचा आनंद घेणं हवं वाटू लागतं. ती म्हणते, ‘आता यापुढे मला असं जगणं जमणार नाही.’ आणि तिथे साळवीचं खरं रूप उघडं पडतं. रीटा खोटेपणानं वागत होती तेव्हा ती शहाणी, प्रगल्भ आणि समजूतदार होती. खऱ्याचा आग्रह धरू लागल्यावर मात्र ती अचानक असमंजस, हट्टी मुलगी होते!

रीटा स्वत:चं छोटं घर घेते, स्वतंत्र होते. घर ताब्यात आल्यावर ‘साळवीला आता चोरून भेटायची गरज नाही’ असं वाटत असताना साळवी मात्र आक्रसतो. उघडपणे हे नातं स्वीकारायला नकार देतो. बायको-मुलं, समाज, लोक, असे बागुलबुवे उभे करतो आणि ‘स्वच्छ मनाचा अधिकार आपल्याला नाही, कारण आपलं नातं समाजमान्य चौकटीतलं नाही’ असा निर्वाळा देतो. ताणून ठेवलेली स्प्रिंग तुटावी तसा रीटाचा नव्र्हस ब्रेकडाऊन होतो. हॉस्पिटलात भरती झालेल्या रीटाला भेटण्याचं धाडसही साळवी दाखवत नाही. हॉस्पिटलमधून रीटा आपल्या जुन्या, जवळच्या मैत्रिणीला- सरस्वतीला पत्र लिहून ही सगळी कहाणी कळवते. मधलं सगळं अंतर पार करून सरस्वती रीटासाठी, मैत्रीसाठी आपली रूढ चौकट सोडून रीटाला भेटते. खऱ्या अर्थानं भेटते. बहीण-मैत्रीणच करू शकेल असं सारं काही करते आणि ते करताना स्वत:चा स्वतंत्र अवकाशही मिळवते! रीटा, अपत्यवत असणारी धाकटी बहीण संगीता आणि सरस्वती यांच्यासह ‘आपल्या’ घरात राहाण्याचा निर्णय घेते. साळवीला आपल्या भावविश्वातून, आपल्या जुन्या नात्यातून हद्दपार करते. या घरात वस्तू नसतात फारशा, पण सरस्वतीची लिहिण्याची टेबल-खुर्ची असते आणि संगीताला पीडित बायकांसाठी काम करायला जागाही. तिघीजणी ‘आपल्या’ नव्या आयुष्याची सुरुवात करतात. एखाद्या कथा-कादंबरीत रंगवलेलं चित्र आज समाजात प्रत्यक्षात दिसतंय. निदान शहरातून तरी स्वतंत्रपणे एकटी राहाणारी बाई दिसतेय. त्याची वाट रीटा, सरस्वती आणि संगीताच्या त्या छोटय़ाशा घरानं दाखवली हे नक्की. आज किती तरी स्त्रिया एकटं राहाणं निवडतात. एकटय़ा स्त्रिया मुलं दत्तक घेतात, आपल्या स्वत:च्या जिवावर आनंदानं जगताना दिसतात. झगडून मिळवलेल्या स्वातंत्र्याची किंमत चुकवतात. म्हणूनच त्या झगडय़ासाठी अभिनंदनही करायचं आणि जे गमवावं लागलं, जी किंमत मोजावी लागली त्यासाठी सांत्वनही करायचं. मुखपृष्ठावरचं चित्र असं सतत आपल्या वाचनाबरोबर राहातं. १९३३ मध्ये विभावरी शिरुरकर यांच्या ‘कळय़ांचे नि:श्वास’मधल्या नायिकेवर असंच वडिलांचा संसार चालवण्याचं काम अंगावर येऊन पडलं होतं आणि मग ‘बाबांचा संसार माझा कसा होणार?’ असा प्रश्न तिला विचारावा लागला होता. मिळवती मुलगी म्हणजे जणू सोन्याचं अंडं देणारी कोंबडीच! किती तरी मुलींना कुटुंबासाठी असा जबरदस्तीनं त्याग आणि समर्पण करायला लावून त्या ओझ्याखाली चिरडून टाकणाऱ्या या समाजव्यवस्थेत या झगडय़ांना पर्याय नाहीच, समाजाच्या या दाहक वास्तवात अनेक तरुण आयुष्यं खर्ची पडली याची चरचरून जाणीव ही कादंबरी करून देते म्हणूनच ही महत्त्वाची कादंबरी ठरली आहे.. रीटालाही सुरुवातीला विचार करण्याचीही उसंत न मिळता आलेली परिस्थिती झेलावी लागते. पहिला पगार येताच, घरात येणारा प्रत्येक पदार्थ सर्वाना सारख्या प्रमाणात मिळेल, असं ती जाहीर करते याचा वडिलांना किती राग यावा!.. रीटाला धडा शिकवायचा म्हणून भर पावसात ते रात्र घराबाहेर काढतात आणि आयुष्यभराचा खोकला लावून घेतात. साळवीबरोबरच्या नात्याविषयी सारं काही समजूनही ‘नासमझ’ असल्याचा देखावा करत राहातात. ही ‘अॅडजस्टमेंट’ त्यांना फारच पसंत असते! माणसाच्या कमालीच्या क्षुद्र, स्वार्थी वृत्तीचं, वसाहतवादी दृष्टिकोनाचं, कॉर्पोरेट कंपन्यांमधल्या स्पर्धेचं आणि शोषणाचं अस्तर या कथानकाला आहे. पण आपल्याच कोमल आणि बळकट शक्ती एकमेकींबरोबर उभ्या केल्या, तर यातूनही आत्मसन्मान जपत जगता येतं, हा दिलासा ही कादंबरी देते.
यातल्या स्त्री व्यक्तिरेखा वैविध्यपूर्ण आहेत! या घरातली मेड व्हिक्टोरिया तिला फसवून सोडून गेलेल्या फ्रान्सिसला कधी विसरू शकत नाही. प्रेमाची ही परिचित दास्तान! ती आपलं दु:ख दारूच्या बाटलीत बुडवते आणि त्या नशेत रोज आपली दर्दभरी कहाणी या लहानग्या मुलींना ऐकवत राहाते. दुसरी नलिनी ऊर्फ नेली. परजातीय पुरुषाशी लग्न केलं म्हणून तिचं माहेर तुटलं. पदरात घेतलेल्या नवऱ्याला टिकवण्यासाठी त्याची मूल्यं, त्याची जीवनसरणी अंतर्बाह्य आपलीशी करणारा एक वर्ग असतो त्यात अगदी ‘फिट्ट’ बसणारी. स्वत:च्या प्रतिबिंबावर खूश असणारी. सुंदर, सेक्सी, सिफॉन बाई! तशीच इना आँटी. सुंदर शरीर हेच भांडवल समजून हुशारीनं त्याचा वापर करणारी आणि रीटानंही ‘असंच हुशारीनं’ वागावं अशी अपेक्षा करणारी जॉर्जेट लेडी! ‘आणि सरस्वतीसारख्यांचा एक दुसरा गट. विचारी, प्रेमळ, सुखवस्तू आईबापांच्या लाडात वाढलेल्या मुलींचा.. त्यांना हवं तेव्हढं शिकू देणारे आणि मग जोडे झिजवून एखाद्या सुस्वभावी, हुशार, सुरक्षित व प्रॉस्पेक्टस् असलेल्या नोकरीवाल्या पुरुषाशी धूमधडाक्यानं लग्न लावून देणारे हे आईबाप. त्यांची आपल्या मुलींकडून एकच अपेक्षा असते. त्यांनी सुखाचं जीवन जगावं.’ असं सांगत शांताबाई स्त्रीजीवनाचा आणखी एक परिचित आयाम नव्यानं उलगडू पाहातात. बाईचा उपयोग ‘पेजेला नि शेजेला’ असं मानणाऱ्या संस्कृतीचा पक्का पाईक- सुंदरम्, तिचा नवरा. त्याच्याशी संसार करता करता आतून शुष्क होत गेलेली सरस्वती बहुसंख्य स्त्रियांची प्रतिनिधी. पण नाही.. तिच्या आत एक ठिणगी अजून जिवंत आहे. तिला खूप लिहायचं आहे. आतली आणि बाहेरची ‘सेन्सॉरशिप’ झुगारून कधी लिहिता येईल म्हणून तिचा एक झगडा चालू आहेच. रीटाचा झगडा तिला वेगळं बळ पुरवतो, धैर्य आणि दिलासा देतो. रीटासाठी काही करताना जणू ती ते स्वत:ही मिळवते. सरस्वतीला स्वत: आणि नवऱ्यामधल्या अंतरातून, रीटा आणि साळवी यांच्यातल्या अंतरातून काही उमजू लागतं. तिच्याही लेखनाचा अवरुद्ध प्रवाह आता नव्यानं खळाळून वाहणार..

Advertisement

हॉस्पिटलमध्ये काम करणारी मरिअम्मा डोळय़ांत उद्याची स्वप्नं असणारी, लख्ख हसणारी. ती हसली की रीटाला काही तरी शुभ घडल्यासारखं वाटतं. भाबडी, पण परिस्थितीचा बिनशर्त स्वीकार केलेली. रीटाचा तिच्यावर जीव जडलाय. साहजिकच नाही का ते?.. कोवळी रीटाच दिसत असावी तिच्यात. ‘तिला समजावून सांगायला हवं आयुष्य’ असं रीटाला वाटतं. ‘‘आपण अठराव्या वर्षी कामाला लागतो. पहिली काही वर्ष आपण अभिमानाच्या लाटांवर तरंगत असतो. आपण आपल्या कुटुंबासाठी हे करतोय.. सगळे मार्गाला लागले की उरतात म्हातारे आईबाप आणि स्वत:च्या आयुष्यावर चोरटी नजर टाकून त्याचं मूल्यमापन करणारे आपण. तुला माहित्येय का, की तुझ्या-माझ्यासारख्यांचा या देशात एक मोठा सामाजिक गटच आहे तो? न मिळवत्या आईवडिलांच्या थोरल्या मुली.’’ विभावरींचा (शिरुरकरांचा) काळ उलटून ६० वर्ष झाली तरी हा गट आहेच अजून अस्तित्वात आणि तो यापुढेही राहाणार आहे हे समाजाचं चिरंतन कटू सत्य ही कादंबरी ३० वर्षांपूर्वी सांगून गेली आहे. रीटाची हॉस्पिटलमधली शेजारची रुग्ण बाई. घरच्या माणसांनी वेडी ठरवून तिथे आणून टाकलेली. एक ना दोन, किती तरी स्त्रिया आहेत यात. संगीताची आणखी निराळी व्यथा. तीही वर्षांनुवर्ष चालू असलेली आणि यापुढेही चालू राहाणारी. तिच्या कंपनीत उघड लैंगिक शोषण चालू आहे. त्याविरुद्ध आवाज उठवला म्हणून तिची नोकरी जाणार आहे. नोकरीवरून काढून टाकण्याची वाट पाहायची, की स्वत:च राजीनामा देऊन आत्मसन्मान जपायचा हा तिच्यापुढचा प्रश्न आहे.Here we go round the mulberry bush…हा सर्वानी मनोभावे खेळायचा खेळ. गोल गोल फिरत राहाण्याचा आणि प्रत्येक वेळी ती आनंदाची गिरकी आहे असं भासवण्याचा.. व्यवस्था किती प्रकारे माणसाला भुलवतात, किती प्रकारे त्याचं जगणं बांधून घेतात, याचं रीटाला त्या आजारात झालेलं ज्ञान मोलाचं आहे. प्रश्न विचारू नका, शंका काढू नका, जे दिलं आहे त्यात समाधानी राहा. आपली तेवढीच लायकी, हे समजून असा. यातून बाहेर पडण्याची धडपड केल्यावर, हे महागाईचं खतपाणी घातल्यावर धरलेलं ‘आत्मनिर्भर जगण्याचं भान’ हे फळ मोलाचं आहे! हे सगळं ज्यांच्यामुळे घडतं, ती शंकर, सुंदरम्, साळवी, कंपनीतला शर्मा ही माणसं मात्र सुखानं जगतायत!

बाकी या कादंबरीच्या रचनावैशिष्टय़ांबद्दल स्वतंत्र लेख लिहावा लागेल इतकं ते खास आहे. स्वगतं, पत्र, प्रथमपुरुषी निवेदन असूनही ‘स्व’च्या पलीकडे जाणारी निवेदकाची नजर, भाषा, मोजक्या, पण नेमक्या प्रतिमा, किती तरी अनवट मराठी शब्दांनी दिलेला आनंद.. खूपच. आशय आणि अभिव्यक्ती यांची एकरूपता पाहायची, जाणायची असेल तर ही कादंबरी वाचावी.

Advertisement

‘मनस्वी डोळे उत्सुकतेने भरलेले असताना रीटानं जीवनात सरळ मध्यभागी उडी घेतली. ती अभिमानानं, आनंदानं बेभान झाली. मग बावरली, गोंधळली, भरकटली. शेवटी किंचाळली, कोसळली.’ असं शांता गोखले तिचं यात वर्णन करतात, पण कादंबरी वाचून ठेवताना दिसतं, की ती पुन्हा उठली, सावरली, ताठपणे उभी राहिली आणि त्या वेळी तिच्या हातात होते सरस्वतीचे लिहिते हात, संगीताचे कोवळे, पण कृतिशील हात. रीटाला आता नीटच समजलं आहे, की तिचं आयुष्य हे ‘तिचं’ आहे!
vandanabk63@gmail.com

Source link

Advertisement