वसुंधरेच्या लेकी : हवामानबदल + वंचितांचा लढासिद्धी महाजन [email protected]
मोठय़ा राजकीय पदावरील व्यक्तीस थेट अडचणीत आणणारे बोल सुनावणं सर्वाना जमेल असं नाही. कॅ लिफोर्नियातील इशा क्लार्क  या मुलीनं हे धाडस दाखवलं आणि ती प्रसिद्धीच्या झोतात आली. पर्यावरणसमस्या हा प्रश्न वरवर व्यापक वाटत असला तरी वंचित जनतेच्या हक्कांच्या लढय़ाशी आणि इतरही अनेक समस्यांशी तो थेट जोडला गेला आहे हे ती लोकांना सांगू लागली. १८ वर्षांची ही मुलगी अमेरिके तील तरुण पर्यावरणप्रेमी कार्यकर्त्यांमधील एक आक्रमक आवाज झाली आहे.

Advertisement

‘मी त्या सगळ्यांचं संभाषण ऐकत तिथे उभी होते, पण ते ऐकताना मला प्रचंड एकटं वाटत होतं.  मला वेढून टाकणारी निराशा निपटून टाकण्यासाठी मी पुढे होऊन बोलण्याचा निर्णय घेतला. माझं ते बोलणं सर्वाच्या कायम स्मरणात राहील..’ हे शब्द आहेत, कॅलिफोर्नियामधील ऑकलंड शहरातील इशा क्लार्क चे.

२२ फेब्रुवारी, २०१९ चा तो दिवस होता.ऑकलंडमधील सर्व शिक्षक संपावर गेले होते आणि सोळा वर्षांच्या इशा क्लार्कला त्या दिवशी सुट्टी मिळाली होती. पण सुट्टीच्या दिवशी निवांत घरी बसून राहाणं तिला माहीत नव्हतं. त्या दिवशी ‘युथ व्हर्सेस अपॉकॅलिप्स’ या स्थानिक समूहाबरोबर काम करणारी इशा हवामान बदलाविरुद्ध निदर्शनं करण्यासाठी आयोजित केलेल्या एका रॅलीमध्ये सहभागी झाली. ते सर्वजण सिनेटर दिएन फाईनस्टिन यांच्या सान फ्रान्सिस्कोमधील कार्यालयासमोर गोळा झाले. तिथे त्यांची ‘बे एरिया’मधून आलेल्या ‘अर्थ गार्डियन्स’ या दुसऱ्या समूहाशी भेट झाली. हे स्वयंसेवक सिनेटर फाईनस्टिन यांना एक निवेदन देण्यासाठी चालले होते. ‘येऊ घातलेल्या ‘ग्रीन डील’ला तुम्ही स्वखुशीनं पाठिंबा देणार का?’ सर्व स्वयंसेवकांच्या डोळ्यांत तोच प्रश्न होता, जो त्यांनी या पत्रातून सिनेटर बाईंना विचारला होता. ‘जीवाश्म इंधनाचा वापर कमी करून आणि अपारंपरिक ऊर्जास्रोतांचा अधिकाधिक वापर करत अमेरिकेला ऊर्जानिर्भर बनवण्याचा आराखडा हे विधेयक मांडत आहे. तसंच आजपर्यंत चालत आलेल्या कारखानदारांच्या आणि बडय़ा कंपन्यांच्या मनमानीला मोडीत काढून नव्या पर्यावरणपूरक अर्थव्यवस्थेचा पायंडा ते पाडणार आहे. हवामानबदल आणि जागतिक तापमानवाढ या समस्यांचा सामना करण्यासाठी अमेरिकेतील उभरत्या नेतृत्वाच्या फळीकडे मांडलेला हा एक अत्यंत आशादायी प्रस्ताव आहे. हा प्रस्ताव स्वीकारणं तुम्हाला मान्य आहे का?’ असाही प्रश्न त्या निवेदनात विचारला गेला होता.

Advertisement

सिनेटर फाईनस्टिन यांनी या विषयावर चर्चा करण्यासाठी काही तरुणांना आपल्या कार्यालयात आमंत्रित केलं. त्यात इशाही होती. चर्चा सुरू असताना  जसजसा प्रश्नांचा रोख सिनेटर यांच्यासाठी प्रतिकू ल होऊ लागला, तसा त्यांनी बचावाचा पवित्रा घेतला. ‘मी गेली तीस वर्ष हे काम करत आहे. तुम्ही कार्यकर्ते येता आणि अमुक गोष्ट के वळ आमच्याच पद्धतीनं झाली पाहिजे असा हट्ट धरता. त्यावर मी प्रतिक्रिया देऊ शकत नाही. ‘ग्रीन न्यू डील’ सीनेटमध्ये पास होऊ शकत नाही आणि मी त्याला पाठिंबा देऊ शकत नाही.’ असं त्यांनी सांगितलं.  आधी शांतपणे ही चर्चा ऐकणाऱ्या इशानं त्यांना विचारलं, ‘तुम्ही म्हणताय ते आम्हाला समजतंय, पण आम्ही त्या जनतेचं प्रतिनिधित्व करतो, ज्यांनी मतदान करून तुम्हाला निवडून दिलं आहे. तुम्ही आमचं ऐकू न घेतलं पाहिजे. ते तुमचं कर्तव्य नाही का?’

‘तुझं वय काय?’ सिनेटरनी इशाचं बोलणं मध्येच थांबवत विचारलं.

Advertisement

‘सोळा वर्ष..’

‘मग तू मला मत दिलेलं नाहीस.’ सिनेटर उत्तरल्या.

Advertisement

नंतर सिनेटर बाईंनी त्या जे विधेयक मांडणार होत्या त्या ‘सीनेटमध्ये पास होऊ शकणाऱ्या’ विधेयकाची प्रत या कार्यकर्त्यांना दिली.

इशाला ते सारं संभाषण वेगळ्याच दिशेनं जात असलेलं जाणवलं. तिच्या मनात आलं, की एका मानवानं दुसऱ्या मानवाशी माणुसकीच्या नात्यानं, सामंजस्यानं बोलणं अपेक्षित असताना अपमानास्पदरीत्या सारवासारव करणारं हे बोलणं आहे. पृथ्वी हळूहळू नष्ट होत असताना, जगाच्या हाताशी वेळ कमी असताना, धाडसी व दूरदृष्टीचा निर्णय घेण्यापासून दूर पळण्याचा हा प्रकार आहे. पण भेटीच्या शेवटी ती शांतपणे त्यांना म्हणाली, ‘तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.’

Advertisement

ट्रेनमधून घरी जाताना इशाचा फोन वाजला. तिची एक शिक्षिका तिला तिचा अभिमान वाटत असल्याचं सांगत होती. इशाला क्षण दोन क्षण समजलं नाही, मात्र समजलं, तेव्हा सीनेटर भेटीतील तिच्या वक्तव्यास अधोरेखित करणाऱ्या स्तुतीपर ‘ट्विटस्’नी ट्विटर ओसंडून वाहात होतं. त्यानंतर तिचं संभाषण इंटरनेटवर व्हायरल झालं. ‘गार्डियन’, ‘डेमॉक्रसी नाऊ’, ‘टीन व्होग’, ‘ग्रिस्ट’, ‘मक्र्युरी न्यूज’ यांसारख्या नियतकालिकांचे रकाने या वार्ताकनानं भरले होते.

इशाच्या वैयक्तिक भावना काय होत्या? खरं तर तिला आपला पराभव झाल्यासारखं वाटत होतं. सिनेटर फाईनस्टिन यांचा आपल्या हेतूवर विश्वास बसेल, असं ठामपणे आपण आपलं म्हणणं मांडू शकलो नाही याचं तिला वैषम्य वाटत होतं. मात्र त्याच वेळेला तिला एका वेगळ्याच ऊर्जेनं भारल्यासारखंही वाटत होतं. हा तिच्या आयुष्याला कलाटणी देणारा क्षण होता. तिला सत्य मांडायचं होतं आणि ते तिनं मांडलं.

Advertisement

इशा क्लार्कनं आपलं म्हणणं ठामपणे मांडण्याची ही काही पहिलीच वेळ नव्हती. हायस्कूलमध्ये असताना बे एरियामधील एका पर्यावरणप्रेमी समूहाबरोबर ती फिल् तागामी या एका उद्योजकाला एक संदेश देण्यासाठी गेली होती. तागामी यांना या भागात कोळसा आधारित उद्योग सुरू करायचा होता. हा भाग गरीब कृष्णवर्णीय समाजाचा होता आणि त्यांना आरोग्याच्या समस्या आधीपासूनच सतावत होत्या. अशा परिस्थितीत तिथे कोळशाची खाण सुरू करणं त्यांच्या अस्तित्वावर गदा आणणारं ठरलं असतं.

‘हा विषारी कोळसा इथलं जीवन नष्ट करून टाकेल. तुम्ही हे थांबवायला हवं.’ इशा आणि तिच्या मित्रांनी तागामींना सांगितले. त्यावर त्यांची प्रतिक्रियाही सिनेटर फाईनस्टिन यांच्यापेक्षा वेगळी नव्हती. या मुद्दय़ावर अधिक चर्चा होण्यासाठी तिनं ‘ईस्ट बे एक्स्प्रेस’ या वर्तमानपत्रात यावर एक लेख लिहिला. ‘कोळसा आयात करणं आणि तो जाळणं आपल्याला थांबवलं पाहिजे, कारण ते हवामानबदलाला वेगानं आमंत्रण देतं आहे.’ असं तिनं त्या लेखात मांडलं. त्या क्षणी तिला आपल्या आयुष्याचं ध्येय सापडलं होतं. तिला काय करायचं आहे, हे समजून चुकलं होतं.

Advertisement

इशा क्लार्क आज बे एरियामधील एक महत्त्वाची व्यक्ती बनली आहे. पर्यावरणप्रेमी चळवळींचा खडा आवाज बनली आहे. ती सार्वजनिक सभांमध्ये आपल्या भाषणांनी उपस्थितांना भारून टाकते. दूरवरून आलेल्या कित्येक श्रोत्यांना ती तिच्या वक्तव्यानं तोंडात बोटं घालायला लावते. वक्तृत्व ही तिची मक्तेदारी आहे.

कृष्णवर्णीय वडील आणि ज्यू आईचा वारसा लाभलेली इशा ऑकलंडमधील ‘ब्लॅक पँथर’ या कृष्णवर्णीय हक्कांसाठी लढणाऱ्या समुदायासाठी काम करते. वंचितांचं शोषण करण्यासाठी वर्षांनुवर्ष चालत आलेली समाजव्यवस्था, वर्णभेद, गोऱ्यांची मक्तेदारी आणि स्वार्थसाधूपणा या समाजाच्या तळागाळात रुतलेल्या समस्यांचा पाठपुरावा न करता हवामानबदलाची मोठी आणि वरवर वेगळी दिसणारी पण आतून या सगळ्यांशी जोडली गेलेली समस्या निवारण केली जाऊ शकत नाही, असं तिचं म्हणणं आहे. त्यासाठी ती आवेशानं लढा देत आहे.

Advertisement

जून २०२० मध्ये इशा, तिचे मित्र आणि इतर कार्यकर्त्यांनी एका नव्या समूहाची स्थापना केली. त्याचं नाव होतं ‘ब्लॅक युथ फॉर पीपल्स लिबरेशन’. १९ जून या अमेरिकन भूमीवरील गुलामगिरीच्या अंताच्या स्मृतिदिनी या समूहानं ‘करोना’चे सर्व नियम पाळून वेस्ट ऑकलंडमध्ये सभाही भरवली होती. वंचित कृष्णवर्णीय समुदायाला जाचक ठरणाऱ्या पर्यावरणविषयक अन्यायी व्यवस्थेला प्रकाशझोतात आणल्याबद्दल २०२० मध्ये इशाला ‘डिलर टीन टिकन ऑलम अवॉर्ड’ हा पुरस्कार प्राप्त झाला. वॉशिंग्टनमधील हॉवर्ड विद्यापीठात ती शिकते आहे आणि तिच्या शिक्षणाचा खर्च या पुरस्काराच्या रकमेतून होतो.

जाचक व्यवस्थांतून मुक्त होण्यासाठी आपल्या काही जुन्या व्यवस्था मोडीत काढल्या पाहिजेत. आपला देश आणि हे जग ज्या चुकीच्या पायाभूत रचनांवर रचलं गेलं आहे, त्या रचना पुन्हा मोडून बांधल्या पाहिजेत. इशा क्लार्क आज ज्या गोष्टींवर काम करते आहे, तिथे तिला खऱ्या सामाजिक प्रतिच्छेदनाचा किंवा ‘इंटरसेक्शनॅलिटी’चा अर्थ कळतो आहे. कोणत्याही समस्येच्या मुळाशी दुसरी समस्या असते, जी सुटली असं वाटत असतानाच पुन्हा डोकं  वर काढते. ‘इंटरसेक्शनॅलिटी ’ ही संकल्पना दोन वेगवेगळ्या पण एकच मूळ असणाऱ्या समस्यांच्या विरोधात एकत्र कार्यपद्धती वापरून समस्या सोडवण्याचा प्रयत्न करते. हवामानबदल ही एक अशीच समस्या आहे. ती वंशवाद, वसाहतवाद आणि भांडवलशाही या तीन वरवर वेगवेगळ्या भासणाऱ्या, पण शोषणाच्या मुख्य धारेला प्रवाहित करणाऱ्या एकत्र विचारसरणीचा परिपाक आहे. त्या विरोधात न्याय मिळवण्यासाठी महत्त्वाचं आहे त्या विचारसरणीला आव्हान देणं.

Advertisement

एकत्रित मुक्ततेसाठी प्रयत्न करणं, संघटना करण्यासाठी आवाज देणं, जे इशासारखी रणरागिणी करते आहे. पूर्ण आत्मविश्वास, निडर बेदरकारी आणि उन्नत माथा घेऊन आपला आवाज बुलंद करत, पायाला भिंगरी लावून फिरणारी ही मुलगी, हवामानबदलाच्या विरोधात चाललेल्या चळवळीचा नवा आक्रमक चेहरा आहे.

The post वसुंधरेच्या लेकी : हवामानबदल + वंचितांचा लढा appeared first on Loksatta.

AdvertisementSource link

Advertisement