वसुंधरेच्या लेकी : पर्यावरण रक्षणासाठी सुसंवाद!|| सिद्धी महाजन

Advertisement

नेपाळ हे तसं लहानसं राष्ट्र. प्रगत देशांच्या तुलनेत अतिशय वेगळी परिस्थिती असलेल्या या देशातील श्रेया के . सी. ही २३ वर्षांची पर्यावरणरक्षणाविषयी जागृती करणारी कार्यकर्ती. हवामानबदलाचे परिणाम ती अल्पशिक्षित, आदिवासी लोकांपर्यंत पोहोचवते आहे. लहान लहान कृतींमधून पर्यावरणरक्षणास हातभार लावायला मुलांना आणि तरुणांना प्रेरणा देते आहे       .

श्रेया के. सी. – शालेय शिक्षण संपवून महाविद्यालयीन जीवनात पाऊल ठेवणारी, सूक्ष्मजीवशास्त्र या विषयात संशोधन करू पाहणारी एक नेपाळी तरुणी. मात्र तिच्या शैक्षणिक वाटचालीतील हे महत्त्वाचं वळण तिच्या जीवनाला अनपेक्षितरीत्या कलाटणी देणार होतं, याची तिला यत्किंचितही कल्पना नव्हती. नेपाळमधील ललितपूर इथल्या त्रिभुवन विद्यापीठात जेव्हा श्रेयानं शिक्षणासाठी प्रवेश घेतला, तेव्हा तिच्या जीवनात येऊ घातलेली आश्चर्यकारक गोष्ट जणू तिची वाटच पाहात होती…

Advertisement

  वर्गात नवीन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिरस्त्याप्रमाणे ती करिअरविषयक सल्ला घेण्यासाठी तिच्या शैक्षणिक सल्लागारांना भेटली. त्यांनी तिच्यासमोर काही पर्याय ठेवले होते. ‘ई’, ‘सी’ आणि ‘बी’ अशा पर्याय गटामधून तिला अभ्यासक्रमाची निवड करायची होती. त्यातील ‘ई’ हा पर्याय श्रेयाने निवडला खरा, मात्र त्यात तिचा जरा गोंधळ झाला. कारण तिला वाटलं होतं, की ‘ई’ म्हणजे इंग्रजी हा विषय असेल. पण जेव्हा तिनं या विषयाच्या वर्गात यायला सुरुवात केली, तेव्हा तिला कळून चुकलं, की तिचे शिक्षक ना विल्यम शेक्सपियरबद्दल बोलत होते, ना चाल्र्स डिकेन्सबद्दल शिकवत होते. ते बोलत होते जागतिक तापमानवाढीबद्दल, पर्यावरण- विषयक समस्यांबद्दल, वेगानं होणाऱ्या हवामानबदलामुळे लोकांच्या जीवनावर होणाऱ्या परिणामांबद्दल. शिवाय ते नुसतेच माहिती देत नव्हते, तर विद्यार्थ्यांना पर्यावरणाप्रति असलेल्या जबाबदारीची जाणीव करून देत होते. जसजसे दिवस पुढे सरकू लागले, तसतसं तिला कळू लागलं, की हा विषय रोजच्या आयुष्याला खोलवर स्पर्श करतोय. ती अक्षरं जणू तिच्या आयुष्यासाठी परवलीचा शब्द बनली. ती सांगते, ‘मी त्या दिवशी जेव्हा घरी परतले, तेव्हा मला खूप शिकण्याची इच्छा होती. खूप जाणून घेण्याची इच्छा होती. मला त्या लोकांबद्दल जाणून घ्यायचं होतं, जे नेपाळच्या उंचच उंच पर्वतरांगांतून आपला बाडबिस्तरा गोळा करून वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतर करत होते…’ विद्यापीठात प्रवेश घेण्यापूर्वी तिनं ‘ग्लोबल वॉर्मिंग’ किंवा हवामानबदलाबद्दल ऐकलं होतं. हरित वायू या संकल्पनेबद्दलही ऐकलं होतं आणि ‘आम्ल’वर्षा (अ‍ॅसिड रेन) याविषयीही ऐकलं होतं. पण त्या परिस्थितीचं गांभीर्य तिला तेव्हा समजलं नव्हतं. या देशामधल्या समाजजीवनावर त्याचा कसा परिणाम होतो आहे, याची तिला काहीच कल्पना नव्हती.

‘मला पहिल्यांदा असं वाटलं, की मी यावर काहीच करू शकत नाहीये. या पृथ्वीवरती माणसाला जगण्यासाठी किती वर्षं उरली आहेत, अन् या साऱ्याचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी माझ्याकडे किती कमी वेळ उरलाय, याचा विचार करून मला एक उदास, जाणीव व्यापून टाकणारी भीती वाटली.’ असं श्रेया सांगते खरी, पण दुसऱ्याच क्षणी तिनं त्या भीतीला शरण जायचं नाकारलं आणि निश्चय केला, की ती त्या विषयावर अधिकाधिक सखोल संशोधन करेल आणि इतरांनाही जागृत करेल. पर्यावरण बचावाची चळवळ श्रेयासाठी बरंच काही आहे. तो तिच्या समाजाचं अस्तित्व वाचवण्यासाठीचा एक प्रयत्न आहे. हवामानबदलामुळे नेपाळमध्येच नव्हे, तर आजूबाजूच्या पहाडी प्रदेशातील वातावरणात आणि ऋतुमानात अतिशय वेगानं स्थित्यंतरं होत आहेत. हिमालयातील एकूण हिमनद्यांमधील एक तृतीयांश नद्या, या शतकाच्या शेवटपर्यंत विरघळून नामशेष होतील आणि पायथ्याशी असलेल्या सरोवरांतील पाण्याची पातळी वाढेल. यामुळे पूरपरिस्थिती ओढवेल, तसंच दरड कोसळण्याचं प्रमाण वाढेल. या समस्या तिथे नवीन नाहीत. यामुळे हजारो लोकांचं जीवन याआधीच टांगणीला लागलं आहे. हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या नेपाळमधील जीवनमान हवामानबदलामुळे अतिशय धोक्यात आहे. गरिबीचं आणि निरक्षरतेचं प्रमाण जिथे अतिशय जास्त आहे, तिथे हवामानात होणारे वेगवेगळे बदल पाहून लोक भांबावून जात आहेत. मात्र त्याच्या मुळाशी असलेलं कारण फार कमी लोकांना ज्ञात आहे. यापासून आपलं संरक्षण करण्यासाठी आपण काय करू शकतो, याची त्यांना कल्पना नाही. श्रेयानं याचं उत्तर शोधण्यास प्रारंभ केला आणि पर्यावरण क्षेत्रात उत्तम काम करणाऱ्या अनेक व्यक्ती आणि संस्थांबद्दल माहिती मिळवण्यास सुरुवात केली. देशभरच्या विविध प्रयत्नांचा तिला धांडोळा घ्यायचा होता.

Advertisement

त्यानंतर तिला ‘युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम’ (यूएनडीपी) आणि ‘नेपाळी युथ फॉर क्लायमेट अ‍ॅक्शन’ (एनवायसीए) या दोन संस्थांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित केलेल्या राष्ट्रीय हवामान परिषदेची माहिती मिळाली. तिनं सहभाग अर्ज भरला आणि योगायोगानं तो मंजूर होऊन तिला या परिषदेत सहभागी होण्याची संधी मिळाली. तिथे ती अनेक लोकांना भेटली, अनेकांशी तिनं चर्चा केली. तिला समजलं, की स्थानिक पातळीवर सर्वांनी एकत्र येऊन काम सुरू केलं, तर आपण नक्कीच एक मोठा बदल घडवू शकतो.

‘एनवायसीए’बरोबर काम करताना तिला एका स्थानिक शाळेत पर्यावरणशास्त्र हा विषय शिकवण्याची संधी मिळाली. तिच्यासाठी ती सुवर्णसंधीच होती म्हणा ना! तिनं त्या मुलांना निसर्गाबद्दल कृतज्ञ राहण्याची एक नवी दृष्टी मिळवून देण्यास मदत केली. पर्यावरण संतुलन राखणं आवश्यक का आहे, याची छोटी छोटी उदाहरणं देऊन जाणीव करून दिली. जीवनाची घडी एकसंध ठेवणारे ऊर्जास्रोत राखणं किती महत्त्वाचं आहे, यावर चर्चा केली. हवामानबदल आणि जागतिक तापमानवाढ या संकल्पनांची त्यांना ओळख करून दिली.

Advertisement

प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण हा मूलमंत्र जपताना तिनं तिच्या शाळेत पर्यावरण संवर्धन मंडळाची संकल्पना राबवली. तिनं मुलांबरोबर अनेक प्रयोग करून पाहिले. त्यांना झाडांची निगा राखायला आणि कचऱ्याचं व्यवस्थापन करायला शिकवलं. त्यांनी हसतखेळत अनेक कोडी सोडवली आणि छोट्या छोट्या आनंदाची गोडीही चाखली. प्रत्यक्ष सहभागातून बरंच काही साध्य होऊ शकतं हा धडा ते शिकले. अशाच छोट्या वाटणाऱ्या गोष्टी मोठा परिणाम घडवू शकतात याची त्यांना जाणीव झाली. याबरोबरच ‘एनवायसीए’बरोबरसुद्धा श्रेयाची मुशाफिरी चालूच होती. ते वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करत, शैक्षणिक चर्चासत्रं घडवून आणत आणि मुलांना हवामानबदलाविरुद्ध शांततापूर्ण निदर्शनं करण्यासाठी प्रवृत्त करत. त्यांनी नेपाळच्या पंतप्रधानांना पत्र लिहिलं, ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या ऊर्जाविषयक धोरणावर फेरविचार करण्याची विनंती केली.

यातूनच तिला सप्टेंबर २०१९ मध्ये ‘युथ क्लायमेट स्कॉलरशिप’बद्दल माहिती मिळाली. ही संस्था जगभरातील तरुण पर्यावरण कार्यकर्त्यांना जागतिक हवामान परिषदांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देते. त्यांना आर्थिक सहाय्य करते. २०१५ च्या पॅरिस कराराशी संलग्न असे जे निर्णय अनेक देशांनी घेतले, त्यांच्यावर चर्चा करण्यासाठी आणि निर्णय प्रक्रियेमध्ये आपलं मत नोंदवण्यासाठी, ही संस्था जगभरातील अनेक लहान मुलांना पाठबळ देते. श्रेयाला माद्रिदमधल्या हवामानबदल परिषदेत सहभागी होण्याची इच्छा होती. त्यासाठी तिनं अर्ज केला आणि या परिषदेत सहभागी होण्यासाठी तब्बल २० हजार अर्जांमधून तिची निवड झाली. परिषदेत सहभागी होऊन तरुणाईचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्यामुळे तिच्या आनंदाला पारावार उरला नाही. तिथे गेल्यावर तिला समजलं, की त्यांच्यावर वेळापत्रकाचं बंधन होतं. काही मर्यादा होत्या. श्रेयानं फक्त एका ठिकाणी बसून इतरांचं म्हणणं ऐकण्यासाठी या परिषदेत सहभाग घेतला नव्हता. परिषदेचा समारोप सोहळा पुन्हा पुन्हा पुढे ढकलला जात होता आणि श्रेया तिथे एका खुर्चीवर रात्रभर बसून राहिली होती. तिला माहिती होतं, की हेच ते व्यासपीठ आहे, जिथे त्यांचं म्हणणं ऐकलं जाईल. अन् शेवटी तिला ती सुवर्णसंधी मिळाली. तिचा आणि एकूणच सर्व नेपाळी तरुणाईचा प्रातिनिधिक आवाज परिषदेच्या व्यासपीठावर मांडण्याची. हे खूप महत्त्वाचं होतं.  

Advertisement

‘पर्यावरणरक्षणासाठी आम्हाला सगळ्यात महत्त्वाकांक्षी कार्यपद्धती राबवलेली हवी आहे. आम्ही आमच्या घरापासून सुरुवात करू शकतो, स्थानिक पातळीवर काम करू शकतो, मात्र एवढ्या मोठ्या परिषदेत घेतले जाणारे निर्णय आणि आमची पावलं यात जर सुसंवाद साधला गेला नाही, तर प्रयत्न वाया जातीलच आणि मनाला शांती लाभणार नाही,’ असं श्रेया म्हणते.

तेवीस वर्षांची श्रेया हिमालयातील पर्वतरांगा आणि गावखेड्यांना सामोरं जाव्या लागणाऱ्या हवामानबदलाच्या दुष्परिणामांबाबत नेपाळी समाजात, विशेषत्वानं तिथल्या आदिवासी भागात जनजागृती करते आहे. निसर्गाला धरून राहणाऱ्या आदिवासी समाजानं दिखाऊ आणि पोकळ योजनांचा आधार न घेता या समस्यांवर स्थानिक उपाय केले पाहिजेत, यासाठी तिचे प्रयत्न आहेत. तिची तत्त्वं अंगीकारताना तिला टीकेलाही सामोरं जावं लागतं. ‘विकासविरोधी’ म्हणून हिणवलं जातं. पण त्याच्याकडे ती दुर्लक्ष करते. कारण तिच्यासाठी हे प्रयत्न म्हणजे तरुणाईला मिळालेली एक अपूर्व संधी आहे. पृथ्वीवर वावरणारे आपण सर्वांत महत्त्वाचे जीव आहोत असं मानवाला जर वाटत असेल, तर त्यानं, विशेषत्वानं तरुणाईनं आपली जबाबदारी ओळखली पाहिजे, ठोस पावलं उचलली पाहिजेत आणि इतरांना कार्यक्षम राहण्यासाठी प्रवृत्त केलं पाहिजे.

Advertisement

‘सजीव आहात, जीवनाची अपूर्व भेट मिळालेले भाग्यवान मानवप्राणी. येणाऱ्या पिढ्या पेलून जगतील तुमची आव्हानं आणि अधिकार, लावतील तुमची नावं आणि आडनावं,त्यांना शुद्ध हवा, पाणी आणि पर्यावरण कसं लाभेल, याची तजवीज करणं,नाहीये का तुमची जबाबदारी? ही पृथ्वी तुमच्याकडे सोपवली गेली, तेव्हा जो विश्वास होता,पहा तोच विश्वास तुम्हाला पुढील पिढ्यांना जन्म देताना वाटतोय का?’

दलाई लामांचे हे शब्द जणू तिला जगण्याची वाट दाखवत आहेत. तिच्यासाठी ऊर्जास्रोत आहेत आणि उज्ज्वल भवितव्याची नांदीही.

Advertisement

snmhjn33@gmail.com  

The post वसुंधरेच्या लेकी : पर्यावरण रक्षणासाठी सुसंवाद! appeared first on Loksatta.

AdvertisementSource link

Advertisement