वसुंधरेच्या लेकी : घेतला वसा टाकू नको!


‘‘पर्यावरणऱ्हासाच्या खुणा ठळक होत असताना त्या पुसून टाकण्यासाठी धडपडणाऱ्या छोटय़ा आणि तरुण मुलींविषयीचं हे सदर लिहिताना स्त्रीमधील नवनिर्मिती आणि संवर्धनाची मूलभूत तळमळ मला पुन:पुन्हा जाणवली.

Advertisement

सिद्धी महाजन

‘‘पर्यावरणऱ्हासाच्या खुणा ठळक होत असताना त्या पुसून टाकण्यासाठी धडपडणाऱ्या छोटय़ा आणि तरुण मुलींविषयीचं हे सदर लिहिताना स्त्रीमधील नवनिर्मिती आणि संवर्धनाची मूलभूत तळमळ मला पुन:पुन्हा जाणवली. या सदरात ज्यांच्याविषयी लिहिलं गेलं, त्या देशोदेशीच्या मुलींमध्ये एक समान गोष्ट होती, ती म्हणजे त्यांची अखंड तळमळ. पृथ्वीवर संकट कोसळताना त्यांचं स्वस्थ न बसणं, व्यक्त होण्यासाठी सतत माध्यम शोधत राहणं. सगळ्यात महत्त्वाचं होतं, ते त्यांचं तिथं असणं! तेच मोठं प्रेरणादायी होतं!’’

Advertisement

‘डू यू केअर?’

आपल्या आजूबाजूच्या वास्तव जगातल्या लहान मुली. वयानं लहान, पण समजुतीनं प्रगल्भ असणाऱ्या!  या मुली रस्त्यावर उतरतात, प्रश्न विचारतात, शाळा बुडवून आपल्या ध्येयाशी एकनिष्ठ राहतात, इतर मुलांना त्यात सामील करतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकच एक प्रश्न पुन:पुन्हा, ठामपणे विचारतात. अगदी मोठय़ांच्या डोक्याला ताप होईपर्यंत!

Advertisement

‘डू यू केअर?’ ‘वसुंधरेची अन् पर्यायानं आमच्या भविष्याची काळजी आहे का तुम्हाला?’

 ही पृथ्वी, हे पर्यावरण संकटात आहे. त्यातच काळजी वाढवणारं गेलं वर्ष आलं. सोबत काळजी गडद करणाऱ्या अनेक नैसर्गिक आपत्तीसुद्धा. छोटय़ा झळा सोसत असताना काही तरी मोठं येऊ घातलंय, ही तीव्र होत जाणारी जाणीव पुस्तकात लिहिल्या जाणाऱ्या वाक्यांपुरती मर्यादित राहिली नसून आता सामान्य माणसाच्या दैनंदिन जगण्यातील चिंतेचा भाग झालीय. पर्यावरण संरक्षणाचा एरवी तसा मवाळ वाटणारा सूर आता बराच तापू लागलाय. एअरकंडिशन्ड हॉलमध्ये बसून जागतिक तापमानवाढीवर शिखर परिषदा भरवणाऱ्या महनीय व्यक्तींच्या चेहऱ्यावरची चिंतेची रेघही आता दिवसेंदिवस  ठळक होत चाललीय.

Advertisement

या पाश्र्वभूमीवर ही लेखमाला सुरू केली. सुरुवातीला ठरलं होतं, की हवामानबदल आणि जागतिक तापमानवाढ यावर वेगवेगळ्या मार्गानं आवाज उठवणाऱ्या, चळवळ करणाऱ्या विशीच्या आतबाहेरच्या मुलींबद्दल लिहायचं. हे लिखाण ऐतिहासिक संदर्भाना धरून असण्याबरोबरच बहुतांशी गेल्या वर्षीच होऊन गेलेल्या आणि या लेखमालेच्या हातात हात गुंफून समांतर श्वास घेणाऱ्या नव्या, ताज्या दमाच्या पर्यावरण चळवळीबद्दल (क्लायमेट अ‍ॅक्टिविजम) असणार होतं. तसंच ऱ्हासाच्या खुणा ठळक होत असताना त्या पुसून टाकण्यासाठी धडपडणाऱ्या छोटय़ा हातांविषयी असणार होतं. हे सदर लिहिताना आजूबाजूला बरंच काही घडत होतं, त्याला अनुस्यूत करत पालवणाऱ्या, फुलू घातलेल्या नव्या हिरव्या जाणिवेचं, जाणिवेसाठीचं हे लिखाण होतं. पाहता पाहता एखाद्या कोंबाला धुमारे फुटावेत तसे या विषयाला फुटणारे अनेक धुमारे लक्षात यायला लागले. वेगवेगळ्या देशांतील, वेगळाल्या समाजजाणिवेत वाढलेल्या मुली, त्यांचं स्त्री असणं, आसपासच्या समाजात वावरताना इतरही अनेक सामाजिक प्रश्नांचं मूळ प्रश्नाला छेदून जाणं समजत गेलं. पर्यावरण संवर्धनाबरोबर कृष्णवर्णीय समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या इसरा हिरसी, एलिझाबेथ वाथुती, ईशा क्लार्क , लिया नमुगेरवे होत्या. एका बाजूला प्लॅस्टिक प्रदूषणानं गिळंकृत केलेल्या निसर्गरम्य बाली परिसरात साऱ्यांचं सहकार्य मिळवत प्लास्टिकमुक्त पर्यावरणासाठी लढा देणाऱ्या मेलाती आणि इसाबेल विजसेन भगिनी, नेदरलँड्समधील लिली प्लाट होती, तर दुसऱ्या बाजूला फारसा कुणाचा पाठिंबा नसताना एकाधिकारशाहीविरुद्ध एकुलता एक आवाज उठवणारी चीनची होई ऑ होती. आदिवासी हक्कांसाठी लढणाऱ्या, पारंपरिकतेबरोबरच आधुनिकतेची कास धरणाऱ्या ऑटम पेल्टिएर, हेलेना गुलिंगा, झिया बस्तिदा होत्या. या सगळ्यांच्यात एक समान धागा होता, तो म्हणजे त्यांची अखंड तळमळ. जागतिक प्रश्नांबरोबर स्थानिक प्रश्नांबद्दलची तळमळ, त्यांचं स्वस्थ न बसणं, व्यक्त होण्यासाठी सतत माध्यम शोधत राहणं, त्यांचं परंपरांवर विश्वास ठेवणं, तर कधी परंपरा मोडून वावरणं. एकटय़ानं शांततेत निषेध करणं, तसंच हजारोंच्या समूहासमोर आवाज उंचावणं.. आणि या सगळ्यापेक्षा महत्त्वाचं होतं, ते त्यांचं तिथं असणं! मुख्य म्हणजे ‘घेतला वसा’ न टाकता काम करत राहणं.

  मुलीच का? लहान मुलीच का? लहान मुलींचा आवाज या लेखांतून विशेष प्रतिध्वनित झाला, कारण स्त्रियांचा आणि पर्यावरणाचा प्राचीन काळापासून चालत आलेला अन्योन्यसंबंध. नवीन काही तरी जन्माला घालण्याची, नवीन काही तरी रुजवण्याची निसर्गातूनच मिळालेली स्वयंभू  शक्ती. मुलगी असण्यामुळे अनेकदा समाजात मिळणारं दुय्यम स्थान, लादली गेलेली बंधनं, तर काही वेळा मिळणारे आदराचे कवडसेसुद्धा. आदिम संस्कृतीचं मातृसत्ताक जगणं आणि पर्यावरण संवर्धन याचा फार जवळचा संबंध आहे. या संबंधातून उमजत गेल्या त्या अनेक देशांतील स्त्रिया. त्यांच्या असण्यातून समजत गेलं पर्यावरण. मुळात भौतिकशास्त्रातील शिक्षण घेतलेल्या माझ्यासाठी हा तसा नवखा विषय. शाळेतील पर्यावरण शिक्षणाचे तास सोडल्यास या विषयाबद्दल जाणून घेण्याचा फारसा संबंध आला नव्हता. मग ओघानं येत गेलं याबद्दल वाचणं. अनेक माध्यमांतून समजून घेत राहणं. हवामानबदल, तापमानवाढ, हरितगृह वायूंचं उत्सर्जन, या सगळ्याची वैज्ञानिक माहिती नीट जाणून घेता घेता, त्यामुळे होणारे बदल, जागतिक हवामान आणि त्याच अनुषंगानं समाजकारणावर पडणारा प्रभाव, हे सगळं

Advertisement

जमेल तितकं समजून घेणं. हवामानबदल परिषदा, पर्यावरणविषयक कायदे, विविध संज्ञा, हे सगळं समजून घेण्यासाठी शिक्षकांची, तज्ज्ञांची, पुस्तकांची मदत झाली. एखाद्या मुलीचा लढा समजून घेताना, तिच्या देशाबद्दल जाणून घेणं, तिथली संस्कृती, स्थानिक वातावरण आणि पर्यावरण संवर्धनाचे त्यांचे लिखित-अलिखित संकेत समजून घेण्यासाठी त्या त्या देशाच्या रहिवासी मित्रमैत्रिणींशी तासन्तास झालेल्या चर्चा खूप काही देऊन गेल्या.

लढा हा फक्त मोर्चे आणि कायदेभंग इतपतच मर्यादित नसतो. संसदेच्या समोर शांततेचा मार्ग पत्करत केलेला सत्याग्रह, नवनवोन्मेषशालिनी प्रतिभेचा वापर करून एखाद्या समस्येचं केलेलं निराकरण, नोंदवलेला प्रतीकात्मक निषेध, हे सर्व लढय़ाचे मार्ग असू शकतात. या लढवय्या पोरींच्या कहाण्या वाचून अनेक ई-मेल प्रतिसाद वर्षभर येत राहिले. शाश्वत विकासासारखा वापरून वापरून गुळगुळीत झालेला शब्द, जो २००७ च्या अकराव्या पंचवार्षिक योजनेपासून भारतात वापरला जातोय, तो अजूनही सर्वाना समजलाय असं वाटत नाही. शाळांमधून पर्यावरण संवर्धन रुजवणं आणि जीवनशैलीत तातडीनं बदल करणं गरजेचं आहे, असे पर्यावरणपूरक ज्ञान देण्याची निकड मांडणारे मेल्स आले. शाळेतील पाठय़पुस्तकांत असलेला स्वच्छतेबाबतचा माहिती देणारा छोटासा परिच्छेद मुलांना प्रत्यक्ष कृतीतून समजावा यासाठी रुग्णालयात स्वच्छता मोहीम राबवून मुलांना कचरा व्यवस्थापनासाठी प्रवृत्त करणाऱ्या एका छोटय़ाशा गावातील शिक्षकाचा ई-मेल आला. एका छोटय़ाशा देशातील मुलीबद्दल लिहिलेला लेख पाहून, ‘माझ्या देशातील या मुलीबद्दल काय लिहिलं गेलंय?’ असं उत्सुकतेनं विचारणाऱ्या आणि त्यासाठी लेखाचा इंग्रजी अनुवाद वाचायला मागणाऱ्या परदेशी तरुणाचा ई-मेल आला. हवामानबदल, जागतिक तापमानवाढ आणि इतर पर्यावरणीय समस्यांची गती कमी करण्यासाठी वैयक्तिक पातळीवर कोणकोणते प्रयत्न करता येतील, हे विचारणारे शाळकरी मुलांचे, मोठय़ांचे ई-मेल आले. या क्षेत्रात आपण कसं योगदान देऊ शकू, याची विचारणा करणारे मेल्स आले. काही प्रतिसाद अभ्यासपूर्ण होते. संवाद साधताना बऱ्याच संकल्पना आणि घटनांचा उलगडा नव्यानं होत गेला आणि त्याकडे पाहायची नवी दृष्टी लाभली, यासाठी त्या संवादकर्त्यांचं आभार. अनेक जाणकार व्यक्तींनी माझ्या चुकाही हक्कानं दाखवून देत ससंदर्भ अवांतर माहिती पुरवली. त्याबद्दल त्यांचीही मी ऋणी आहे.

Advertisement

त्याचबरोबर काही प्रतिसाद जरा गुंतागुंतीचे होते. बऱ्याच जणांचा असा समज झाला होता, की माझा पर्यावरण क्षेत्रातील चळवळीत प्रत्यक्ष सहभाग असून मी या विषयातील तज्ज्ञ असावी. काही विशिष्ट मुलींचा लेखनात उल्लेख केला, याबद्दल टिप्पणी करणारे, लेखांच्या हेतूवर काळजी व्यक्त करणारेही प्रतिसाद आले. या अनुषंगानं इथे नमूद करावंसं वाटतं, की माझा चळवळीत सक्रिय सहभाग नाही अथवा मी कुणी तज्ज्ञही नाही. के वळ जगातल्या वेगवेगळ्या भागांत काम करणाऱ्या या मुलींबद्दलची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं मी हे लेखन केलं. यामागील मुख्य उद्देश होता, तो त्यांचा आवाज जनमानसापर्यंत पोहोचवणं. छोटय़ा मुलीसुद्धा असे प्रयत्न करू शकतात, तर आपण व्यक्तिगत पातळीवरसुद्धा काही तरी केलं पाहिजे, ही भावना जागवणं, हाच यामागचा एकमेव हेतू.

  कानाकोपऱ्यातील या मुलींची, त्यांच्या अगदी नव्या आणि या लेखमालेला बहुतांशी समांतर जाणाऱ्या लढय़ाची माहिती मिळवताना, अतिशय ताजे संदर्भ मिळवणं जरुरीचं होतं. ते मिळवण्यासाठी मुख्यत्वे आंतरजालाचा आणि मोजक्या पुस्तकांचा आधार मी घेतला. साधारण गेल्या दशकापासून पर्यावरण संवर्धन चळवळ जोर धरत आहे. यामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना वेगळं वलय प्राप्त झालं आहे. हे वलय काही वेळा सकारात्मक असतं, तर काही वेळा नकारात्मकसुद्धा. या क्षेत्रात तळमळीनं काम करणाऱ्या व्यक्तींची संख्या जशी खूप आहे, तशी झटपट प्रसिद्धी, राजकीय वलय आणि इतर बऱ्याच गोष्टींचा प्रचंड प्रमाणावर मिळणारा पाठिंबा न पेलता आल्यानं मुख्य उद्देशापासून दूर जात निव्वळ पैसा आणि प्रसिद्धीसाठी या चळवळीचा गैरवापर करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. याचाही अनुभव ही लेखमाला लिहिताना आला. माध्यमांतून मिळणारी माहिती काही वेळा दिशाभूल करणारीही असू शकते. त्यामुळे मिळालेली माहिती खऱ्याखोटय़ाच्या कसोटीवर तपासून पाहण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागले. यात काही वेळा विश्वसनीय समजल्या जाणाऱ्या वृत्तवाहिन्या आणि वेब पोर्टल्सवरून मिळालेली माहितीही दिशाभूल करणारी असल्याचं ऐन वेळी निदर्शनास आलं. इथे मला ‘चतुरंग’च्या संपादकांचे अतिशय मनापासून आभार मानायचे आहेत, की त्यांनी वेळीअवेळी माझ्या चुका सुधारून घेत, माहितीची सत्यासत्यता पडताळून पाहण्यासाठी मदत करत, अप्रस्तुत संदर्भाना गाळणी लावत लेख सकस होण्याची काळजी घेतली आणि लेखनात अनेक पैलूंचा समावेश करण्यासाठी सहाय्य केलं.

Advertisement

 ही लेखमाला इथे संपत असली, तरी विषयाचं गांभीर्य तीव्र होत आहे. तापमानवाढ, वातावरणात वेगानं होणारे बदल, ऋतूंचं बिघडलेलं वेळापत्रक, एकामागून एक येणारी चक्रीवादळं, पूर, अवकाळी पाऊस, या हवामानबदलाच्या एकत्रित परिणामांची झळ सामान्य माणसाच्या उंबऱ्यापर्यंत पोचली आहे. नुकत्याच झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या हवामानबदल परिषदेत या कारण-परिणामांचा ऊहापोह झाला. नेहमीप्रमाणे या मंथनातून हाती काही फार मोठं लागलं असं नाही. ठराव, मागण्या, आश्वासनं यांच्या आंतरराष्ट्रीय भाऊगर्दीत स्थानिक पातळीवर रुजवण्यासाठी सुलभ असे बदल तिथपर्यंत पोहोचले असतील का? लोकांपर्यंत या विषयाचं गांभीर्य सोडा, निदान या समस्या अस्तित्वात आहेत, हेच मुळात पोहोचलं असेल का? एक माणूस म्हणून वैयक्तिक आणि सामाजिक, आर्थिक असे सारे उत्कर्ष मनोभावे इच्छिता, पर्यावरणाची आणि पर्यायानं पुढच्या पिढय़ांची काळजी आपल्या मनाला खरोखरच सतावते आहे का? 

खरंच आपल्याला काळजी आहे का?

Advertisement

‘डू वी केअर?’

(सदर समाप्त)

Advertisement

[email protected]

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

AdvertisementSource link

Advertisement