‘ग्रे वॉटर’- म्हणजेच शॉवर, आंघोळीसाठी वापरलं गेलेलं पाणी किं वा कपडे धुण्यासाठी वापरलं गेलेलं पाणी.
|| सिद्धी महाजन
पृथ्वीवरील सर्वांत महत्त्वाच्या जीवनस्रोताचं, पाण्याचं संरक्षण करण्यासाठी कॅलिफोर्नियामध्ये राहाणारी चौदा वर्षांची श्रेया प्रयत्नशील आहे. रिठ्याचा वापर केलेलं ‘ग्रे वॉटर’ वा पुनर्वापर करता येणारं पाणी झाडांसाठी, तसंच स्वच्छतागृह स्वच्छ ठेवण्यासाठी सुरक्षितपणे वापरता येऊ शकतं, हे तिनं वैज्ञानिक आधारावर शोधून काढलं. श्रेया आज या संदर्भात विविध कार्यशाळा घेते आहे. आतापर्यंत ९०हून अधिक शाळांमध्ये राबवण्यात आलेला ‘ग्रे वॉटर’ अभ्यासक्रम तिनं विकसित केला आहे. तिच्या कामाचं महत्त्व ओळखून तिला जागतिक प्रतिष्ठेचे ‘चिल्ड्रन्स क्लायमेट प्राइझ’ आणि ‘ ग्लोरिया बॅरन प्राइज फॉर यंग हिरोज’ हे दोन पुरस्कार देण्यात आले आहेत. या वसुंधरेच्या लेकीचं, श्रेया रामचंद्रनचं नाव एका लघुग्रहालाही देण्यात आलं आहे. तिच्याविषयी…
गेल्या वर्षी, २०२० च्या सुरुवातीला कॅलिफोर्नियामध्ये राहाणाऱ्या एका चौदा वर्षांच्या मुलीच्या आई-वडिलांना एक ‘व्हॉईस मेल’ मिळाला. ‘एनबीसी डेटलाइन’ या प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधींनी त्या मुलीविषयी छापून आलेला एक लेख वाचला होता. त्यांना ते तयार करत असलेल्या एका पर्यावरणविषयक लघुपटासाठी तिची मुलाखत घ्यायची होती. तिच्या आई-वडिलांना पहिल्यांदा ही चेष्टा वाटली. मात्र कॅमेरा आणि इतर साहित्य घेऊन प्रसारमाध्यमाची टीम त्यांच्या दारात उभी ठाकली तेव्हा त्यांना त्यावर विश्वास ठेवण्याशिवाय गत्यंतर उरलं नाही. कोण होती ही मुलगी? असं काय केलं होतं तिनं, ज्यामुळे तिची दखल माध्यमांना घ्यावीशी वाटली? या मुलीचं नाव होतं श्रेया रामचंद्रन!
पृथ्वीवरील सर्वांत महत्त्वाच्या जीवनस्रोताचं, म्हणजे पाण्याचं संरक्षण करण्यासाठी भारतीय वंशाची श्रेया प्रयत्नशील आहे. तिचं काम आजच्या काळात महत्त्वाचं आहेच, पण येणाऱ्या काळात जेव्हा पाण्याचा अभाव ही जगातील मुख्य समस्या म्हणून गणली जाईल, तेव्हा तिच्या कामाला अतोनात महत्त्व येणार आहे. तिच्या कामाचं महत्त्व ओळखून तिला गेल्या वर्षीचा- २०१९ चा ‘चिल्ड्रन्स क्लायमेट प्राईझ’ हा पुरस्कार देण्यात आला. १२ ते १७ वर्षं वयोगटातल्या, हवामानबदलाविरोधात आणि पर्यावरणाच्या क्षेत्रात आगळंवेगळं काम करणाऱ्या मुलांना दिला जाणारा हा जागतिक प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे. या पुरस्काराचं स्वरूप एक लाख स्विडीश क्रोना (सुमारे ११ हजार अमेरिकन डॉलर्स). त्याआधी २०१८ मध्ये तिला ‘ ग्लोरिया बॅरन प्राईज फॉर यंग हिरोज’ हाही १० हजार अमेरिकन डॉलर्सचा पुरस्कार देण्यात आला होता.
जागतिक प्रतिष्ठेचे हे पुरस्कार मिळण्यामागे असणारी श्रेयाची भविष्यकालीन परिस्थितीचा वेध घेण्याची दृष्टी, त्यासाठी के लेले प्रयत्न आणि ते सर्वदूर पसरण्यासाठी के लेली मेहनत याची माहिती करून घ्यायला हवी. श्रेया रामचंद्रनचं कुटुंब मूळचं भारतातलं. तिचं बालपण कॅलिफोर्नियामध्ये गेलं. तिथल्या सेंट्रल व्हॅलीमधील टुलारी कन्ट्री या खेडेगावाला भेट दिल्यावर तिला समजलं, की दुष्काळी जमीन, कोरडं हवामान आणि अधेमध्ये पडणारा पाऊस, यामुळे तिथे पाण्याचं दुर्भिक्ष सातत्यानं जाणवत आहे. तिथल्या रहिवाशांना पाण्याच्या दैनंदिन वापराचं घरटी काटेकोर नियोजन करावं लागत आहे. सुट्टीसाठी भारतात आल्यावर तिला इथेसुद्धा वेगळी परिस्थिती नसल्याचं पाहून सखेद आश्चर्य वाटलं. भारतासारख्या बहुतेक भागांमध्ये प्रचंड पाऊस पडणाऱ्या देशातही लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावं लागतं, शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी उपलब्ध नसल्यानं शेती आणि गाव सोडून शहरात नोकरीच्या शोधात वणवण भटकावं लागतं, हे पाहून तिला परिस्थितीचं गांभीर्य थोडं थोडं समजायला लागलं होतं. तिच्या आईनं आपल्या लहानपणी कसं तासन्तास रांगेत उभं राहून पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत असे, त्याच्या गोष्टी श्रेयाला सांगितल्या होत्या. या सगळ्याची कल्पना करणंही तिला नकोसं वाटत होतं. सामान्य लोकांच्या व्यथेचं चित्र डोळ्यासमोर आणून तिचा जीव तीळ तीळ तुटत होता. तेव्हा तिचं वय होतं अवघं ११ वर्षांचं.
याच मन:स्थितीत श्रेया कॅलिफोर्नियात परतली आणि तिनं पावसाचं पाणी साठवण्याच्या वेगवेगळ्या पारंपरिक आणि आधुनिक पद्धतींवर संशोधन करायला, त्यांची माहिती जमवायला सुरुवात केली. पण हळूहळू तिला कळून चुकलं, की दुष्काळग्रस्त भागांमध्ये पुनर्वापरासाठी पावसाचं पाणी साठवणं शक्य नाही, कारण जर पाऊसच कमी पडत असेल, तर तुम्ही पुरेसं पाणी साठवून ठेवू शकत नाही. मग पाणी वाचवण्यासाठी अन्य पर्याय कोणते? अन्य कोणत्या पद्धतीनं आपण त्याचा पुनर्वापर करू शकतो? अधिक माहिती शोधताना एका विषयानं तिचं लक्ष वेधून घेतलं. पाण्याचे वापरानुसार तीन प्रकार केले जातात. पहिला प्रकार म्हणजे ‘व्हाईट वॉटर’ किंवा शुद्ध पाणी. दुसरा प्रकार हा
‘ग्रे वॉटर’- म्हणजेच शॉवर, आंघोळीसाठी वापरलं गेलेलं पाणी किं वा कपडे धुण्यासाठी वापरलं गेलेलं पाणी. तिसरा प्रकार आहे ‘ब्लॅक वॉटर’- म्हणजे स्वच्छतागृह/ शौचालयातलं सांडपाणी. यातील ‘ग्रे वॉटर’ची खासियत म्हणजे याचा आपण दोनदा वापर करू शकतो. एकदा वापरलेलं हे पाणी दुसऱ्यांदा टॉयलेट स्वच्छ करण्यासाठी वापरात आणलं जाऊ शकतं, झाडांना पाणी घालण्यासाठी वापरलं जाऊ शकतं. ही कल्पना आणखी चांगल्या पद्धतीनं राबवली जाण्यासाठी तिनं ‘लॉण्ड्री टू लॉन्स’ अशी एक योजना तपासून पाहिली. पण लवकरच तिच्या लक्षात आलं, की कपडे धुण्यासाठी आणि आंघोळीसाठी वापरल्या जाणाऱ्या साबणामध्ये हानीकारक रसायनांचा वापर केला जातो. ही रसायनं पिकांवर आणि मातीच्या सुपीकतेवर गंभीर परिणाम करू शकतात. माणसाच्या आरोग्यावर हानीकारक परिणाम करू शकतात. मग यांना पर्याय काय?
दरम्यान, श्रेयाला अशा एका वनस्पतीविषयी कळलं, जी अद्याप दुर्लक्षितच राहिली होती. त्याचं नाव रिठा (Sapindus mukorossi) भारतात प्राचीन काळापासून स्वच्छतेसाठी रिठ्याचा वापर केला जातो. त्याची झाडं भारत आणि नेपाळमध्ये आढळतात. श्रेयानं रिठ्यावर आणि स्वच्छतेसाठी रिठा वापरल्यावर निर्माण झालेल्या ‘ग्रे वॉटर’वर खूप संशोधन केलं. चार वर्षं अविरत संशोधन केल्यावर तिनं शंभर वेगवेगळ्या झाडांवर त्याचे प्रयोग केले.
‘ग्रे वॉटर’चे झाडांच्या वाढीवर होणारे परिणाम, मातीतील खनिज घटकांवर होणारे परिणाम, यांची ती सतत नोंद घेत होती. त्यासाठी तिनं आपल्या घराच्या मास्टर बेडरूमचं रूपांतर चक्क ग्रीनहाऊसमध्ये केलं होतं.
सातवीत शिकणाऱ्या श्रेयानं आपल्याजवळ जमलेल्या वेगवेगळ्या निरीक्षणांच्या आकडेवारीचं विश्लेषण करण्यासाठी संख्याशास्त्राचा (स्टॅटिस्टिक्स) अभ्यास सुरू केला. तिच्या घरापासून ५५ मिनिटांवर सांता कलारा या ठिकाणी एका प्रयोगशाळेत तिला तिच्या झाडांसाठी हवी तशी जागा मिळाली. तिथे तिनं सुट्टीच्या दिवशी आपले प्रयोग चालू ठेवले. मातीतील पोषक तत्त्वांचा आणि जिवाणूंचा मागोवा घेतला आणि ‘इ कोलाय’ या मानवी आरोग्यावर परिणाम करणाऱ्या सूक्ष्मजीवाच्या वाढीवर बारीक नजर ठेवली. रिठ्याचा वापर केलेलं पाणी झाडांसाठी, तसंच स्वच्छतागृह स्वच्छ ठेवण्यासाठी सुरक्षितपणे वापरता येऊ शकतं, हे तिनं वैज्ञानिक आधारावर शोधून काढलं.
आता वेळ आली होती हे प्रयोग लोकांसमोर घेऊन येण्याची. ‘ग्रे वॉटर’च्या पुनर्वापराबद्दल समाजामध्ये जागृती निर्माण करण्याची. श्रेयानं स्वत: ‘ग्रे वॉटर प्रोजेक्ट’ या ‘ना-नफा’ तत्त्वावरील आस्थापनेची मुहूर्तमेढ रोवली.
‘ग्रे वॉटर’ किंवा पुनर्वापरासाठी योग्य पाणी वाहून नेण्यासाठी आवश्यक प्रणाली कशी बांधायची, याबद्दल लोकांना मार्गदर्शन केलं. प्राथमिक वर्गातील मुलांना जलसंवर्धनाची माहिती व्हावी, यासाठी रिठ्यावर आधारित ‘ग्रे वॉटर’च्या वापरावर लहान मुलांसाठी आणि शिक्षकांसाठी पाठ्यक्रम तयार करायला हातभार लावला. ती शाळा, ग्रंथालयं आणि कॉर्पोरेट कार्यक्रमांमध्ये कार्यशाळा घेते. आतापर्यंत ९०हून अधिक शाळांमध्ये राबवण्यात आलेला ‘ग्रे वॉटर’ अभ्यासक्रम तिनं विकसित केला आहे.
फ्रेमोंट शहरामधील शाश्वत पर्यावरण विकास आयोगाची श्रेया सर्वांत लहान सदस्य आहे. रिठ्याच्या बिया वापरून निर्माण झालेलं
‘ग्रे वॉटर’ पुनर्वापर करण्यायोग्य कसं बनवायचं, याबद्दलच्या तिच्या संशोधनानं ‘चिल्ड्रन्स क्लायमेट प्राईझ’ या पुरस्काराच्या निवड समितीचं लक्ष वेधून घेतलं. तिच्या या अभिनव प्रणालीमुळे सामान्य घरांत वर्षभर वापरल्या जाणाऱ्या एकूण ७३ हजार गॅलन एवढ्या पाण्याचा, बागा आणि झाडांसाठी उपयोग करता येऊ शकेल, असं त्यांचं म्हणणं होतं. ‘गूगल सायन्स फेअर’ या जागतिक स्पर्धेच्या अंतिम स्तरावर पोचलेल्या पहिल्या २० स्पर्धकांमध्ये तिचा समावेश होता. तसंच इंटेल आयएसईएफ (इंटरनॅशनल सायन्स अॅण्ड इंजिनीअरिंग फे अर) या जागतिक स्पर्धेत तिनं तिसरा क्रमांक पटकावला.
२०२० मध्ये ‘कॅलिफोर्निया लाइफ सायन्स इन्स्टिट्यूट’नं आयोजित केलेल्या ‘बे एरिया बायोजीनियस चॅलेंज’ची श्रेया विजेती ठरली. या स्पर्धेत जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील उत्तम संशोधनाची आणि नवनिर्मितीची दखल घेऊन त्यांच्याशी संबंधित संशोधकांना सन्मानित केलं जातं.
एखाद्या प्रश्नाची उकल करण्यासाठी प्रयोग करणं, प्रयोगाचं निरीक्षण करणं, निष्कर्ष काढणं आणि अथक प्रयत्न करून कठीण कोडं सोडवणं या पायऱ्या आहेत. एखाद्या न सुटणाऱ्या कोड्याची उकल करण्यासाठी या शास्त्रशुद्ध वैज्ञानिक दृष्टिकोनाकडे आजच्या तरुण पिढीचा कल दिसून येतो. या सगळ्यापेक्षा एक मोठी गरज असते, ती त्याचा समाजाला काही उपयोग होत आहे का, हे पाहाण्याची. श्रेयाच्या या सर्व उपद्व्यापातून पर्यावरणाविषयी संवेदनशीलता दिसून येते. आपल्या संशोधनामधून पर्यावरणाची होणारी हानी थांबवण्यासाठी काही तरी निर्माण करणं गरजेचं आहे, ही भूमिका दिसून येते आणि ती आजच्या काळात फार महत्त्वाची आहे.
ती लोकांना ‘ग्रे वॉटर’चा पुनर्वापर करण्याच्या सर्वोत्तम पद्धती काय आहेत त्या समजावते. ‘तुम्ही वापरत असलेल्या डिटर्जंट्समुळे पाण्याचा पुनर्वापर सहसा सुरक्षित नसतो,’ हे ती त्यांना सांगते. ‘माझं अंतिम ध्येय आहे, ‘ग्रे वॉटर’चा पुनर्वापर हा कागद किंवा प्लास्टिकच्या पुनर्वापरासारखाच नेहमीच्या आयुष्यात सरावाचा करणं,’ असं श्रेया सांगते.
तिला अनेक पुरस्कार मिळाले आहेतच, पण वरील सर्वांपेक्षा मोठा असा एक बहुमान श्रेयाला प्राप्त झालाय, जो कायम टिकून राहील. ‘एम.आय.टी.’मधील लिंकन प्रयोगशाळेनं एक लघुग्रहांची मालिका शोधून काढली. तिला नाव कोणतं द्यावं, असा प्रश्न त्यांना पडला होता. ‘ब्रॉडकॉम् मास्टर्स’ या विज्ञान आणि गणितातील नवनिर्मितीला चालना देणाऱ्या स्पर्धेत संपूर्ण अमेरिके त अव्वल ठरलेल्या दोन विजेत्यांची नावं या लघुग्रहांना द्यावीत, असं शेवटी ठरवण्यात आलं. सतरा वर्षांच्या श्रेया रामचंद्रननं आपल्या बुद्धिमत्तेचा, चिकित्सक वृत्तीचा वापर करत बदल घडवण्यासाठी अथक श्रम केले. तिनं आपल्या कार्याच्या कक्षा आखून घेतल्या आणि बरीच वर्षं त्यावर मार्गक्रमण करत राहिली. कोणत्याही मानसन्मानाची अपेक्षा न ठेवता एवढा मोठा पल्ला आज तिनं गाठला आहे. तिच्या या कार्याला सलामी देण्यासाठीच म्हणून की काय, पण आज दूरवर एक छोटासा लघुग्रह कोणताही गाजावाजा न करता, गूढ अशा अंतराळात आपल्या कक्षेत गुपचूप फिरतो आहे. त्याचं नाव आहे- ‘33188 Shreyal
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.