वनमहोत्सव : पर्जन्यवनात चित्रांचाच पाऊस!विनायक परब [email protected]

Advertisement

मोगाजे गुईहूचे कुटुंब राहायचे कोलंबियातील अ‍ॅमेझॉनच्या पर्जन्यवनात काहुइनारी नदीकिनारी. फक्त गुईहूच नव्हे तर मुय्नाने या त्यांच्या जमातीचा अ‍ॅमेझॉनमधील वर्षांवने हाच अधिवास होता. वर्षांवने हा जगभरच्या जंगलातील एक भन्नाट प्रकार. इकडचे विश्वच खूप वेगळे. अनेक भटक्यांना आस असते ती अ‍ॅमेझॉनच्या वर्षांवनांना भेट देण्याची आणि तेथील वन्यजीवन समजून घेण्याची. अगणित किडे, कीटक, सरिसृप, उभयचर आणि वन्यप्राणी यांचे नंदनवन म्हणजे अ‍ॅमेझॉनचे वर्षांवन. मात्र जगभरच्या जंगलांवर आलेली संक्रांत ही आता अ‍ॅमेझॉनच्या या वर्षांवनांपर्यंतही पोहोचली आहे.

१९८० साली एका बाजूला या वनांवर अधिक्रमण करणारेही इथे पोहोचले आणि त्याचवेळेस कोलंबियातील रिव्होल्युशनरी आर्मड् फोर्सेस ऑफ कोलंबिया हे उठाव करणारे दलही पोहोचले. या उठाव दलाने ही वर्षांवने काबीज केली आणि या जमातींना बाहेर हाकलले. तेव्हापासून गुईहू कोलंबियाची राजधानी असलेल्या बगोटामध्ये राहातो. त्याच्या पुढच्या पिढीला तर वर्षांवनांचा अनुभवच नाही. वर्षांवनात राहणे म्हणजे बारा महिने चोवीस तास केवळ आणि केवळ निसर्गाचाच सहवास. पाऊसधारांमध्येच सकाळ, संध्याकाळ आणि रात्रही. सोबत दिवसकिडे आणि रातकिडय़ांचीही सततची किरकिर. पक्ष्यांची- प्राण्याची साद आणि हेच जीवन. २४ तासांचा हा निसर्गसहवास म्हणजे एक वेगळ्या प्रकारची आध्यात्मिक अनुभूतीच!

Advertisement

गुईहू बोगोटामध्ये राहायला आल्यानंतर त्याने आबेल रॉड्रिग्ज हे नाव धारण केले. याच सुमारास जगभरातील काही वनस्पतीतज्ज्ञांनी अ‍ॅमेझॉनच्या जंगलातील अस्तंगत होत असलेला आणि गमावलेल्या निसर्गसंपन्न वारशाचा दस्तावेज करण्याचा निर्णय घेतला. पण या वर्षांंवनांवर फारसे काम झालेले नव्हते, त्यामुळे जे गमावले ते कसे कळणार हा प्रश्न होता.  बिगरसरकारी संस्था असलेल्या ट्रोपेन्बॉस इंटरनॅशनलच्या कोलंबिया शाखेने या संशोधनासाठी पुढाकार घेतला आणि अ‍ॅमेझॉनमधून हाकलल्या गेलेल्या आबेलपर्यंत ते पोहोचले. त्याने दिलेल्या माहितीचे दस्तावेजीकरण करताना त्यांना लक्षात आले की, आबेलची नजर ही संशोधकाची असून तो कोणताही बारकावा दुर्लक्षित करत नाही. सगळे काही आजही त्याच्या नजरेसमोर आहे. अगदी झाडाच्या, वृक्षाच्या आकारापासून ते त्याच्या पाना-फुला-फळांच्या आकारापर्यंत आणि कोणत्या वृक्षावर किंवा झाडावर कोणते कीटक येतात, कोणते येत नाहीत इथपासून ते त्या कीटक आणि किडय़ांच्याही आकारापर्यंत सारे काही. एखाद्या संशोधकाने केवळ नजरेनेच प्राणी- कीटक- वृक्ष आदींचे बारकाव्यासह निरीक्षण करून त्याची काटेकोर नोंद करावी अगदी तसेच.

आबेलच्या नजरेने वर्षांवनांचे सौंदर्य त्यांच्या शास्त्रीय नोंदीसह टिपलेले होते. त्याचा काकादेखील त्याच्या जमातीमध्ये जंगलांमधील ‘साबेदोर’ अर्थात ‘जंगलांमधील ज्ञानी’ म्हणून ओळखला जायचा. काकांकडून हा देखील भरपूर काही शिकला आणि त्याने स्थानिक भाषेत त्यांच्या गुणवैशिष्टय़ांवरून झाडांना नावेही ठेवली. त्यामुळेच काकाप्रमाणेच आबेलही ‘एल नोम्ब्रादोर दी प्लान्टास’ म्हणजेच ‘झाडांचे स्थानिक नामकरण करणारा’ म्हणून ओळखला जातो.

Advertisement

अखेरीस या प्रकल्पांतर्गत ट्रोपेन्बोसने आबेलच्या हाती रंगीत पेन्सिल्स दिल्या, जलरंग दिले आणि त्यातून वर्षांंवनांचे शास्त्रीय सौंदर्य कागदावर उतरले.. चित्रांचाच पाऊस पडला. ही सर्वच्या सर्व चित्रे ही शास्त्रीय होती. त्याच्या शास्त्रीय नोंदी करण्यमत आल्या. त्यात त्या त्या झाडांवर तिथे येणारे कीटक, पक्षी हेच दर्शविण्यात आले होते. त्यातून काही अस्तंगत झालेल्या प्रजातींचाही उलगडा संशोधकांना झाला. या चित्रांचे प्रदर्शन आता कोविडकाळात इंग्लंडमधील बाल्टिक सेंटर फॉर कन्टेम्पररी आर्टने ऑनलाइन भरविले आहे. त्याच्या ऑनलाइन कॅटलॉगमध्ये आबेल म्हणतो, रात्र रात्र जागून हे जंगल अनुभवले ते डोळ्यांनी आणि कानांनी. कानातच प्राण आणून ऐकलेले जंगल आजही निनादत असते.. जंगल जगणे हा माझा आध्यात्मिक अनुभवच होता. याच अनुभवाची अनुभूती आपल्याला ही चित्रेही देतात. अ‍ॅमेझॉनची अस्तंगत झालेली वर्षांवने पुन्हा एकदा अनुभवण्याची संधी आपल्या सर्वांनाच आता कोविडकाळात ऑनलाइन मिळाली आहे. ती दवडू तर नकाच, पण सध्या १ ते ७ जुलै या देशभरात सुरू असलेल्या वनमहोत्सवाच्या कालखंडात अवश्य अनुभवा!

(ऑनलाइन प्रदर्शनासाठी –

Advertisement

http://balticplus.uk/abel-rodriguez-e785/)

@vinayakparab

Advertisement

 

The post वनमहोत्सव : पर्जन्यवनात चित्रांचाच पाऊस! appeared first on Loksatta.

AdvertisementSource link

Advertisement