छत्रपती संभाजीनगर29 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
फुलंब्रीच्या पाल येथील एचएसजे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात कनिष्ठ जाधव इलेव्हन संघाने मोठा विजय मिळवला. मंगळवारी झालेल्या लढतीत जाधव इलेव्हनने रोहन क्रिकेट क्लब, लातूर संघावर 54 धावांनी मात केली. या लढतीत अर्थव बोडखे सामनावीर ठरला.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना कनिष्ठ जाधव इलेव्हनची सुरूवात खराब झाली. सलामीवीर जोडी प्रीत व कारक भोपळाही फोडू शकले नाहीत. प्रितम शिंदेने 58 चेंडूंत 1 चौकारासह 13 धावा केल्या. आरवने 14 धावा जोडल्या. कर्णधार अर्थव बोडखेने 62 चेंडूंत 8 चौकार खेचत सर्वाधिक 38 धावा काढल्या. स्वराज चिटणीसने 30 चेंडूंत 3 चौकार लगावत 22 धावांचे योगदान दिले. किओन डिकने 34 चेंडूंत 1 चौकार मारत 1 धावा जोडल्या. इतर फलंदाजांनी निराशा केली. लातूरकडून निवृत्ती भोळेने 11 धावा देत 3 गडी बाद केले. अवधुत पाटीलने 28 धावांत 3 बळी घेतले. वेदांत हाकेने २ आणि आदित्य कोल्हेने एकाला टिपले.
अर्थवची भेदक गोलंदाजी
प्रत्युत्तरात, अर्थव बोडखेच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर रोहन क्रिकेट क्लबचा डाव 30 षटकांत 76 धावांवर संपुष्टात आला. यात कर्णधार सौरभ भुजबळ अवघ्या 5 धावांवर बाद झाला. वेदांत हाके 7 धावावर परतला. आदित्य कोल्हेने 12 धावा केल्या. मंथन सोनवणेने 11 चेंडूंत 4 चौकारांसह सर्वाधिक 20 धावा काढल्या. त्यांचे तिन फलंदाज भोपळाही फोडू शकले नाहीत. इतर एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. संघाला 18 धावा अतिरिक्त मिळाल्या. जाधवकडून अर्थव बोडखेने 24 धावा देत 6 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. किओन डिकने 2 गडी बाद केले.