पुणे12 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ वकील श्रीकृष्ण काशिनाथ पाषाणकर यांचे वृद्धापकाळाने बुधवारी निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. शिवाजीनगर येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बुधवारी दुपारी वैकुंठ स्मशानभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
ऍड श्रीकृष्ण पाषाणकर यांनी ६० वर्षापेक्षा जास्त काळ पुण्यातील दिवाणी न्यायालयात वकिली केली. वकिल वर्गात आणि आप्तेष्टांमध्ये त्यांची काका म्हणून ओळख होती. ऍड. श्रीकृष्ण पाषाणकर यांच्या पाठीमागे पत्नी मंगला पाषाणकर, मुलगा ऍड संजीव पाषाणकर, अमेरिकास्थित बालरोग तज्ञ् डॉ. दिनेश पाषाणकर, मुलगी सुजाता यादव, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
श्रीकृष्ण काशिनाथ पाषाणकर हे तब्बल सहा दशकांहून अधिक काळ ते वकिली व्यवसायात होते. आयएलएस लॉ कॉलेज मधून त्यांनी वकिलीचे शिक्षण घेतले. त्यानंतर अप्पासाहेब देशपांडे यांचे ज्युनियर म्हणून त्यांनी वकिली व्यवसायाला सुरुवात केली होती. दिवाणी दाव्यातील निष्णात वकिल म्हणून त्याची ओळख होती. वयाच्या ८५ ते ८६ व्या वर्षापर्यंत ते स्वतः न्यायालयात सुनावली उभे राहत होते किंवा ऐकला जात होते. अत्यंत मनमिळावू वकील म्हणून श्रीकृष्ण पाषाणकर पुण्यात प्रसिद्ध होते. विरोधी पक्षाचे वकील सुद्धा त्यांच्याकडे सल्ला घ्यायला येत असे. वकिली क्षेत्रात अजात शत्रू म्हणून ते ओळखले जात.
इलेक्शन पिटिशन, घरमालक आणि भाडेकरू, मृत्यूपत्र या संदर्भातील खटले श्रीकृष्ण पाषाणकर यांच्या आवडीचे विषय होते. इंशुरन्स कंपन्या, शैक्षणिक संस्था, कृषी बाजार उत्त्पन्न समिती अशा अनेक संस्थांवर ते सल्लागार म्हणून काम करत होते. त्यांनी अनेक खटल्यात त्यांनी यशस्वी कामगिरी बजावली. भाडेकर कायद्यातील तज्ञ् अशी त्यांची विशेष ओळख होती.श्रीकृष्ण पाषाणकर यांच्या मार्गदर्शनखाली २०० पेक्षा जास्त वकील घडले आहेत. तर त्यांच्या मार्गदर्शनखाली काम केलेले काही वकील हे पुढील उच्च न्यायालयात न्यायाधीश, जिल्हा न्यायाधीश, जिल्हा सरकारी अशा पदावर गेले.