मुंबईएका तासापूर्वी
- कॉपी लिंक
डोंबिवली काँग्रेस कमिटीच्या वतीने ‘हात जोडो अभियान’ व एका पुरस्कार कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह स्थानिक नेते मंडळी तब्बल अडीच तास उशिरा पोहोचले. या कार्यक्रमास खासदार कुमार केतकर हे देखील उपस्थित होते.
कार्यक्रमाला सुरूवात होताच कुमार केतकरांनी उशीरा आलेल्या नेत्यांचे कान टोचले. यावेळी बोलताना केतकर म्हणाले की, काँग्रेस पक्ष हा पंडित जवाहरलाल नेहरू व इंदिरा गांधी यांचा पक्ष आहे. हे दोन्ही नेते कुठल्याही कार्यक्रमाला कायम वेळेवर हजर होत असत.
पुढे बोलताना केतकर म्हणाले की, पंडित नेहरू आणि इंदिरा गांधींची लोकप्रियता नक्कीच नाना पटोले आणि कुमार केतकर यांच्यापेक्षा जास्त होती. तरी देखील ते प्रत्येक ठिकाणी वेळेवर यायचे. त्यामुळे याच्यापुढे कायम वेळ पाळावी लागेल. नाहीतर 2024 मध्ये मोदींचं सरकार येईल आणि त्याच्यानंतर आपण दोन तासांनी पोहोचू. असे बोलतं खासदार केतकर यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि स्थानिक नेत्यांचे कान टोचले.
2024 ची निवडणूक लढायची असेल तर वेळ पाळा
खासदार कुमार केतकर म्हणाले, २०१४ ला असा टाईम टेबलचा घोटाळा करून चालणार नाही. २०२४ ची निवडणूक आपल्याला जिंकायची असेल तर आपल्याला आजपासून दररोज टाईम टेबल पाळावं लागेल. ज्यांनी आयुष्यभर काँग्रेसच्या शपथा घेतल्या ते सगळे काँग्रेस पक्ष सोडून गेले. आपल्यापैकी कोणी सोडून गेलं नाही, आपल्या कोणाच्याही घरी ईडी, सीबीआयवाले आले नाहीत कारण आपण काही केलेलं नाही.