‘लुकलुकती दूर दिवे गावामधले..’महेश एलकुंचवार यांचे बालपण संपूर्णपणे लताबाईंच्या आवाजाने भारलेले व भरलेले होते. त्यांचे सर्व भावनिक पोषण झाले, अभिरुची घडली ती त्यांच्यामुळे. हे सारे त्यांच्या एका ललितबंधात सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. त्यातला हा छोटासा भाग..

Advertisement

आ म्ही मग ओढय़ात पाय सोडून बसलो असताना मी म्हणालो, ‘‘ए निम्मी निम्मी, किती सुंदर आवाज आहे तुझा! असं वाट्टं की माझ्या मनातलं सगळं कळल्यासारखंच तू गातेस.’’ त्यावर निम्मीनं डोळे विस्फारून म्हटलं, ‘‘म्हंजे? तुला माहीत नाही?’’ मी म्हटलं की काय? तर ती म्हणाली, ‘‘अरे, गाण्यातला तो आवाज माझा नाही काही. मी फक्त ओठ हलवते. गाणारी दुसरीच आहे.’’ मी म्हटलं, ‘‘थापा. दुसरीच आहे तर दिसत कशी नाही मग?’’ निम्मी म्हणाली की, अरे, मलाच दिसत नाही ती, तर तुला काय? ती अदृश्य देवताच आहे बाबा. निम्मीनं ‘द्येवता’ म्हटलं नाही म्हणून मला बरंच वाटलं. मी पुढे विचारलं की, ती मुलगी कोणाला म्हणजे कोणालाच दिसत नाही? निम्मी म्हणाली, ‘‘माहीत नाही बाई मला. पण मला नाही दिसली कधी. एको आहे ती.’’ मी म्हटलं, ‘‘तिचं नाव एको आहे?’’ ‘‘नाही रे बाबा. लता नाव आहे तिचं. पण ती एकोसारखीच आहे.’’ तिनी मग मला एकोची गोष्ट सांगितली, की नार्सिसस म्हणून एक सुंदर मुलगा होता. तो सारखा तळ्यात बघत बसायचा स्वत:ला. एको नावाच्या सुंदर मुलीचं प्रेम होतं त्याच्यावर. तर तिलासुद्धा विसरून तो बघतच बसायचा स्वत:चं प्रतिबिंब. तहानभूकजेवण विसरून. मग तो मेला त्यात. त्यामुळे एको दु:खानी इतकी वेडीपिशी झाली की ‘नार्सिसस, नार्सिसस’ अशा हाका मारत ती रानोमाळ भटकत राली. पायांत काटेकुटे, कपडे फाटून चिंध्या झालेले अन् उपाशी. त्यातच मग तिचं शरीर झिजून झिजून नाहीसं झालं तरी तिचा दु:खी आवाज मात्र घुमतच राला सगळीकडे. निम्मी म्हणाली, ‘‘लताजी की आवाज सुन के ऐसा लगता है की यही वह एको है. कितना दर्द! लगता है सारी दुनिया के गम पी लिए है उन्होंने और पुकार रही है अल्लाह को. अल्लाह उन्हें सलामत रखे.’’ पुन्हा डोळ्यातून एकच टपोरा अश्रू. पण माझं आता तिकडे लक्षच नव्हतं. तो आवाज निम्मीचा नाही म्हटल्यावर तिच्यातनं काहीतरी, खरं म्हणजे खूपच काहीतरी नाहीसं झालं असं मला वाटलं. मी विचार करत बसलो की कोण असेल ही? कुठे असेल? आपल्याला दिसेल? तापीताईचा आवाज प्राणहरण करणारा, तर हिचा प्राणरक्षण करणारा. कधी कधी झोपेतसुद्धा आपल्याला निम्मीऐवजी हिचाच आवाज ऐकू येतो. एक-दोनदा तर झोपेतच असताना हा आवाज ऐकू येऊन मी जागा झालो तर माझे डोळे गळत होते. मी कासावीस झालो. मग न राहवून, तिच्यातला आपला इंटरेस्ट कमीच झालाय हे न दाखवता मी निम्मीला म्हटलं की, चल, आपण शोधू तिला. रानावनांत तर रानावनांत, उपाशी तर उपाशी, पण शोधू चल. वाटलं तर मी गाणं म्हणतो म्हणजे एकोपण म्हणेल.

मग ‘कहाँ हो कहाँ मेरे जीवनसहारे, तुम्हें दिल पुकारे’ असं म्हणत मी एकटाच रानोमाळ फिरत रालो. कश्शाची पर्वा नाही असा. आणि मग अचानक एका झाडाला टेकून एक लहानशी मुलगी मला दिसली. सावळी, लांब लांब दोन वेण्या, पांढरीशुभ्र साडी. माझ्या पावलांचा आवाज ऐकून तिनं डोळे उचलून नुस्तं पालं माझ्याकडे स्थिरपणे- न् बापरे! माझी नजरच खाली गेली. असलं तेज! तिच्याजवळ जाऊन काही बोलणं शक्य तरी होतं का? तर नाहीच. कारण दिसत नसलं तरी तिच्याभोवती होतंच एक वर्तुळ- की जे ओलांडणं आपल्याला अशक्यच. म्हणजे लक्ष्मणरेषा ओलांडताना रावणाचं जे होईल तेच आपलं होईल. मी आपला खिळल्यासारखा उभा जागच्या जागी. मागे नाही की पुढे नाही. मग खूप वेळानी ती मुलगी म्हणाली, ‘‘कोण रे तू? हरवलायस का जंगलात?’’ मी म्हटलं की, हो वाटतं. त्यावर ती म्हणाली, ‘‘बरं, घाबरू नकोस. मी आहे की सोबत.’’ मला एकदम रडायलाच यायला लागलं. मी म्हटलं की, सगळे सोडून जातात. काही नसते सोबतबिबत. त्यावर हसून ती म्हणाली, ‘‘अरे वेडय़ा, मी नसते सोडत साथसोबत. पण मला दीदी म्हणायचं.. तरच.’’ मी म्हटलं, ‘‘बरं दीदी.’’ त्यावर दीदी हसली तर एकदम चांदणं अंगावर सांडल्यासारखं वाटलं पाहा. आणि दीदी एकदम गायला लागली मंद हसत. आजूबाजूचे वृक्ष एकदम स्तब्ध झाले. वारा थबकला. वेली सरसरायच्या थांबल्या आणि त्यांवरच्या कळ्या लहान मुलानं हसावं तशा एकदम उमलल्या. गाता गाता दीदीनं डोळे मिटले. ते उघडे होते तेव्हा त्यात दोन सूर्य होते. म्हंजे मोठेपणी मी वाचणार होतो ज्ञानेश्वरी त्यात म्हटलं आहे की मरतड हे तापहीन. तसे तापहीन, पण लख्ख तेजस्वी डोळे तिनं मिटले तर काय! तिच्याभोवतीच हळूहळू शुभ्र प्रकाश पसरू लागला. तो इतका झगझगीत, तरी इतका शीतल होता की मी माझं सगळं विसरूनच गेलो. ती दिसेचना आता. नुस्ता प्रकाश शुभ्र.

Advertisement

आणि त्यातनं एकामागोमाग ताना.

मन, काळीज, आसमंत भरून

Advertisement

टाकणाऱ्या अशा, की वरुणानं रथच थांबवला असेल सूर्याचा त्या ताना ऐकून. आणि ब्रह्मदेव म्हणाला असेल, ‘‘झाली वाटतं सृष्टी पूर्ण! थांबतो. जरा ऐकू तरी दे.’’ सगळं जगच उत्फुल्ल ब्रह्मकमळ झाल्यासारखं.

मग तो प्रकाश हळूहळू मंद होत गेला न् मग नाहीसा झाला. पालं तर ती मुलगी तिथं नाही. पुन्हा तिचं गाणं ऐकायला मिळालं नाही तर? असं वाटून मी हैराण. पण त्या आवाजानी धीर दिलाच मला, म्हंजे धैर्य, की काही हरकत नाही. चालत राहा. सापडेल वाट ह्य जंगलातून. हो नं. असा आवाज एकदा जरी ऐकायला मिळाला आयुष्यात- तर कायमच जंगलात हरवून जाण्याची तयारी आहे आपली. एवढीशी मुलगी. पण केवढं बळ देऊन गेली पाहा. आणि आत्ता तर ती माझ्यासाठी एकटय़ासाठी गायली. आणखी काय पाजे अस्तं आयुष्यात? ‘‘काय रे मेल्या तुला कमी आहे, नेहमी वाकडं तोंड करून बसतोस !’’ असं तायडी नेहमी म्हणते. हे- हे कमी होतं आतापर्यंत.

Advertisement

मग रात्री मी अंथरुणावर अंग टाकलं न् केलं सुरू नेहमीसारखं स्वप्नं रंगवणं की पारवा, भिवा, शेषा, मंदी, माई, दादा. डोळे पाझरायला लागले. तर जवळ कोणीतरी येऊन बसलं. कोण असेल? ती मुलगीच. दीदी. मी एकदम उठूनच बसलो न् म्हटलं की, अगं, तू इथे कशी? त्यानंतर ती मंद हसली न् म्हणाली, ‘‘कळ्ळं मला तू रडतोयस म्हणून. आणि मी सगळीकडेच असते रे. देवानी ते कामच नेमून दिलंय मला. आणि आवडतं की मला ते. झोप आता नीट.’’

मी डोळे मिटून उशीवर डोकं टेकवलं तशी दीदी म्हणायला लागली, ‘‘धीरे से आजा.. रे निंदियन में..’’ माझे डोळे जड होता होता मला भिवानी आणून दिलेल्या मोरपिसांची आठवण झाली. माईच्या डोळ्यांतलं मंद हसू आठवलं. ‘‘तू चिडवलंस तरी मला नाही येत राग..’’ म्हणणारी मंदाकिनी आठवली. अलगूज बाजूला टाकून माळरानावर एकटाच गुडघ्यांत डोकं लपवून ढसाढसा रडणारा शेषा आठवला. ‘‘तुम्हें कब्बी नहीं भुलूंगा’’ म्हणणारा, समोरचे दोन्ही दात पडलेला लहानसा अली आठवला. गावात सगळ्यांकडे खालमानेनी पाणी भरणारा जगू, त्याला सगळे हिडीसफिडीस करायचे, तो अर्धवट होता म्हणून, तो आठवला. झोपाळ्यावर बसून दक्ष चेहऱ्यानी गाणी म्हणणारी तापीताई मी पडलोबिडलो की- ‘‘लागलं का रे सोन्या?’’ असं म्हणून माझ्याआधी स्वत:च रडायची ते आठवलं. आगापीछा कोणी नसलेली रुक्मिणीकाकू चार घरी स्वयंपाक करून कुडाच्या खोलीत पडली राची, पण मला बोलवून मुद्दाम खोबऱ्याचा तुकडा द्यायची, ते आठवलं. रागावताच न येणारी माझी एक काकू फार म्हणजे फारच रागावली की हसतच मुलांना ‘शूर्पणखा मेला’ अन् मुलींना ‘द्रुष्ट दुर्योधन’ म्हणायची ते आठवलं. मोटेचा आवाज आठवला. पाण्यानी ओल्या झालेल्या मातीचा वास आठवला..

Advertisement

सकाळी मी जागा झालो तर इतकं काही ताजं ताजं वाटत होतं की फ्रेश! मी प्रसन्न बसलेलाच पाहून बहीणाबाई वेणी घालत घालत आल्याच तिकडून. ‘‘काय हो राजेश्री? एवढय़ा सकाळी सूर्य उगवला आज?’’ तर ती खांडेकर वाचायची म्हणून तिला बरं वाटावं म्हणून मी म्हटलं, ‘‘माझ्या जीवनाच्या क्षितिजावर सूर्य उगवला आहे.’’ त्यावर कंगवा फटकन खाली टाकून ती म्हणाली, ‘‘चोरून वाचतोस नं माझ्या कादंबऱ्या? थांब सांगते काकूला.’’ मी घाईघाईनं म्हटलं, ‘‘अगं, नाही गं नाही. मी दीदीबद्दल म्हटलं तसं. म्हंजे लता. लता मंगेशकर.’’ त्यावर प्रथमच ती काहीतरी कुजकट बोलली नाही. तिथल्याच एका पेटीवर बसत स्वप्नाळू डोळे करत म्हणाली, ‘‘काय रे आवाज आहे तिचा! घन:श्याम सुंदरा? आणि आयेगा आनेवाला?’’ असं म्हणून तिनं डोळे मिटून घेतले तेव्हाच माझ्या लक्षात आलं की, ही गाणार आता. कानांत गच्च बोटं घालून मी सटकन् उठून पळालोच तिथून.

मग वणवणत रालो दिवसभर. पण ही वणवण कशी? तर आनंदाची. सगळीकडे तोच तो दीदीचा आवाज. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही.. असं.

Advertisement

नवीनच तगमग सुरू झाली बाबा जीवनात. म्हंजे आयुष्यात. जीवनात आणि आयुष्यात ह्यंतला नक्की करेक्ट शब्द कोणता हे मला कधीच कळणार नव्हतं. अन् अजून तर कितीतरी जीवन जायचं होतं. आत्ताच तर कितीतरी लोक हरवले, दुरावले आपल्यापास्नं. ह्यवर सवयीप्रमाणे दु:खी होण्याचा मी प्रयत्न केला, पण तसं काही झालंच नाही मला आज म्हणून मी आश्चर्यचकितसा झालो. काही झाडाबिडाला टेकून दु:खी गाणी म्हणण्याची गरज नाही. आपण एकटे नाहीच. आपलं कोणीतरी आहे म्हंजे ते दिसत नसेल तरी. ते आहेच.

नूरजहाँच्या आवाजाला धरून मी पारव्याला जात होतो तसं ह्य आवाजाला धरून जाता येईल? हा आवाजच तिथून आल्यासारखा वाटतो. पारव्याहून.

Advertisement

जाऊ दे. ह्य आवाजापुढे बाकी सगळं शुल्लक आहे.

‘‘ क्षुल्लक! शुल्लक नाही.’’

Advertisement

मी ताडकन् उठूनच बसलो अंथरुणात. इथे कुठे तापीताई? ती तर सासरी आपल्या. बघतो तर दीदी. ‘‘काय विलक्षण सुंदर उच्चार ह्य मुलीचे..’’ असं काम करता करताच काकू म्हणायच्या. मला आठवलं ते. मग दीदी म्हणाली, ‘‘आज पण जागाच वाटतं?’’ मी म्हणालो की, मी जरा विचार करत होतो. दीदी खूप हसली. म्हणाली,‘‘ बापरे! विचारबिचार! मोठा झालासच की मग.’’ मी तिला विचारलं की, कसं कळतं आपण मोठे झालो म्हणून? त्यावर ती गंभीर झाली न् म्हणाली, ‘‘कळतं बरोब्बर! मी नाही का, बाबा गेले न् पटकन मोठी झाले एका मिनिटात.’’ मग थांबून ती म्हणाली, ‘‘बाबा असते तर सिनेमात कशाला गायले असते मी रे? मी मला हव्या त्या गाण्यात रमून गेले असते. जाऊ दे. एवढं तरी गायला मिळतंय नं? मग?’’

एवढं तरी म्हणजे? म्हणजे आणखी काय असणार आणि? त्यावर माझ्या मनातलं ओळखून ती म्हणाली, ‘‘चल. दाखवते.’’

Advertisement

आम्ही उघडय़ावर आलो न् मी पालं तर क्षितिजावर नुस्ता प्रकाश उसळत होता. मी श्वास रोखून थक्क. ‘‘ हे काय?’’ मी आवंढा गिळून म्हटलं. दीदी हसली. (माईसारखंच मंद.) ‘‘अरे, ते तुझं पारवा!’’ हो? पारवा? तिथे आता दिवे लुकलुकत नाहीत. तिथे प्रकाशच प्रकाश.

मी एकदम घाईनी आणि आत्मविश्वासानी पाऊल पुढे टाकलं. त्यावर दीदी एकदम म्हणाली, ‘‘सांभाळून. अशी घाई नाही करायची. मस्त रमतगमत जायचं अवतीभवतीचं पाहत. वाटेत तुला बडे गुलाम अली खाँ नावाचा पर्वत दिसेल, तो पाहायचा. अमीर खाँसाहेब नावाचा समुद्र दिसेल, त्याच्या लाटा अंगावर घ्यायच्या. केसरबाई नावाच्या रागीट देवीचं मंदिर दिसेल, तिथं टेकायचं. मोगुबाई नावाची तपस्विनी दिसेल, तिला नमस्कार करून तिचा आशीर्वाद घ्यायचा. कुमार गंधर्व म्हणून आहेत ते तुझ्या गळ्यात विजांचे हार टाकतील, ते घालून मिरवायचं. भीमसेन नावाचा प्रचंड धबधबा दिसेल, त्याचे तुषार अंगावर घ्यायचे. असं जायचं. अरे, संपूच नये हा प्रवास असं वाटेल तुला.’’ मी कसनुसा होत म्हटलं, ‘‘पण तू? तुझं गाणं?’’ ती म्हणाली, ‘‘ते कुठं जातं! गाणाऱ्याच्या मागे तंबोरा झंकारत असतो की नाही? तसा माझा आवाज झंकारतच राहणार तुझ्याबरोबर कायम. चल तू. मी आहेच.’’

Advertisement

मी क्षितिजावरच्या प्रकाशाकडे पालं न् मग पुन्हा मागे वळून पालं, तर दीदी नाही. पण अल्याडच्या क्षितिजाकडे खूप लोक जमले होते. मी पालं, दादा, माई, भिवा, शेषा, अली, काका, काकू, मंदा, निम्मी, नूरजहाँ. जिवाभावाचे आणखी कितीतरी. त्यांना सोडून मला एकटय़ालाच जायचं होतं पारव्याला- हे कळ्ळं मला अगदी त्या क्षणी.

‘आम्ही जातो आमुच्या गावा, अमुचा रामराम घ्यावा’ हे गाणं म्हणायला पाहिजे आपण.

Advertisement

 संपलं आपलं लहानपण.

हे कळ्ळं.

Advertisement

(‘मौज प्रकाशन’च्या ‘त्रिबंध’मधून साभार)

The post ‘लुकलुकती दूर दिवे गावामधले..’ appeared first on Loksatta.

AdvertisementSource link

Advertisement